

पणजी: गोव्याचा संघ रणजी करंडक एलिट गट क्रिकेट सामन्यात मंगळवारी फॉलोऑनची नामुष्की टाळू शकला नाही. मात्र, दुसऱ्या डावात अभिनव तेजराणा (७३) व मंथन खुटकर (५५) या डावखुऱ्या फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी १२३ धावांची अभेद्य भागीदारी करून सामना अनिर्णित राखला.
कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या शिमोगा येथील नवुले स्टेडियमवर झालेला चार दिवसीय सामना झाला. मंगळवारी सकाळी तीन षटकारांसह अर्धशतक नोंदविलेल्या मोहित रेडकर याच्या आक्रमकतेनंतरही गोव्याला फॉलोऑन टाळण्यासाठी पाच धावा कमी पडल्या.
कर्नाटकच्या ३७१ धावांना उत्तर देताना गोव्याचा पहिला डाव २१७ धावांत संपुष्टात आला. कालच्या धावसंख्येवरून आज सकाळी गोव्याने १०.२ षटकांत चार विकेटच्या मोबदल्यात ४६ धावांची भर टाकली.
अर्जुन तेंडुलकर (४७) व मोहित यांनी सातव्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी केल्यानंतर गोव्याने अखेरच्या तीन विकेट फक्त पाच धावांत गमावल्या.
पहिल्या डावात १५४ धावांची आघाडी घेतल्यानंतरही कर्नाटकचे निर्विवाद विजयाचे मनसुबे सलामीचा मंथन व तिसऱ्या क्रमांकावरील अभिनव यांच्या धीरोदत्त फलंदाजीमुळे साध्य झाले नाहीत. सुयश प्रभुदेसाई (१३) लवकर बाद झाला, पण नंतर मंथन-अभिनव जोडीने कर्नाटकच्या वेगवान गोलंदाजीचा खंबीरपणे सामना केला.
अखेरच्या दिवशी चहापानानंतर गोव्याची दुसऱ्या डावात १ बाद १४३ अशी भक्कम स्थिती असताना दोन्ही कर्णधारांच्या संमतीने सामना अनिर्णित राखण्यात आला. त्यावेळी गोव्याचा संघ दुसऱ्या डावात ११ धावांनी मागे होता.
कर्नाटकला अनिर्णित लढतीतून पहिल्या डावातील आघाडीचे तीन गुण मिळाले, तर गोव्याला एक गुण प्राप्त झाला. गोव्याने पहिल्या लढतीत चंडीगडला नमविले होते. कर्नाटकला सलग दुसऱ्या लढतीत विजयाविना राहावे लागले. गोव्याचा स्पर्धेतील तिसरा सामना १ ते ४ नोव्हेंबर या कालावधीत पंजाबविरुद्ध नवी चंडीगड येथे खेळला जाईल.
कर्नाटक, पहिला डाव : ३७१
गोवा, पहिला डाव (६ बाद १७१ वरून) : ८७.२ षटकांत सर्वबाद २१७ (अर्जुन तेंडुलकर ४७, मोहित रेडकर ५३, समर दुभाषी ६, वासुकी कौशिक ५, विद्वत कावेरप्पा ५-५१, अभिलाष शेट्टी ३-७४).
गोवा, दुसरा डाव : ४६ षटकांत १ बाद १४३ (मंथन खुटकर नाबाद ५५, सुयश प्रभुदेसाई १३, अभिनव तेजराणा नाबाद ७३).
स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत एलिट ब गटातील अन्य लढतीत महाराष्ट्राने चंडीगडला नमविले. बाकी दोन लढती अनिर्णित राहिल्या. त्यात पंजाबने केरळवर, तर मध्य प्रदेशने सौराष्ट्रावर पहिल्या डावात आघाडी संपादली. प्रत्येकी दोन सामने खेळल्यानंतर महाराष्ट्राचे नऊ, गोव्याचे आठ, मध्य प्रदेशचे सहा, कर्नाटक, सौराष्ट्र, पंजाबचे प्रत्येकी चार, केरळचे दोन गुण झाले आहेत. चंडीगडला दोन्ही लढतीत पराभव पत्करावा लागला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.