
रिकाम्या खुर्चीवरून शोभा करून झाल्यावर आज कुठून सूर्य उगवला, असे आपण विचारणे रास्त आहे. आग विझवताना, धुराने चेहरा काळपट होणे व हाता पायाला चटके लावून घेणे, याची तयारी ठेवावी लागते. तसेच, धरणाची कवाडे उघडली की त्या प्रवाहात वाहून जाण्यापेक्षा पाणी ओसरण्याची वाट पाहावी लागते. पाणी पूर्ण ओसरलेले नसले तरी, ‘हा सूर्य, हा जयद्रथ’ करणे शक्य आहे.
रिकाम्या खुर्चीच्या मागे उभे असलेल्या मुख्यमंत्र्यांनी तिच्यावर हात ठेवून, ‘यापुढे तुम्ही कुणालाही घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी उभा आहे’ असा अप्रत्यक्ष संदेश गोमेकॉ डॉक्टरांना दिला. पण तो त्या अभूतपूर्व गोंधळात लोकापर्यंत पोहोचला नाही. डॉ. ऑस्कर रिबेलो म्हणतात तसे आरोग्यमंत्री गोमेकॉत वागले ते ‘टिपिकल विश्वजित’ पद्धतीचे होते. झाला प्रकार म्हणजे पुराणातील त्या शक्तिशाली शिवभक्ताने स्वत:च्या डोक्यावर हात ठेवून स्वत:ला भस्म केल्यासारखे झाले.
स्वत:च स्वत:ला लावलेल्या आगीतून एक होमखंडही तयार झाले, त्यात डॉ. रुद्रेश कुर्टीकरने स्वत:ची समिधा कितपर्यंत द्यायची याचे त्याच्यासमोर धर्मसंकट उभे झाले. समिधा टाकली की मोठा भडका उडणार हे ठरलेले, पण भडक्याचा त्याचा दाह पेलण्यासाठी ‘शकर’शक्ती गावातून आलेल्या साध्या डॉ. रुद्रेश कुर्टीकरपाशी आहे का, याचा विचार कुणाला करावा असे वाटले नाही.
हे न समजल्याने, आयता हातात आलेला ससा सोडून दिला, असा आरोप आमच्यावर होत आहे. शेवटच्या क्षणी मी डॉ. रुद्रेश कुर्टीकरच्या मदतीला गेलो, ते त्याचा शिक्षक या नात्याने. लोकांना वाटते की मी मध्येच येऊन त्याचा विश्वासघात केला, पण त्याला वाटते की त्याच्यासमोर एकाकी असहाय्य परिस्थितीत निर्माण झाली, त्यातून मी त्याची सुटका केली. वरवर पाहता हा विरोधाभास वाटेल, कारण गोव्यातूनच नव्हे तर जगभराच्या आभासी जगताचा पाठिंबा उपलब्ध असणारा माणूस अंतिम क्षणी एकाकी पडू शकतो, हे कुणालाही पटणारे नाही. मी घटनाक्रम सांगतो, निष्कर्ष तुम्ही काढा.
सगळेच मला सांगतात की मी त्यात मध्ये पडून शोभा करून घ्यायला नको होती. पण काही गोष्टी, आपण ठरवून करीत नाही. विधीसंकेताप्रमाणे घडून जातात. हेच पहा ना, ज्याच्या तक्रारीवरून हा सगळा प्रकार झाला, त्या पत्रकाराने मला आठ दिवसांआधी फोन केला होता. त्या दिवशी तो आपल्या सासूला घेऊन डॉ. बांदेकरच्या ओपिडीमध्ये थांबला होता व तेथे गर्दी आहे म्हणून मला फोन केला होता.
