पणजी: आर्यन नार्वेकर याच्या झुंझार फलंदाजीमुळे १५२ धावांच्या पिछाडीनंतरही गोव्याने कर्नल सी. के. नायडू करंडक २३ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत दिल्लीविरुद्धचा सामना अनिर्णित राखला. पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर झालेल्या चार दिवसीय सामन्यात आर्यन याने पहिल्या डावातील ९३ धावांनंतर दुसऱ्या डावात चिवट नाबाद ६१ धावा करून संघाला वाचविले.
गोव्याने अखेरच्या दिवशी दुसऱ्या डावात २५१ धावा केल्या, त्यामुळे त्यांच्यापाशी ९९ धावांची आघाडी जमा झाली. विजयासाठी आवश्यक १०० धावांकरता दिल्लीपाशी पुरेसा वेळ नव्हता. या लढतीतून पहिल्या डावातील दीडशतकी आघाडीसह दिल्लीला १०, तर गोव्याला सहा गुण मिळाले. दिल्लीचे आता दोन अनिर्णित व एक पराभव या कामगिरीसह २८ गुण झाले आहेत, तिन्ही सामने अनिर्णित राखलेल्या गोव्याचे २२ गुण झाले आहेत. त्यांचा पुढील सामना आठ नोव्हेंबरपासून राजकोट येथे सौराष्ट्रविरुद्ध खेळला जाईल.
आर्यनने दुसऱ्या डावातील जिगरबाज खेळीत १४३ चेंडूंचा सामना करताना नऊ चौकार व एक षटकार मारला. अंधूक प्रकाशाचा व्यत्यय आल्यानंतर बुधवारी खेळास उशिरा सुरवात झाली. अझान थोटा (२१) व देवनकुमार चित्तेम (४८) यांनी गोव्याला ४७ धावांची सलामी दिली, पण नंतर डाव ४ बाद ११७ असा घसरला.
देवन व आर्यन यांनी पाचव्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी केली. देवनला रौनक वाघेला याने बाद केले. यावेळी गोव्यापाशी फक्त १९ धावांची आघाडी होती व पाच विकेट बाकी होत्या. आर्यनने सनथ नेवगी (२८) व लखमेश पावणे (२४) यांच्यासमवेत खिंड लढवत दिल्लीला विजयासाठी सोपे आव्हान मिळणार नाही याची दक्षता घेतली व संघाची आघाडी वाढवली. अखेरच्या सत्रात सूर्यप्रकाश कमी होत असताना सामना अनिर्णितावस्थेकडे झुकला.
गोवा, पहिला डाव ः ३३७ व दुसरा डाव (बिनबाद ४ वरून) ः ७२.२ षटकांत सर्वबाद २५१ (अझान थोटा २१, देवनकुमार चित्तेम ४८, कौशल हट्टंगडी २८, मयूर कानडे ०, शिवेंद्र भुजबळ ३४, आर्यन नार्वेकर नाबाद ६१, सनथ नेवगी २८, लखमेश पावणे २४, शदाब खान १, शिवम प्रताप सिंग ०, रुद्रेश शर्मा ०, आयुष सिंग १-४३, रौनक वाघेला ४-५२, यतीश सिंग ३-८३, हार्दिक शर्मा २-०). दिल्ली, पहिला डाव ः ७ बाद ४८९ घोषित.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.