I league Dempo sc Relegation Battle vs Sporting Club Bengaluru
पणजी: आय-लीग फुटबॉल स्पर्धेत धेंपो स्पोर्टस क्लब सध्या पदावती क्रमांकापासून काही गुण दूर असला, तरी धोका कायम आहे. अखेरचे पाच सामने बाकी असताना संघ अवघड परिस्थितीतून जात असल्याचे संघाचे मुख्य प्रशिक्षक समीर नाईक यांनी शुक्रवारी मान्य केले.
धेंपो स्पोर्टस क्लब व स्पोर्टिंग क्लब बंगळूर यांच्यातील आय-लीग सामना शनिवारी (ता. ८) फातोर्डा (Fatord) येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळला जाईल. प्रत्येकी १७ सामने खेळल्यानंतर धेंपो क्लब १९ गुणांसह नवव्या, तर स्पोर्टिंग क्लब बंगळूर १७ गुणांसह दहाव्या क्रमांकावर आहे. अकराव्या स्थानी असलेल्या ऐजॉल एफसीचे १६ गुण झाले आहेत. या तीन संघांतील गुणांचा फरक अतिशय कमी आहे, त्यामुळेच समीर यांना सध्याची परिस्थिती अवघड असल्याचे वाटते. तसे त्यांनी पत्रकार परिषदेतही बोलून दाखविले.
‘‘स्पर्धेच्या वरच्या भागात जागा राखण्यासाठी आमचे प्रयत्न असतील. स्पोर्टिंग क्लब बंगळूरविरुद्ध आम्ही यापूर्वीही खेळलेलो आहोत. विजयाच्या पूर्ण गुणांची संघाला नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे आमच्यासाठी शनिवारचा सामना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यासंदर्भात मी खेळाडूंशी बोललो असून त्यांनाही जबाबदारीची जाणीव आहे,’’ असे समीर पत्रकार परिषदेत म्हणाले.
धेंपो क्लबला मागील लढतीत शेवटच्या बाराव्या स्थानी असलेल्या दिल्ली एफसीकडून (१३) धक्कादायक पराभव पत्करावा लागला होता, तर ऐजॉल एफसीने स्पोर्टिंग क्लब बंगळूरला नमविले होते, परिणामी दोन्ही पराभूत संघ उसळी घेण्याच्या तयारीत आहेत. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात बंगळूर येथे स्पोर्टिंग क्लब बंगळूरने धेंपो क्लबला ३-१ फरकाने नमविले होते. धेंपो क्लबची सध्याची कामगिरी उत्साहवर्धक नाही. श्रीनिदी डेक्कनविरुद्ध दोन गोलची आघाडी घेऊनही ते पराभूत झाले, तर शिलाँग लाजाँगविरुद्ध भरपाई वेळेत गोल स्वीकारल्यामुळे त्यांना बरोबरीवर समाधान मानावे लागले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.