अर्थात त्या दिवशी मी माझ्या गोमेकॉतील ऑफिसमध्ये नव्हतो. ज्या दिवशी तो वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा या फोनची आठवण झाली व हाच तो पत्रकार हे जाणून घेण्यासाठी एक हवेत तीर मारला. मी त्याला फोन करून, ‘तू केले ते बेस्ट केले’ अशी गुगली घातली. त्यातून तो हरभरऱ्याच्या झाडावर चढला व सगळे सांगून मोकळा झाला. मी कधीही कुणाचे फोन रिकॉर्ड करीत नाही पण त्या दिवशी त्या अर्ध्या तासाचे संभाषण मोबाइलमध्ये रिकॉर्ड झाले. या रिकॉर्डिंगचे महत्त्व मी पुढे सांगतो.
त्यानंतर डॉ. रुद्रेशच्या सहकाऱ्यांना फोन करून, आपल्यासोबत मीही आहे हे सांगून टाकले. डॉ. रुद्रेशकडे बोललो तेव्हा ते कॅज्युअलिटी पुढील ‘बांबोळेश्वर’ वडासमोर उभे होते. मी त्याला सांगितले की आपल्यामागे किती डॉक्टर उभे राहतील हे सांगता येत नाही, पण तूर्तास कुटुंबीयांना विश्वासात घे व स्वत:ला सावरून घे. डॉ. रुद्रेश देव-देवस्की मानत नाही पण देवाला मानतात.
असंख्य घंटा बांधलेल्या त्या ‘बांबोळेश्वर’ची किमया बघा; संपूर्ण जग डॉ. रुद्रेशच्या पाठीशी उभे केले व शक्तिशाली ‘बाबा’ला गुडघ्यावर आणले. देवाने दिले म्हणून त्यातील किती घ्यायचे याला मर्यादा असतात. ही मर्यादा डॉ. रुद्रेशला शेवटच्या क्षणी राखावी लागली. सर्वांत आधी, भारतीय वैद्यकीय संघटनेच्या गोवा शाखेचे अध्यक्ष डॉ. दत्ताराम देसाई यांनी निषेध नोंदविला.
या आंदोलनाचे नियोजन त्यांच्या हातून घडले असते तर मला मध्ये पडायची गरज भासली नसती. एरवी गोमेकॉसंबंधित काही विषय असेल तर डॉ. अजय पेडणेकर माझ्याशी विचारपूस करून विषय समजून घेतात, पण त्याच रात्री त्यांना पत्नीवियोग झाल्याने आमच्यात याविषयी चर्चा झाली नाही. मी गृहीत धरले की गार्ड आंदोलनासाठी पुढे आला तर डॉ. दत्ताराम देसाई यांना नक्कीच विश्वासात घेतील. येथे संजीता वहिनीचा वियोग आम्हा सर्वांसाठी धक्का होता, त्यामुळे दुपारपर्यंत डॉ. रुद्रेशपाशी बोलणे झाले नाही.
मागाहून, मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून डॉ. रुद्रेशना निलंबन न करण्याचे जाहीर केले असल्याचे कळले. या हस्तक्षेपाचे श्रेय डॉ. रुद्रेशचे कुटुंबीय, त्याचे विभाग सहकारी व सोशल मीडियावरून निर्माण झालेला दबाव यांना जाते, असे मी मुद्दाम नमूद करीत आहे. संध्याकाळपर्यंत गार्डने आंदोलनाची घोषणा केली, गोमेकॉतील शिक्षक डॉक्टराचा एक मोठा व्हॉटसअॅप ग्रुप तयार झाला.
गार्डने आयएमएऐवजी ‘फायमा’ म्हणून कुठल्यातरी (गोव्यात कुणीही नाव न ऐकलेल्या) निवासी डॉक्टरांना मदत करणाऱ्या एका राष्ट्रीय पातळीवरील संस्थेचे आंदोलनास मार्गदर्शन व समर्थन घेतले. सूर्यास्तापर्यंत सोमवारी वणवा पेटणार असे चित्रा तयार झाले. ‘टिपिकल विश्वजित स्टाइल’मध्ये प्रशासकीय पातळीवर गट तयार करणाऱ्यांना दमदाटी झाली, डीनमार्फत डॉ. रुद्रेश व गार्ड पदाधिकाऱ्यांना बंगल्यावर भेटीचे ‘समन्स’ पाठविणे झाले.
