

एका चांगल्या उद्देशाने राजकारणात उतरलेल्या तरुणांची ऊर्जा अशा अंतर्गत संघर्षात खर्च होणे दुर्दैवी आहे. ‘खरी आरजी कोणती?’ यापेक्षा पक्षातील नेते एकत्र राहू शकतात का, हे मतदार पाहतील.
राजकारणात शब्द हेच शस्त्र. त्यातून विरोधकांवर टीका होते. विचारांची लढाई लढली जाते. नेतृत्वाची उंचीही ठरते. मात्र, देशाच्या राजकारणात संसद असो वा निवडणुकीचे व्यासपीठ, वैचारिक विरोधाचे रूपांतर अनेकदा वैयक्तिक शेरेबाजीत होते. मुद्दे मागे पडतात. भाषेची पातळी घसरते. गोव्याच्या राजकारणातही याचे प्रत्यंतर अनेकदा आले आहे. रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षातील संघर्षाने पुन्हा एकदा याची प्रचिती दिली आहे.
गोमंतकीयांच्या हितासाठी स्थापन झालेल्या ‘आरजी’ने अल्पावधीतच जनतेच्या मनात स्थान निर्माण केले. तरुणांचा मोठा पाठिंबा लाभलेल्या या पक्षाला वीरेश बोरकर यांच्या रूपाने पहिला आमदार मिळाला. तत्कालीन पक्षाध्यक्ष मनोज परब विधानसभेबाहेर आंदोलनांच्या माध्यमातून लढत होते, तर बोरकर सभागृहात जनतेचे प्रश्न मांडत होते. या जोडीतून पक्षाने आपली ओळख निर्माण केली. मात्र, पुढे वर्चस्वाच्या संघर्षातून पक्षात फूट पडली. आज वीरेश बोरकर आणि अजय खोलकर गटांतील संघर्षाने पक्षाची प्रतिमा डागाळली आहे.
तरुणांच्या आशा-आकांक्षांचे प्रतिनिधित्व करणारा पक्ष आपापसांतील वादात गुरफटणे ही खचितच अभिमानाची बाब नाही. मतभेद राजकारणाचा भाग आहे; पण त्यातून वैयक्तिक अवमानापर्यंत घसरणे हा नेतृत्वाचा पराभव असतो. बोरकर गटाच्या शविना शिरोडकर यांच्याविषयी अजय खोलकर यांनी केलेले कथित आक्षेपार्ह वक्तव्य याच घसरलेल्या राजकीय पातळीचे उदाहरण आहे. महिला नेत्याविषयी बोलताना भाषेची मर्यादा तर अधिक महत्त्वाची. खोलकर यांनी माफी मागितली तरी दुखावलेला स्वाभिमान व गमावलेला विश्वास सहज परत मिळत नाही.
‘बुंद से गई, हौद से नहीं आती’. या प्रकरणी पोलिसांत तक्रारीही दाखल झाल्या. पक्षांतर्गत संघर्ष आता पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचणे ही पक्ष प्रतिमेसाठी चांगली बाब नाही. राजकारणात परिपक्वता ही नेतृत्वाची खरी कसोटी असते. जिभेवर लगाम व डोक्यावर बर्फ ठेवून परिस्थिती हाताळणारा नेता टिकतो. प्रत्येक टीकेला वैयक्तिक उत्तर देणे म्हणजे राजकीय कर्तृत्व नव्हे. मुत्सद्दीपणा आणि संयमातून नेतृत्वाची विश्वासार्हता तयार होते. गोव्यात यापूर्वीही अनेक बड्या नेत्यांना बेताल वक्तव्यांचा फटका बसला आहे. पदाने मोठे असो वा सामान्य कार्यकर्ते, सार्वजनिक बोलण्यात भाषेचे भान सर्वांनाच हवे.
नेत्याच्या वक्तव्याचा परिणाम त्याच्या वैयक्तिक प्रतिमेपुरता मर्यादित राहत नाही; तो पक्षाच्या प्रतिमेवरही होतो. एका चांगल्या उद्देशाने राजकारणात उतरलेल्या तरुणांची ऊर्जा अशा अंतर्गत संघर्षात खर्च होणे दुर्दैवी आहे. आगामी निवडणुकीत आरजीवरील विश्वास टिकवण्याचे आव्हान पक्षापुढे आहे. ‘खरी आरजी कोणती?’ याहून पक्षातील नेते एकत्र राहू शकतात का, हे मतदार पाहतील. मतभेदांतच अडकलेल्या नेत्यांकडून जनतेच्या समस्यांवर एकत्रितपणे कामाची अपेक्षा कितपत ठेवायची? आरजीशी हातमिळवणी केलेल्या काँग्रेसचीही अवस्था वेगळी नाही.
आरजीतील फूट कायम राहिली तर काँग्रेसच्या वाट्याला एकाच पक्षाच्या दोन गटांशी युती करण्याचा दुहेरी योग येईल. असो... राजकारणात शब्दांची ताकद जाणावी. त्यातून विश्वास निर्माण होतो, तो गमावण्याची वेळही येते. आरजी नेत्यांनी यात पक्षाची विश्वासार्हता किती पणाला लावली आहे, याचा फैसला मतदार करतीलच. तोवर राजकीय लढाई मुद्द्यांवर लढा; शब्दांची घसरगुंडी करून नव्हे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.