Goa Accident : राज्यात अपघातांचे सत्र सुरूच आहे. आज दिवसभरात तीन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाला. तर दोघेजण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, हे तिन्ही अपघात दुचाकींचेच झाले आहेत. त्यामुळे चालकांच्या वेग नियंत्रणांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
म्हापसा येथे दोन दुचाकी अपघातांत एकाचा मृत्यू तर एकजण जखमी झाल्याची घटना काल सोमवारी दुपारी 12 वाजता हिंदू स्मशानभूमीजवळ घडली. मेडिकल प्रतिनिधी असलेले दर्शन सिमेपुरुषकर (56, मूळ रा. भाटी-ओशेल) हे दुपारी 12 च्या सुमारास आपल्या राय-शिवोली येथील घरी जेवणासाठी ॲक्टिवा स्कुटरने (क्र. जीए 03 एएल 4492) जात होते. मात्र, हाऊसिंगबोर्ड-म्हापसा येथील सेंट झेवियर कॉलेजच्या मुख्य रस्त्यावर केरळीयन टोळीतील एका दुचाकीसोबत (क्र. केएल 46 एन 2219) धडक झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दर्शन हे राय-शिवोलीत पत्नी शोभा तसेच चौदा वर्षांची मुलगी निशा यांच्यासमवेत राहात होते. त्यांच्या अपघाती मृत्युमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
कंटेनरच्या धडकेत युवक बचावला
उसगाव एमआरएफ फॅक्टरीजवळ असलेल्या दोन रस्ताठिकाणी कंटेनर व दुचाकी यांच्यात अपघात होऊन घनःश्याम हनुमंत कुंकळ्ळेकर (वय 39 रा.ताळगाव) हे जखमी झाले आहेत. सोमवारी सकाळी ही घटना घडली.
रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला पार्क करून ठेवलेला कंटेनर सुरू करून चालक फोंड्याच्या दिशेने आणत होता. यावेळी उसगावहून फोंड्याच्या दिशेने घनःश्याम हे दुचाकीवरून येत होते. त्यावेळी कंटेनर व दुचाकीची धडक झाली. मात्र, अपघातापूर्वीच घनःश्याम यांनी उडी मारून दुचाकी सोडून दिली. त्यामुळे ते बालंबाल बचावले. तर दुचाकी ही पूर्णपणे कंटेनरखाली सापडली. त्यांच्या पायाला मार लागल्याने गोमेकॉ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे याठिकाणी असलेला यूटर्न बंद करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
बस-दुचाकीचा अपघात, एकाचा मृत्यू
कुरपावाडा केळशी येथे काल सोमवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास बस व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात आडपई फोंडा येथील दुचाकी चालक संतोष सुरेश नाईक (35, रा. आडपई) यांचा मृत्यू झाला. कुठ्ठाळीहून बोरीमार्गे आडपईला जाताना केळशी येथे दुचाकीस्वार संतोष नाईक यांना समोरून येणाऱ्या बसची धडक बसली. यात ते गंभीर जखमी झाले होते. संतोष हे गोमेकॉ इस्पितळात नोकरीवर असल्याची माहिती आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.