पण पुष्कळ काळानंतर पहिल्यांदाच या ‘समन्स’ला सर्वांनी ठेंगा दाखविला. मंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे बहुधा त्यांना ही धिटाई आली असावी. परिणामी, त्याच मध्यरात्री डीन व दोन मेडिकल सुपरिटेडन्ट यांच्या साक्षीत तयार झालेली ‘टिपिकल विश्वजित स्टाइल’ सार्वजनिक माफी प्रसारित झाली व सोमवारच्या सूर्योदयासोबत ती सर्वांच्या मोबाइलवर पोहोचली. मी अंथरुणात असतानाच डॉ. रुद्रेशची विचारपूस केली.
मी त्याला मंत्र्यांनी त्याची चूक मागितली म्हणून अभिनंदन केले. आता संभाव्य आंदोलनाचे काय होणार हा प्रश्न होता. मी डॉ. रुद्रेशला म्हटले की, ‘गार्डला आंदोलन करायचेच असेल तर, दोन मागण्या ठेवायला सांग. पहिली मागणी, व्हिडिओ रिकॉर्डिंग करून व्हायरल करणाऱ्या विरुद्ध पोलिस तक्रार व दुसऱ्या मागणीनुसार, शिष्टाचाराप्रमाणे घडल्याजागी जाऊन ‘सीएमओ’ची माफी मागणे’.
सकाळी नऊला कॉलेज उघडले ते आंदोलनाचे पंख घेऊन. विद्यार्थी, प्रशिक्षणार्थी व निवासी डॉक्टर पूर्ण आवेशात; तर वरिष्ठ शिक्षक वर्ग पूर्वीच्याच दडपणाच्या छायेत. त्यातही माझे समवयस्क काही शिक्षक-डॉक्टर, नव्या पिढीच्या शिक्षकांना घेऊन मैदानात उतरले. त्यांनी गोमेकॉ डीनची उघडपणे झाडाझडती घेतली. वरील दोन मागण्यांसह एक मागणीपत्र तयार झाले व प्रसारमाध्यमांसमोर जाहीर केले. येथे वरिष्ठांकडून मार्गदर्शन न मिळाल्याने डॉ. रुद्रेशला धर्मसंकटात टाकणारा प्रकार घडला.
प्रत्यक्ष भेट घेऊन माफीची मागणी, डॉ. रुद्रेशसाठी करायला हवी होती. पण तसे न होता, हे डॉ. रुद्रेश करीत आहे असेच चित्र पुढे आले. त्याचा परिणाम, अंतिम मोक्याच्या क्षणी, आंदोलन पुढे ताणावे की येथेच संपवावे, याचा निर्णय घेण्याची जबाबदारी एकट्या डॉ. रुद्रेशवर येऊन पडली. सोमवारी रात्री मुख्यमंत्र्यांनी शिष्टाईची बैठक घेतली तेव्हा, मुख्यमंत्र्यानी मंत्र्यांऐवजी मी स्वत: कॅज्युअल्टीत येतो असे सांगितल्याने डॉ. रुद्रेशवर प्रचंड भावनिक दबाव आला. ‘सर, येथे येऊन आम्हांला मार्गदर्शन करा’ अशी विनंती केल्याने मला तेथे जावे लागले.
मुख्यमंत्री कॅज्युअल्टीमध्ये सर्वांना हस्तांदोलन करून गेले तर ‘सीएमओ’ डॉक्टरांची समजूत काढून गेले असे होईल, असे आम्हांला वाटले. मुख्यमंत्री तेथे येणार म्हणून डॉ. रुद्रेशचे सहकारी समाधानी होते, तर माफीनामा नाही झाला तर सहकाऱ्यांना कसे समजवायचे हा प्रश्न तेथे आलेल्या काही गार्डच्या पदाधिकाऱ्यांना होता. मी त्यांना एक प्रस्ताव दिला की मी प्रयत्न करू शकतो पण एक अट आहे की मुख्यमंत्र्यांआधी, ज्या आमच्या वरिष्ठांच्या मौनसंमतीमुळे मंत्री असे धाडस करतात, त्या वरिष्ठांची मी झडती घेणार.
