पणजी: राज्याचे नवे क्रीडा धोरण या वर्षी डिसेंबरअखेरपर्यंत तयार करण्यात येईल, अशी घोषणा गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक अजय गावडे यांनी सोमवारी पदभार स्वीकारताना केली. नवी जबाबदारी स्वीकारल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांच्याकडे क्रीडा व युवा व्यवहार खात्याचे संचालकपदही आहे.
गोव्याचे सध्याचे क्रीडा धोरण २००९ साली लागू करण्यात आले होते. त्यानंतर १६ वर्षे त्यात बदल झालेला नाही. ‘‘२००९ नंतर बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत. आता तब्बल १६ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर राज्याचे क्रीडा धोरण मार्गी लागत आहे हे सुचिन्ह आहे. सर्व भागधारकांना विश्वासात घेऊन डिसेंबरपर्यंत ते आखले जाईल.
त्याचप्रमाणे गोवा हे क्रीडा पर्यटन स्थळ म्हणून नावारुपास यावे यासाठीही विशेष प्रयत्न केले जातील,’’ असे अजय गावडे म्हणाले. आगामी धोरणात क्रीडा क्षेत्राचा सर्वांगीण विकास, प्रशिक्षणाचा दर्जा वाढवणे, पायाभूत सुविधांची योग्य देखभाल सुनिश्चित करणे, क्रीडा उपकरणे व्यवस्थापन सुधारणे अशा मुद्यांवर लक्ष केंद्रित केले जाईल.
‘‘भारत सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘खेल नीती २०२५’ची अंमलबजावणी केलेली आहे. या योजनेतील धोरणांचा प्रत्येक राज्यातील क्रीडा धोरणात कसा समावेश करता येईल याबाबत विचार करण्याची सूचना केंद्र सरकारने केलेली आहे. त्यानुसार राज्य क्रीडा धोरणात दुरुस्ती करण्यास सांगितले आहे,’’ अशी माहिती क्रीडा संचालक गावडे यांनी दिली.
गोव्यात हडफडे येथे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये फिडे विश्वकरंडक बुद्धिबळ स्पर्धा होणार आहे. आशियाई जिम्नॅस्टिक स्पर्धेचे यजमानपदही गोव्याला मिळाले आहे.
१४ ऑक्टोबर रोजी एएफसी आशिया करंडक फुटबॉल स्पर्धेचा क गट पात्रता फेरीतील भारत व सिंगापूर यांच्यातील सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होणार आहे. गोवा फुटबॉल असोसिएशनची भाऊसाहेब बांदोडकर मेमोरियल ट्रॉफी फुटबॉल स्पर्धा होणार असून त्यात परदेशी संघांचा समावेश आहे. या साऱ्या प्रमुख स्पर्धांच्या सुसूत्र आयोजनावर भर राहील असेही अजय गावडे यांनी नमूद केले.
१.गोव्याच्या ‘बक्षी बहाद्दर जिवबादादा केरकर’ राज्य क्रीडा पुरस्काराचे अखेरच्या वेळेस २५ जानेवारी २०१८ रोजी वितरण तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर, तसेच माजी क्रीडामंत्री मनोहर (बाबू) आजगावकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. तेव्हा २००२ ते २०१४ या कालावधीतील रखडलेले पुरस्कार क्रीडापटू व आयोजकांना देण्यात आले होते, त्यानंतर या पुरस्कारांची ‘फाईल’ उघडण्यात आलेली नाही.
२.१९७१-७२ ते २०१४ पर्यंत १७१ जण या प्रतिष्ठेच्या केरकर पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. ‘हा पुरस्कार पुन्हा देण्यासाठी प्रयत्न होतील व संबंधित प्रक्रिया सुरू केली जाईल,’ असे आश्वासन अजय गावडे यांनी दिले.
३ .राज्य सरकारचा दिलीप सरदेसाई क्रीडा उत्कृष्टता पुरस्कार २००८-०९ ते २०१७-१८ या कालावधीत देण्यात आला असून आतापर्यंत गोव्याचे नऊ आंतरराष्ट्रीय खेळाडू मानकरी ठरले आहेत, अखेरच्या वेळेस २९ ऑगस्ट २०१८ रोजी पुरस्काराचे वितरण झाले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.