ISL 2024-25 FC Goa Vs Kerala Blasters
पणजी: इकेर ग्वॉर्रोचेना आणि महंमद यासीर यांनी उत्तरार्धात नोंदविलेल्या प्रत्येकी एक गोलच्या बळावर एफसी गोवाने शनिवारी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत अपेक्षित विजयाचे पूर्ण तीन गुण प्राप्त केले आणि ४२ गुणांसह दुसरा क्रमांक राखला. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर त्यांनी केरळा ब्लास्टर्सला २-० फरकाने हरविले.
एफसी गोवाने पूर्वार्धातील खेळात वर्चस्व राखले, पण गोलसाठी प्रतीक्षा करावी लागली. स्पॅनिश स्ट्रायकर इकेर ग्वॉर्रोचेना याने रिबाऊंडवर ४६व्या मिनिटास गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडली. यावेळी देयान द्राझिच याचा फटका केरळा ब्लास्टर्सचा गोलरक्षक कमलजीत सिंग याने रोखला, पण चेंडू पुन्हा मैदानात आल्यानंतर ग्वॉर्रोचेना याने संधी साधली.
दुसरा गोल अगदी जवळून महंमद यासीर याने ७३व्या मिनिटास नोंदविला. या गोलसाठी ग्वॉर्रोचेना याचे शानदार क्रॉस पास असिस्ट साह्यभूत ठरले. सामनावीर ग्वॉर्रोचेना याला सामन्याच्या भरपाई वेळेत दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. नंतर त्याला खबरादारीअंतर्गत इस्पितळात हलवावे लागले.
एफसी गोवाने स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात कोची येथेही केरळा ब्लास्टर्सला नमविले होते. एकंदरीत त्यांचा हा स्पर्धेतील बारावा विजय ठरला. मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघाचे आता २१ लढतीतून ४२ गुण झाले आहेत. अव्वल स्थानावरील मोहन बागानपेक्षा (४९ गुण) त्यांचे आता सात गुण कमी आहेत, तर तिसऱ्या क्रमांकावरील जमशेदपूर एफसीपेक्षा (३७ गुण) पाच गुण जास्त आहेत.
एफसी गोवाच्या या विजयामुळे मोहन बागानला ‘शिल्ड’साठी थांबावे लागले. स्पर्धेतील अकराव्या पराभवामुळे केरळा ब्लास्टर्सच्या प्ले-ऑफ फेरी गाठण्याच्या आशा पूर्णपणे संपुष्टात आल्या. २१ लढतीतून त्यांचे २४ गुण कायम राहिले, तसेच दहाव्या क्रमांकावर घसरण झाली. एफसी गोवाचा पुढील सामना २७ फेब्रुवारीस दिल्ली येथे पंजाब एफसीविरुद्ध होईल.
एफसी गोवाचे केरळा ब्लास्टर्सविरुद्ध आयएसएल स्पर्धेतील २२ लढतीत १३ विजय
यंदा सलग दुसरा विजय, कोची येथे पहिल्या टप्प्यात एफसी गोवाची १-० अशी बाजी
एफसी गोवाच्या मोसमात ६ क्लीन शीट्स
फातोर्ड्यात यंदा एफसी गोवाचे ११ सामने, त्यात ७ विजय, २ बरोबरी, २ पराभव
घरच्या मैदानावर एफसी गोवा सलग ८ सामने अपराजित (७ विजय, १ बरोबरी)
आयएसएल स्पर्धेत एफसी गोवाचे सलग २१ सामन्यांत गोल
यंदा आयएसएलमध्ये इकेर ग्वॉर्रोचेनाचे ६, तर महंमद यासीरचे २ गोल
एकंदरीत ग्वॉर्रोचेनाचे ४३ आयएसएल सामन्यांत २० गोल
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.