
पणजी: धेंपो स्पोर्टस क्लब आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील पुनरागमनात आता स्थिरावत आहे. मागील लढतीत त्यांनी बलाढ्य इंटर काशी एफसीला पराभूत केले. या कामगिरीने संघाचे मनोबल आणि आत्मविश्वास उंचावला असून त्या बळावर गुरुवारी (ता. १३) होणाऱ्या नामधारी एफसीविरुद्धही विजयी कामगिरीसाठी खेळाडू प्रेरित असल्याचे मुख्य प्रशिक्षक समीर नाईक यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
धेंपो क्लब व नामधारी एफसी यांच्यातील सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळला जाईल. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात धेंपो क्लबने नामधारी एफसीला एका गोलने नमविले होते. सध्या नामधारी संघाचे १३ सामन्यांतून २४ गुण असून ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. पहिल्या क्रमांकावरील चर्चिल ब्रदर्सपेक्षा (२७ गुण) त्यांचे तीन गुण कमी आहेत. धेंपो क्लबने १३ सामन्यांतून १७ गुणांची कमाई केली असून सध्या ते आठव्या स्थानी आहेत. आणखी तीन गुण मिळाल्यास ते गुणतक्त्यात प्रगती साधतील.
मागील लढतीत धेंपो क्लबने इंटर काशी एफसीला २-० असे नमवून पूर्ण तीन गुण प्राप्त केले, दोन्ही गोल अर्जेंटिनाचा ख्रिस्तियन दामियन पेरेझ याने नोंदविले होते. नामधारी एफसीला शिलाँग लाजाँग एफसीकडून २-३ असा निसटता पराभव पत्करावा लागला होता.
‘‘स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात आम्ही नामधारी एफसीला हरविले होते, तो निकाल आमचे मनोबल बळावणारा आहे. इंटर काशी एफसीविरुद्धच्या विजयाने संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. निश्चितच त्याचा फायदा होईल,’’ असे समीर यांनी सांगितले. धेंपो क्लबने आता आय-लीग स्पर्धेसाठी सहा परदेशी खेळाडू करारबद्ध केले आहे, त्यापैकी चौघांना मैदानात उतरविल्यास संघाचे पारडे जड राहील, असे माजी आय-लीग विजेत्या संघाच्या प्रशिक्षकास वाटते. इंटर काशीविरुद्ध दामियन व स्पॅनिश हुआन मेरा जोडी परिणामकारक ठरली होती. फातोर्ड्यात (Fatorda) आपला संघ जिंकत नाही याबाबत समीर थोडेसे चिंतित आहेत. ‘‘कदाचित मोठ्या स्टेडियमवर खेळताना आमच्या खेळाडूंच्या मानसिकतेवर परिणाम होत असावा, पण अनुभवागणिक खेळाडूंची कामगिरी सुधारेल,’’ असा विश्वासही समीर यांनी व्यक्त केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.