पणजी: गोव्याने रणजी करंडक क्रिकेट सामन्यात यजमान पंजाबची ५ बाद ९२ अशी बिकट स्थिती केली होती, अवघा तिसराच सामना खेळताना संघाचे कर्णधारपद भूषविणाऱ्या एकवीस वर्षीय उदय सहारन याने झुंझार नाबाद शतक झळकावले. त्यामुळे पाहुण्या संघाची पकड ढिली झाली.
न्यू चंडीगड येथील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर एलिट ब गट लढतीत शनिवारी सकाळी पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. अगोदरच्या दोन लढतीत नेतृत्व केलेल्या नमन धीर याच्याकडील जबाबदारी या सामन्यात सहारन याच्याकडे आली. तिसऱ्या क्रमांकावरील या युवा फलंदाजाने यंदा मध्य प्रदेशविरुद्ध रणजी पदार्पण केले होते, त्यानंतर त्याचा हा तिसरा सामना आहे.
उदय हा २०२४ मध्ये १९ वर्षांखालील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत उपविजेतेपद मिळविलेला भारतीय संघाचा कर्णधार आहे. या जिगरबाज फलंदाजाने शांत चित्ताने फलंदाजी करताना पहिल्या दिवसअखेर नाबाद १०० धावा केल्या. त्याचे हे चौथ्या रणजी करंडक डावातील पहिलेच शतक ठरले. त्यामुळे दिवसअखेर पंजाबला पहिल्या डावात ५ बाद २१५ असे सावरता आले.
उदय सहारन याने २४७ चेंडूंतील संयमी खेळीत आठवेळा चेंडू सीमापार केला. त्याने यष्टिरक्षक-फलंदाज सलिल अरोरा (५१ धावा, १३१ चेंडू, ७ चौकार) याच्यासमवेत सहाव्या विकेटसाठी १२३ धावांची अभेद्य भागीदारी केली आहे.
त्यापूर्वी, गोव्याच्या संघात पुनरागमन करणाऱ्या दीपराज गावकरने शानदार गोलंदाजीवर टिपलेल्या दोन विकेट, तसेच वासुकी कौशिक व मोहित रेडकर यांच्या प्रत्येकी एका विकेटमुळे पंजाबची उपाहारापूर्वी ४ बाद ५९ अशी खूपच खराब स्थिती होती. सहारन याने रमणदीप सिंग (२२) याच्यासमवेत डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण अर्जुन तेंडुलकरने रमणदीपला बाद करून गोव्याला वर्चस्व मिळवून दिले. नंतर मात्र दोन सत्रांच्या खेळात सहारन व अरोरा जोडीने गोव्याच्या गोलंदाजांना दाद दिली नाही.
पंजाब, पहिला डाव ः ८७ षटकांत ५ बाद २१५ (प्रभसिमरन सिंग १७, उदय सहारन नाबाद नाबाद १००, रमणदीप सिंग २२, सलिल अरोरा नाबाद ५१, अर्जुन तेंडुलकर १७-५-५८-१, वासुकी कौशिक १८-७-२८-१, दर्शन मिसाळ १८-४-३६-०, दीपराज गावकर १२-३-२२-२, मोहित रेडकर ११-१-४१-१, ललित यादव ११-०-२५-०).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.