पणजी: स्नेहल कवठणकरच्या नाबाद दीडशतकानंतर गोलंदाजांनी कामगिरी चोख बजावल्यामुळे गोव्याला रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मोसमातील पहिल्या विजयाची चाहूल लागली आहे. त्यांनी बिहारवर फॉलोऑन लादल्यानंतर दुसऱ्या डावातही पकड घट्ट केली.
कांपाल येथील पणजी जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर सुरू असलेल्या एलिट ‘अ’ गट सामन्यात गोव्याने दुसऱ्या दिवशी मंगळवारी सर्वबाद ३९७ धावा केल्या. नंतर त्यांनी बिहारचा पहिला डाव १०७ धावांत गुंडाळला. गोव्याने एकूण २९० धावांच्या आघाडीसह प्रतिस्पर्ध्यांवर फॉलोऑन लादला.
सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर ललित यादव व यश कसवणकर या ऑफस्पिनरद्वयीने बिहारची ३ बाद ६३ अशी स्थिती केली होती. पाहुणा संघ अजून २२७ धावांनी मागे आहे. जम बसवू पाहणाऱ्या आयुष लोहारुका (४७) याला कसवणकरने बाद केल्याने बिहारला धक्का बसला. त्याने खलिद आलम (११) याच्यासमवेत दुसऱ्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी केली.
पहिल्या डावात बिहारचा उपकर्णधार सकिबुल गनी याचा क्षेत्ररक्षण करताना घोटा मुरगळला, त्यामुळे त्याला चाचणीसाठी इस्पितळात न्यावे लागले व तो फलंदाजीस उतरू शकला नाही. चहापानानंतर सात मिनिटांतच बिहारला फॉलोऑन मान्य करावा लागला. स्नायू दुखावल्यामुळे सातव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या कर्णधार मंगल महरौर याने २५ धावा केल्यामुळे बिहारला ७ बाद ७८ वरून शतकी मजल गाठता आली. गोव्यातर्फे यश कसवणकर व वासुकी कौशिक यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले.
स्नेहलचे नाबाद दीडशतक
त्यापूर्वी, पहिल्या दिवसअखेर ११६ धावांवर नाबाद असलेल्या स्नेहल कवठणकरने नाबाद १७८ धावा केल्या. त्याने २८२ चेंडूंचा सामना करताना १७ चौकार लगावले. स्नेहलने दर्शन मिसाळ याच्यासमवेत सातव्या विकेटसाठी १२० धावांची भागीदारी केली. २५वे रणजी अर्धशतक केलेल्या दर्शनने १०७ चेंडूंत चार चौकार व एका षटकारासह ५३ धावा केल्या. बिहारचा ऑफस्पिनर सूरज कश्यप याने ९० धावांत ५ गडी बाद केले. रणजी करंडक स्पर्धेतील सातवा सामना खेळताना प्रथमच डावात पाच विकेट्स टिपण्याची किमया त्याने साधली.
स्नेहलच्या सातव्यांदा डावात दीडशेपेक्षा जास्त धावा
२२५ : विरुद्ध हरियाना (गाझियाबाद) २०१६-१७
१७९ : विरुद्ध मेघालय (पर्वरी) २०१९-२०
नाबाद १६५ : विरुद्ध ओडिशा (अहमदाबाद) २०२१-२२
२५० : विरुद्ध मिझोराम (अहमदाबाद) २०२४-२५
नाबाद ३१४ : विरुद्ध अरुणाचल प्रदेश (पर्वरी) २०२४-२५
नाबाद २०२ : विरुद्ध नागालँड (सोविमा) २०२४-२५
नाबाद १७८ : विरुद्ध बिहार (पणजी) २०२६-२७
संक्षिप्त धावफलक
गोवा, पहिला डाव (६ बाद २८८ वरून) : ११९.४ षटकांत सर्वबाद ३९७ (स्नेहल कवठणकर १७८, दर्शन मिसाळ ५३, ऋत्विक नाईक ३, हेरंब परब ०, वासुकी कौशिक १४, वासुदेव प्रसाद सिंग २-६९, सूरज कश्यप ३२.४-३-९०-५, सुमन कुमार २-७६).
बिहार, पहिला डाव : २६.१ षटकांत सर्वबाद १०७ (आयुष लोहरुका १९, खलिद आलम २०, पृथ्वी राज २३, मंगल महरौर २५, यश कसवणकर ८-१-४६-३, वासुकी कौशिक ७-४-१२-३, ऋत्विक नाईक ५-१-२५-१, हेरंब परब ५-१-१४-१, दर्शन मिसाळ १-०-१-०, ललित यादव ०.१-०-०-१)
बिहार, दुसरा डाव (फॉलोऑननंतर) : २२ षटकांत ३ बाद ६३ (आयुष लोहारुका ४७, खलिद आलम ११, ललित यादव ९-२-१७-२, वासुकी कौशिक ४-१-१४-०, हेरंब परब ३-०-७-०, दर्शन मिसाळ ३-०-१५-०, यश कसवणकर ३-०-१०-१).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.