Ranji Trophy
पणजी: देशांतर्गत क्रिकेटमधील २०२५-२६ मोसमातील रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत गोव्याचा संघ एलिट ब गटात खेळणार असून सातपैकी तीन सामने घरच्या मैदानावर होतील. प्रतिस्पर्धी बलाढ्य असल्याने या लढतींत कस लागण्याचे संकेत आहेत.
रणजी करंडक एलिट गटातील मागील दोन मोसमात गोव्याची घरच्या मैदानावर स्पृहणीय नाही. २०२२-२३ व २०२३-२४ मोसमात मिळून एलिट गटातील सात सामने पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर झाले, त्यापैकी चार लढतींत हार पत्करावी लागली.
गतमोसमात (२०२४-२५) प्लेट गटातील प्रतिस्पर्धी तुलनेत कमजोर असल्यामुळे घरच्या मैदानावरील तिन्ही सामने गोव्याने दणक्यात जिंकले. त्यापैकी दोन सामने पर्वरी येथे, तर एक सामना कांपाल येथील पणजी जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर झाला.
सलामी घरच्या मैदानावर
यावेळी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील गोव्याचा एलिट ब गटातील पहिला सामना घरच्या मैदानावर खेळला जाईल. १५ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत चंडीगडविरुद्ध चार दिवसीय लढत होईल. याशिवाय मध्य प्रदेशविरुद्ध (८ ते ११ नोव्हेंबर) व केरळविरुद्ध (२९ जानेवारी ते १ फेब्रुवारी) सामना गोवा घरच्या मैदानावर खेळेल. याव्यतिरिक्त सौराष्ट्र, कर्नाटक, महाराष्ट्र व पंजाब या संघांविरुद्धचा रणजी सामना अवे मैदानावर खेळला जाईल.
गोव्यात यंदा एकूण ९ सामने
यंदा गोव्यात देशांतर्गत क्रिकेटमधील भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) स्पर्धांतील एकूण नऊ सामने खेळले जातील. यामध्ये रणजी करंडक, २३ वर्षांखालील कर्नल सी. के. नायडू करंडक व १९ वर्षांखालील कुचबिहार करंडक स्पर्धेतील प्रत्येकी तीन सामन्यांचे यजमानपद गोवा क्रिकेट असोसिएशन (जीसीए) भूषवेल. हे सर्व सामने प्रत्येकी चार दिवसीय असतील.
२०२५-२६ मध्ये गोव्यात होणारे बीसीसीआय सामने
रणजी करंडक एलिट
विरुद्ध चंडीगड: १५ ते १८ ऑक्टोबर
विरुद्ध मध्य प्रदेश: ८ ते ११ नोव्हेंबर
विरुद्ध केरळ: २९ जानेवारी ते १ फेब्रुवारी
२३ वर्षांखालील कर्नल सी. के. नायडू करंडक एलिट
विरुद्ध गुजरात: २६ ते २९ ऑक्टोबर
विरुद्ध बडोदा: २३ ते २६ जानेवारी
विरुद्ध पंजाब: ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी
१९ वर्षांखालील कुचबिहार करंडक एलिट
विरुद्ध आसाम: २३ ते २६ नोव्हेंबर
विरुद्ध उत्तर प्रदेश: १ ते ४ डिसेंबर
विरुद्ध चंडीगड: १६ ते १९ डिसेंबर
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.