

पणजी: गोवा आणि पंजाब यांच्यात आतापर्यंत रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत दोन लढती झालेल्या आहेत, प्रत्येकवेळी उत्तर भारतीय संघ विजेता ठरला. या पार्श्वभूमीवर शनिवारपासून (ता. १) न्यू चंडीगड येथे खेळल्या जाणाऱ्या चार दिवसीय एलिट ब गट सामन्यात यजमान संघाला नमविण्याचे कठीण लक्ष्य पाहुण्या संघासमोर असेल.
पंजाब, तसेच गोव्याचा हा स्पर्धेतील तिसरा सामना आहे. अगोदरचे दोन्ही सामने अनिर्णित राखलेल्या पंजाबचे चार गुण आहे, तर घरच्या मैदानावर चंडीगडवर डावाने विजय मिळविलेल्या गोव्याचे आठ गुण झाले आहेत.
मात्र कर्नाटकविरुद्धच्या अनिर्णित लढतीत फॉलोऑनची नामुष्की पत्करावी लागली याची सल गोव्याला काही प्रमाणात असेल, त्याचवेळी दुसऱ्या डावात मंथन खुटकर व अभिनव तेजराणा यांनी दुसऱ्या डावात दमदार फलंदाजी करताना केलेली १२३ धावांची अभेद्य भागीदारी गोव्याचा आत्मविश्वास वाढविणारी आहे. फलंदाजीत गोव्याचा संघ अभिनव तेजराणा (एकूण २९६ धावा) व ललित यादव (एकूण २४९) या मूळ दिल्लीकर फलंदाजांवर अवलंबून असेल.
दोघांसाठी चंडीगडचे वातावरण परिचयाचे आहे. हुकमी फलंदाज सुयश प्रभुदेसाई याने तीन डावांत २४ च्या सरासरीने ७२ धावा केल्या आहेत, गोव्यासाठी ही कामगिरी चिंता वाढविणारी आहे. गोलंदाजीत डावखुरा फिरकी गोलंदाज दर्शन मिसाळने १० गडी बाद केलेले आहेत, इतरांनाही अधिक धारदार मारा करावा लागेल.
कर्नाटकविरुद्ध खेळलेल्या अगोदरच्या लढतीतील संघात एक बदल निश्चित असल्याची माहिती आहे. तिसरा वेगवान गोलंदाज या नात्याने शिमोगा येथे छाप पाडू न शकलेल्या विजेश प्रभुदेसाई याच्या जागी अष्टपैलू दीपराज गावकर खेळविण्याचे संघव्यवस्थापानने निश्चित केल्याचे सूत्रांकडून समजले. दीपराजने पहिल्या लढतीत चंडीगडविरुद्ध स्नेहल कवठणकरच्या अनुपस्थितीत गोव्याचे नेतृत्व केले होते, मात्र संघातील समतोल साधताना त्याला कर्नाटकविरुद्धच्या लढतीसाठी संघाबाहेर बसावे लागले होते.
एकूण सामने : २, पंजाब विजयी : २
सर्वोच्च धावसंख्या : पंजाब : ६३५ (पर्वरी, २०१७-१८), गोवा : २५६ (पर्वरी, २०१७-१८)
वैयक्तिक सर्वोच्च : पंजाब : जीवनज्योत सिंग २३८ (पर्वरी, २०१७-१८), गोवा : दर्शन मिसाळ नाबाद ६४ (पर्वरी, २०१७-१८)
डावात सर्वोत्तम गोलंदाजी : पंजाब : प्रेरीत दत्ता ५-४८ (पर्वरी, २०२३-२४), गोवा : शदाब जकाती ५-१६५ (पर्वरी, २०१७-१८)
यापूर्वीच्या लढती : १) २४ ते २७ ऑक्टोबर २०१७ (पर्वरी) पंजाब डाव व १३३ धावांनी विजयी, २) २६ ते २८ जानेवारी २०२४ (पर्वरी) पंजाबचा ६ विकेट राखून विजय.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.