T20 Cricket Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

T20 Cricket: हातातला विजय गोव्याने गमावला! अखेरच्या षटकात फेलिक्सची गोलंदाजी महागात, छत्तीसगडचा विजय

Goa vs Chhattisgarh T20 Match: मध्यमगती गोलंदाज वासुकी कौशिक याने १९व्या षटकात फक्त सहा धावा दिल्या तेव्हा गोव्याला सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेतील पहिला विजय खुणावू लागला.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: मध्यमगती गोलंदाज वासुकी कौशिक याने १९व्या षटकात फक्त सहा धावा दिल्या तेव्हा गोव्याला सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेतील पहिला विजय खुणावू लागला; पण अखेरच्या षटकातील पाच चेंडूंवर फेलिक्स आलेमाव याने दोन षटकारांसह तब्बल १६ धावा दिल्यामुळे अखेर पराभव ओढवून घ्यावा लागला.

स्पर्धेच्या एलिट ‘ड’ गटातील लढतीत छत्तीसगडने मंगळवारी गोव्याला चार विकेट्स व शेवटचा चेंडू राखून हरविले. कोलकता येथील जादवपूर विद्यापीठ कॅम्पस मैदानावर सामना झाला. गोव्याचा हा स्पर्धेतील पाचवा पराभव ठरला. त्यांच्या खाती सहा लढतींतून फक्त दोन गुण आहेत. त्यांचा गट साखळीतील अखेरचा सामना २६ रोजी गुजरातविरुद्ध होईल. छत्तीसगडने स्पर्धेतील तिसऱ्या विजयाची नोंद केली. त्यांचे सहा लढतीनंतर १४ गुण झाले आहेत.

गोव्याने प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर ६ बाद १९७ धावा केल्या. कर्णधार अभिनव तेजराणा (६२, ३३ चेंडू, ५ चौकार, ४ षटकार) व ललित यादव (५७, ३६ चेंडू, ६ चौकार, २ षटकार) यांनी आक्रमक अर्धशतके नोंदविताना दुसऱ्या विकेटसाठी ५४ चेंडूंतच १०२ धावांची भागीदारी केली. मात्र, नंतर गोव्याच्या धावगतीला अपेक्षित वेग मिळाला नाही, त्यामुळे दोनशे धावा पार करणे शक्य झाले नाही.

छत्तीसगडचा अनुभवी फलंदाज सलामीचा अमनदीप खरे याने तुफानी शतक झळकावताना ६२ चेंडूंत नऊ चौकार व सात षटकारांसह ११६ धावा केल्या, तरीही त्यांचा डाव गडगडला. खरे याला वासुकी कौशिकने दीपराज गावकर याच्याकरवी झेलबाद केले. २७ धावांत पाच विकेट गमावल्यामुळे छत्तीसगडची घसरगुंडी उडाली. मात्र, फेलिक्स आलेमाव याची अखेरच्या षटकात दिशा भरकटल्यामुळे गोव्याला विजय शक्य झाला नाही.

संक्षिप्त धावफलक

गोवा : २० षटकांत ६ बाद १०६ (अझान थोटा ५, अभिनव तेजराणा ६२, ललित यादव ५७, सुयश प्रभुदेसाई १४, दीपराज गावकर नाबाद २३, विकास सिंग १४, शिवेंद्र भुजबळ ४, दर्शन मिसाळ नाबाद ६, विजय यादव ३-०-२२-३) पराभूत वि. छत्तीसगड : १९.५ षटकांत ६ बाद १९७ (अमनदीप खरे ११६, देव आदित्य सिंग नाबाद २४, विजय यादव नाबाद १२, फेलिक्स आलेमाव २.५-०-४१-०, वासुकी कौशिक ४-०-३६-२, शुभम तारी ४-०-३९-३, ललित यादव ३-०-२७-१, दर्शन मिसाळ १-०-१२-०, विकास सिंग ३-०-२४-०, दीपराज गावकर २-०-१७-०).

Delhi Crime: ज्या सहकाऱ्यांसोबत पार्टी केली, तेच बनले सैतान! दिल्लीतील कॅफेत 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार; दोघांना अटक अन् तिघांचा शोध सुरु

School Without Walls: मोबाईलच्या दुनियेत हरवली बिनभिंतीची शाळा; निसर्गाकडून शिकण्याची संधीच कमी झाली!

25 नोव्हेंबर 1510... तो दिवस, जेव्हा 'जुने गोवे' पोर्तुगीजांच्या ताब्यात गेले!

Vaibhav Sooryavanshi: 30 मिनिटांची चर्चा अन् रेकॉर्डब्रेक खेळी! वैभव सूर्यवंशीने युवराज सिंगला दिले द्विशतकाचे श्रेय; म्हणाला, 'युवी सरांशी बोलल्यानंतर...'

Drug Trafficking: दक्षिण गोव्यात ड्रग्जविरोधात पोलिसांची धडक! 11 दिवसांत 6 गुन्हे, 9 जणांना अटक

SCROLL FOR NEXT