I League Dempo Club Vs Namdhari FC
पणजी: सामन्यातील तीन मिनिटे बाकी असताना संघातील नवा परदेशी खेळाडू मार्कुस जोसेफ याने केलेल्या गोलमुळे माजी विजेत्या धेंपो स्पोर्टस क्लबने नामधारी एफसीला २-२ असे गोलबरोबरीत रोखले. सामना गुरुवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला.
त्रिनिदाद-टोबॅगोचा आंतरराष्ट्रीय खेळाडू जोसेफ याने ८७व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे धेंपो क्लबने बरोबरीच्या एका गुणाची कमाई केली. जोसेफचा हा धेंपो क्लबच्या जर्सीतील मोसमातील पहिलाच सामना होता. त्यापूर्वी ८१व्या मिनिटास क्लेडसन कार्व्हालो दा सिल्वा याने केलेल्या गोलमुळे नामधारी एफसीने २-१ अशी आघाडी प्राप्त केली होती.
सामन्यातील ४५व्या मिनिटास सेईगौमांग डौंगेल याच्या भेदक हेडिंगमुळे धेंपो क्लब विश्रांतीला एका गोलने आघाडीवर होता. पृथ्वेश पेडणेकर याच्या असिस्टवर हा गोल झाला. ६५व्या मिनिटास बदली खेळाडू आकाशदीप सिंग याने केलेल्या गोलमुळे नामधारी एफसीने बरोबरी साधली होती.
धेंपो क्लबने बरोबरीत रोखल्यामुळे नामधारी एफसीला अव्वल स्थानावरील चर्चिल ब्रदर्सला गाठणे शक्य झाले नाही. नामधारी एफसीचे १४ सामन्यांतून २५ गुण झाले असून ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. चर्चिल ब्रदर्सच्या खाती २७ गुण असून इंटर काशी एफसी २४ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.
धेंपो क्लबची ही तिसरी बरोबरी ठरली. त्यांचे १४ लढतीतून १८ गुण झाले असून ते आठव्या स्थानी आहेत. धेंपो क्लबचा पुढील सामना फातोर्डा येथेच १९ फेब्रुवारीस शिलाँग लाजाँग एफसीविरुद्ध होईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.