पणजी: भारतीय कसोटी संघातील स्थान गमावलेल्या करुण नायर याने निवड समितीला स्पष्ट संदेश धाडताना गोव्याविरुद्ध रणजी करंडक क्रिकेट लढतीत नाबाद १७४ धावांची दमदार खेळी करुन राष्ट्रीय निवड समितीचे लक्ष वेधले. प्रेक्षणीय शतकी खेळीमुळे एलिट ब विभागीय लढतीत यजमान कर्नाटकला दुसऱ्या दिवशी रविवारी सुस्थिती गाठता आली. सामना शिमोगा येथील नवुले स्टेडियमवर सुरू आहे.
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी उपाहारानंतर कर्नाटकाचा पहिला डाव ३७१ धावांत आटोपला. अखेरचा गडी विद्वत कावेरप्पा धावबाद झाल्याने करुणला द्विशतकाची संधी हुकली. त्याने २६७ चेंडूंचा सामना करताना १४ चौकार व तीन षटकार मारले. चहापानानंतर पावसामुळे बाकी खेळ होऊ शकला नाही. गोव्याने पंचांनी खेळ थांबविला तेव्हा पहिल्या डावात १ बाद २८ धावा केल्या होत्या.
सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर करुण ८६ धावांवर खेळत होता, त्याने रविवारी सकाळी ढगाळ वातावरणात शतकाच्या निर्धाराने फलंदाजी करताना सहकारी श्रेयस गोपाळ (५७ धावा, १०९ चेंडू, ६ चौकार, १ षटकार) याच्यासमवेत गोव्याच्या गोलंदाजांना दाद दिली नाही. त्यामुळे काल ५ बाद १२८ अशी घसरण झालेल्या कर्नाटकला सावरता आले. श्रेयसला विजेश प्रभुदेसाई बाद केल्यामुळे सहाव्या विकेटची ११७ धावांची भागीदारी संपुष्टात आली.
नंतर करुणला व्ही. वैशाख (३१) याची साथ लाभली. उपाहारापूर्वी वैशाखला फिरकी गोलंदाज दर्शन मिसाळने पायचीत बाद केल्यामुळे आठव्या विकेटसाठीची ६० धावांची भागीदारी तुटली. उपाहाराला खेळ थांबला तेव्हा करुण १४० धावांवर खेळत होता व कर्नाटकने ८ बाद ३३६ धावा केल्या होत्या. नंतर करुणने वेगाने धावा केल्या, पण तळाचे बाकी दोन फलंदाज जास्त प्रतिकार करू शकले नाहीत, त्यामुळे अनुभवी फलंदाजास द्विशतकासाठी २६ धावा कमी पडल्या.
रणजी करंडक स्पर्धेच्या अगोदरच्या लढतीत सौराष्ट्रविरुद्ध अनुक्रमे ७३ व ८ धावा केलेल्या ३३ वर्षीय करुणने १२२ व्या प्रथम श्रेणी सामन्यातील २५वे शतक पूर्ण केले. गोव्याविरुद्ध त्याचे हे पहिलेच रणजी करंडक शतक ठरले. मागील मोसमात विदर्भाकडून खेळल्यानंतर करुण यंदा पुन्हा आपल्या मूळ संघात परतला आहे.
यावर्षी जूनमध्ये इंग्लंड दौऱ्यावर केलेल्या भारताच्या कसोटी क्रिकेट संघात करुणनने तब्बल आठ वर्षांनंतर पुनरागमन केले होते, मात्र त्या दौऱ्यात त्याला चार सामन्यांत २५.६२च्या सरासरीने २०५ धावाच करता आल्या, त्यामुळे वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी त्याला वगळण्यात आले. आता गोव्याविरुद्ध दणकेबाज शतक ठोकून या अनुभवी फलंदाजाने राष्ट्रीय निवड समितीला दखल घेण्यास भाग पाडले आहे.
कर्नाटक, पहिला डाव (५ बाद २२२ वरुन) ः ११०.१ षटकांत सर्वबाद ३७१ (करुण नायर नाबाद १७४, श्रेयस गोपाळ ५७, व्ही. वैशाख ३१, अर्जुन तेंडुलकर २९-६-१००-३, वासुकी कौशिक २७.१-११-३५-३, विजेश प्रभुदेसाई २०-३-८६-१, दर्शन मिसाळ १८-०-७४-२, मोहित रेडकर ९-०-३५-०, सुयश प्रभुदेसाई ४-०-८-०, ललित यादव ३-०-१९-०).
गोवा, पहिला डाव ः १३ षटकांत १ बाद २८ (मंथन खुटकर ९, सुयश प्रभुदेसाई नाबाद ११, अभिनव तेजराणा नाबाद ८, अभिलाष शेट्टी १-९).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.