पणजी: गोव्याच्या रणजी करंडक क्रिकेट संघात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. महाराष्ट्राविरुद्धच्या एलिट ब गट सामन्यासाठी पंधरा सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला असून चौघांना वगळण्यात आले.
गोवा व महाराष्ट्र यांच्यातील चार दिवसीय सामना २२ ते २५ जानेवारी या कालावधीत पुणे येथे खेळला जाईल. स्नेहल कवठणकर कर्णधारपदी कायम असून अष्टपैलू दीपराज गावकर उपकर्णधार आहे. सलामीचा २४ वर्षीय डावखुरा फलंदाज महंमद अझान थोटा संघातील नवा चेहरा आहे. तो एकदिवसीय संघात होता.
२४ वर्षीय वेगवान गोलंदाज शुभम तारी ऑक्टोबर २०२४ मध्ये अखेरचा सामना खेळल्यानंतर रणजी करंडक संघात परतला आहे. तो यंदा टी-२० व एकदिवसीय स्पर्धेत खेळला होता. सौराष्ट्रविरुद्धचा मागील सामना दुखापतीमुळे मुकलेला यष्टिरक्षक समर दुभाषी याचेही संघात पुनरागमन झाले आहे. ऑफस्पिनर मोहित रेडकर याला संघात स्थान मिळू शकलेले नाही.
मागील पाच रणजी सामन्यांत त्याने सात गडी बाद केले आहेत. मोहित एकदिवसीय संघातही नव्हता. डावखुरा फिरकी गोलंदाज विकास सिंग यालाही निवडण्यात आलेले नाही. टी-२० व एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत विकास छाप पाडू शकला नव्हता.
यंदा मोसमात रणजी करंडक स्पर्धेत प्रत्येकी एक सामना खेळलेले हेरंब परब व विजेश प्रभुदेसाई या मध्यमगती द्वयीस संधी मिळालेली नाही. एलिट ब गटात महाराष्ट्राचा संघ पाच सामन्यांतून १८ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर गोव्याने एक विजय, दोन पराभव व दोन अनिर्णित या कामगिरीसह ११ गुण प्राप्त केले असून ते पाचव्या क्रमांकावर आहेत.
संघ असा ः मंथन खुटकर, सुयश प्रभुदेसाई, अभिनव तेजराणा, स्नेहल कवठणकर (कर्णधार), ललित यादव, दीपराज गावकर (उपकर्णधार), राजशेखर हरिकांत, वासुकी कौशिक, अर्जुन तेंडुलकर, शुभम तारी, दर्शन मिसाळ, अमूल्य पांड्रेकर, समर दुभाषी, कश्यप बखले, महंमद अझान थोटा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.