

पणजी : ९ एप्रिल रोजी होणाऱ्या फोंडा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने केतन भाटीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून सर्वांत आधी त्यांचे नाव जाहीर केले. भाटीकर यांना फोंड्यातील मगोप समर्थकांना पाठिंबा असल्याचे चित्र दिसत असतानाच, विरोधकांमध्ये मात्र एकी नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
विरोधातील आम आदमी पक्ष (आप) आणि रिव्हॉल्युशनरी गोवन्स (आरजीपी) या दोन्ही पक्षांनी उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे फोंड्याची निवडणूक भाजप, काँग्रेस, आप आणि आरजीपी अशा चार प्रमुख पक्षांत रंगण्याची शक्यता आहे.
माजी मंत्री तथा फोंड्याचे माजी आमदार रवी नाईक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या फोंड्यात येत्या ९ रोजी पोटनिवडणूक होणार असून, ४ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. राज्य विधानसभेची निवडणूक अवघ्या अकरा महिन्यांवर येऊन ठेपल्याने फोंडा पोटनिवडणूक सर्वच राजकीय पक्षांसाठी अस्तित्वाची लढाई बनली आहे.
गोवा फॉरवर्ड पक्ष सध्या काँग्रेससोबत युतीत असल्याने फॉरवर्डने काँग्रेस उमेदवार केतन भाटीकर यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केलेला आहे. परंतु, आप आणि आरजीपी या दोन्ही पक्षांनी फोंडा पोटनिवडणूक लढवण्याचे निश्चित केले असून, त्यासंदर्भातील हालचालीही त्यांनी सुरू केल्या आहेत.
फोंडा पोटनिवडणूक आप लढवणार असून, ‘आप’चा उमेदवार बुधवारी पक्षात प्रवेश करणार असून, बुधवारीच त्यांच्या नावाची घोषणा होईल, अशी माहिती ‘आप’च्या वरिष्ठ सूत्रांनी ‘गोमन्तक’शी बोलताना दिली.
‘आप’कडून आदर्श तोरस्कर किंवा श्रीकांत यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर, आरजीपीचे अध्यक्ष मनोज परब यांनी फोंड्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकांचे सत्र सुरू केले असून, उमेदवाराचे नाव लवकरच जाहीर करण्यात येईल. सध्या आरजीपीकडून फोंडा पोटनिवडणुकीसाठी दिलीप नाईक यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याचे आरजीपीच्या सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, गत जिल्हा पंचायत निवडणुकीत विरोधकांच्या युतीचे अडलेले घोडे वर्षभरात रूळावर येऊन आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांची युती होईल, अशी शक्यता सर्वांनाच वाटत होती. पण, आप आणि आरजीपीने फोंडा पोटनिवडणुकीत उमेदवार देण्याचे निश्चित केल्याने विधानसभा निवडणुकीतील विरोधकांच्या एकीची शक्यताही मावळल्यात जमा झाल्याचे दिसत आहे.
फोंड्यात गत विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या राजेश वेरेकर यांना ६,८३९ मते मिळाली होती. तर, आप आणि आरजीपीच्या उमेदवारांना मिळून २,३९० मते मिळाली होती. यातून फोंड्यात या दोन्ही पक्षांची मते कमी असल्याचे स्पष्ट होते. फोंड्यातील मगोप समर्थकांचा केतन भाटीकर यांना पूर्ण पाठिंबा असल्याने काँग्रेसने आप आणि आरजीपीशी कोणतीही चर्चा न करण्याचे ठरविले असल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.