पणजी: एफसी गोवा संघात या वर्षी जानेवारीत दाखल झालेल्या स्पॅनिश बोर्हा हेर्रेरा याच्यावर पुन्हा विश्वास प्रदर्शित करण्यात आला. संघाने त्याला २०२४-२५ मोसमासाठी कायमस्वरुपी करारावर कायम राखले.
हेर्रेराच्या करारासह एफसी गोवा संघातील परदेशी खेळाडू कोटा पूर्ण झाला. संघाने कार्ल मॅकह्यू, ओडेई ओनाइंडिया यांनाही कायम राखले असून इकेर ग्वॉर्रोचेना, देयान द्राझिच व आर्मांदो सादिकू हे नवे परदेशी आहेत.
आयएसएल फुटबॉल स्पर्धेत २०२३-२४ मोसमाच्या मध्यास दाखल झाल्यानंतर बोर्हा हेर्रेरा एफसी गोवातर्फे १४ सामने खेळला. उपयुक्तता सिद्ध करताना त्याने दोन गोल व तीन असिस्टची नोंद केली. स्पॅनिश मध्यरक्षक ३१ वर्षांचा आहे.
स्पॅनिश ला-लिगा स्पर्धेत तो यूडी लास पाल्मास, तसेच रेयाल व्हायाडोलिड या संघांतर्फे खेळला आहे. इस्त्राईलमध्येही व्यावसायिक फुटबॉल खेळलेला बोर्हा भारतात ईस्ट बंगालव्यतिरिक्त हैदराबाद एफसीतर्फे खेळला आहे. भारतीय व्यावसायिक फुटबॉलमध्ये एकंदरीत तो ६३ सामने खेळला असून आठ गोल व १५ असिस्टची नोंद केली आहे.
‘‘तो अनुभवी खेळाडू असून आयएसएल स्पर्धेला चांगल्या प्रकारे जाणतो. तो वेगवेगळ्या जागी खेळू शकतो आणि त्याची आकेडवारी उल्लेखनीय आहे. सेट-पिसेसवर तो प्रभावी आहे,’’ असे एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी बोर्हा हेर्रेरा याच्याविषयी नमूद केले. ‘‘हे वर्ष शानदार ठरेल याची मला खात्री आहे. सर्वांना अभिमान आणि आनंद वाटावा या उद्देशाने आम्ही खडतर मेहनत घेऊ,’’ असे बोर्हा म्हणाला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.