योग्य नियोजन करायला वेळ नसल्याने, चांगले झाले तर सर्वांचे, बिनसले तर जबाबदारी माझ्यावर, असा आमच्यात समझोता झाला. अंतिम क्षणी कळले की मुख्यमंत्री कॅज्युअल्टीमध्ये येत नाहीत. तेथील चर्चा झाल्यावर मुख्यमंत्री येथे येतील म्हणून आम्ही कॅज्युअल्टीमध्ये थांबलो. आता, माफीनाम्यावरून डॉ. रुद्रेश व त्यांचे सहकारी एकाकी पडल्याचे स्पष्ट झाले. ते कॅज्युअल्टीमध्ये येत नसतील तर खुर्चीच्या प्रतीकात्मक स्वरूपात कॅज्युअल्टीच मुख्यमंत्र्यासमोर नेण्याचे ठरले. अजून विचार करायला वेळ नव्हता म्हणून जाताना खुर्चीच घेऊन तेथे गेलो.
संधी मिळाली तर, सर्वांसमोर मुख्यमंत्र्यांकडून प्रतीकात्मक स्वरूपात का होईना, माफी घ्यायचीच. आम्ही तेथे पोहोचलो तेव्हा, आमच्या एकमेव विषयाचे त्रांगडे झाले होते. डॉ. रुद्रेशने आपल्यावतीने मी बोलणार असे मुख्यमंंत्र्यांना सांगितले. येथे मी ‘शिष्टाचार व विधिनियम’ यांच्या चौकटीत माफीचा मुद्दा लावून धरला. फक्त मंत्रीच नव्हे तर त्यांना मूकसंमती देणाऱ्या आपल्या वरिष्ठांनीही माफी मागणे ही आमची नैतिक जबाबदारी हा मुद्दा आणताच मुख्यमंत्र्यांना बॅकफूटवर जावे लागले.
डीन डॉ. बांदेकरना मी त्यांच्या नैतिक जबाबदारीविषयी मुख्यमंत्र्यांसमोर सुनावले. गार्ड व मुख्यमंत्री यांच्यात ‘आईस ब्रेकिंग केले’ व त्यांच्या प्रत्येक सूचना, मागणी ‘शिष्टाचार व विधिनियम’ चौकटीत बसवून उघडपणे मी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवल्या. मुख्यमंत्र्यांनीही त्याच धर्तीवर त्यांचे समाधान केले. प्रतीकात्मक माफीला सामोरे जायला मुख्यमंत्री तयार झाले. त्यामुळेच संप मागे घेण्यावर सहमती झाली. आत ठरलेला प्लॅन असा होता की आधी डॉक्टरचा कोट सर्वांनी खांद्यावर ठेवून वरिष्ठांच्यावतीने प्रत्यक्ष कृतीतून सरकारचा निषेध करायचा व लगेच डॉ. रुद्रेशला खुर्चीवर बसवून मुख्यमंत्र्यांना बोलायला लावायचे.
तसे झाल्यास मुख्यमंत्र्यांना स्पष्ट शब्दात माफी मागण्याशिवाय पर्याय राहिला नसता. पण, पहिला टप्पा यशस्वी होतो असे दिसतानाच, एका निवासी महिला डॉक्टरने तोंड उघडले व सर्व केलेल्यावर पाणी फिरविले. तरीही मुख्यमंत्र्यांनी, परिस्थिती सांभाळून घेत, त्या खुर्चीवर हात ठेवून, आपण येथल्या ‘खुर्ची’च्या मानसन्मानाची जबाबदारी घेतो, असे उघडपणे सांगितले.
मंत्र्यांच्या कृपादृष्टीवर ‘कार्यकारी डीन’ म्हणून दिवस काढीत असलेल्या डॉ. बांदेकर यांना मुदतवाढ दिली जाणार की नाही, यावरून मुख्यमंत्री खरेच मनातून बोलले की वरचेवर, हे ठरणार आहे. एक घाव दोन तुकडे करणारा लेख उद्याच्या अंकात!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.