Virat Kohli Record: रनमशीन विराट कोहली सध्या आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. मैदानात उतरताच धावांचा पाऊस पाडणाऱ्या कोहलीने सलग पाच डावांमध्ये 50 हून अधिक धावांची खेळी करुन प्रतिस्पर्धी संघांच्या गोलंदाजांची झोप उडवली आहे. न्यूझीलंडविरुद्ध सुरु असलेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यातही कोहलीने आपल्या बॅटची जादू दाखवत 93 धावांची विस्फोटक खेळी खेळली. अवघ्या 7 धावांनी त्याचे शतक हुकले असले तरी त्याच्या या खेळीने त्याने आगामी सामन्यांसाठी धोक्याची घंटा वाजवली.
विराट आता एका अशा उंबरठ्यावर उभा आहे, जिथे तो भारताचा माजी विस्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि ऑस्ट्रेलियाचा दिग्गज कर्णधार रिकी पॉन्टिंग यांना मागे टाकू शकतो. न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम सध्या या तिघांच्या नावावर संयुक्तपणे आहे. विराट, सेहवाग आणि पॉन्टिंग या तिघांनीही किवी संघाविरुद्ध प्रत्येकी 6 शतके झळकावली आहेत. आता आगामी दोन सामन्यांपैकी एकाही सामन्यात विराटने शतकी खेळी केली, तर तो 7 शतकांसह या यादीत अव्वल स्थानी पोहोचून हा जागतिक विक्रम आपल्या नावावर करेल.
भारत (India) आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील उर्वरित दोन सामने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. मालिकेतील दुसरा सामना 14 जानेवारी रोजी राजकोट येथे होणार आहे, तर शेवटचा सामना 18 जानेवारीला इंदूर येथे खेळवला जाईल. राजकोटची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन मानली जाते, त्यामुळे विराट तिथेच आपले शतक पूर्ण करुन विक्रम मोडीत काढेल, अशी चाहत्यांना खात्री आहे. दुर्दैवाने तिथे संधी हुकली, तरी इंदूरच्या छोट्या मैदानावर विराटला ही किमया साधण्याची दुसरी संधी असेल.
विराट कोहलीचा (Virat Kohli) हा फॉर्म केवळ आंतरराष्ट्रीय सामन्यांपुरता मर्यादित नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत चमकदार कामगिरी केल्यानंतर त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्येही आपला दरारा कायम ठेवला. विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळलेल्या दोन सामन्यात त्याने अनुक्रमे 131 आणि 77 धावांची खेळी केली होती. विशेष म्हणजे, वर्ष 2026 सुरु होऊन 13 दिवस उलटले आहेत, परंतु अद्याप एकाही भारतीय फलंदाजाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकी धावसंख्या गाठता आलेली नाही. त्यामुळे 2026 मधील भारताचे पहिले आंतरराष्ट्रीय शतक ठोकण्याचा मान विराट कोहली मिळवणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विराट कोहलीच्या फलंदाजीच्या शैलीत गेल्या काही महिन्यांत मोठा बदल जाणवत आहे. एकेकाळी खेळपट्टीवर स्थिरावण्यासाठी वेळ घेणारा विराट आता डावाच्या सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्र्यात दिसत आहे. पूर्वी जे षटकार विराट डावाच्या शेवटी मारायचा, तेच फटके आता तो डावाच्या सुरुवातीला सहज खेळत आहे. त्याचा स्ट्राईक रेट कमालीचा सुधारला असून तो गोलंदाजांवर मानसिक दडपण निर्माण करत आहे. त्याचा हा 'कलरफुल फॉर्म' पाहता, न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी सामन्यांमध्ये रन्सचा डोंगर उभा राहणार हे निश्चित आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.