पणजी: भारतीय फुटबॉल संघाच्या जबाबदारीतून मुक्त झालेले स्पॅनिश मार्गदर्शक मानोलो मार्केझ यांची अपेक्षेनुसार सलग तिसऱ्या मोसमासाठी एफसी गोवाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली.
एफसी गोवाचे २०२५-२६ मोसमातील मुख्य प्रशिक्षक या नात्याने ५६ वर्षीय मार्केझ यांची स्पर्धात्मक मोहीम ऑगस्टपासून सुरू होईल. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मे २०२५ मध्ये एफसी गोवाने सुपर कप जिंकला. त्यामुळे ते एएफसी चँपियन्स लीग २ प्ले-ऑफसाठी पात्र ठरले आहेत. ही लढत ओमानमधील अल सीब क्लबविरुद्ध १३ ऑगस्ट रोजी फातोर्डा येथे खेळली जाईल.
हैदराबाद एफसीतर्फे सफल ठरल्यानंतर मार्केझ यांनी २०२३ मध्ये दोन वर्षांसाठी एफसी गोवाचे प्रशिक्षकपद स्वीकारले होते. त्यांनी दोन मोसमात सर्व स्पर्धांतील ६२ सामन्यांत मार्गदर्शन केले असून हा एफसी गोवातर्फे प्रशिक्षकाचा विक्रम आहे.
मार्केझ यांच्या नियुक्तीबाबत एफसी गोवाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रवी पुस्कूर म्हणाले, की ‘मानोलो यांना पुन्हा आणण्याची संधी मिळाल्यानंतर आमच्यासाठी हा सर्वांत सोपा निर्णय ठरला. मागील दोन मोसमांत त्यांनी संघाला केवळ चांगले निकाल दिले नाहीत, तर संघाच्या एकूण विकासाप्रती निष्ठा प्रदर्शित केली, तसेच संघाला स्पष्ट ओळख प्राप्त करून दिली.’
आगामी मोसमाविषयी पुस्कूर म्हणाले, की ‘मला आशा आहे की आगामी मोसमात आमचा संघ खूपच स्पर्धात्मक असेल. गतमोसमातील जवळपास वीस खेळाडू यंदाही आमच्यापाशी आहेत, जे हल्लीच्या फुटबॉलमध्ये क्वचितच दिसते. नव्या खेळाडूंना काही बदलांची सवय करून घ्यावी लागेल. आम्ही नेहमीच लढाऊ वृत्तीने आमच्या चाहत्यांसाठी अभिमानास्पद असे खेळू.’
‘एफसी गोवा संघात तिसऱ्या मोसमासाठी रुजू होताना मला खूप आनंद होत आहे. वर्षागणिक सातत्याने सुधारणा साधणाऱ्या संघाच्या मागील दोन यशस्वी मोसमांतही मी खूप आनंदी होतो. या क्लबची कार्यपद्धती भारतीय फुटबॉलमध्ये सहसा दिसत नाही. एफसी गोवा हा खूपच खास क्लब आहे. भारतात मला कार्यरत राहायचे असल्यास ते एफसी गोवासोबतच ही बाब माझ्यासाठी स्पष्ट होती,’ असे गोव्यातील संघात पुन्हा परतण्याविषयी मार्केझ म्हणाले.
मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील एफसी गोवाच्या सपोर्ट स्टाफमध्ये २०२५-२६ मध्ये दोन नवे स्पॅनिश चेहरे असतील. मार्क गामॉन हे गोलरक्षक प्रशिक्षक, तर डेव्हिड रामोस तंदुरुस्ती प्रशिक्षक असतील. ते अनुक्रमे असिए रे सांतिन व होजे कार्लोस बार्रोसो यांची जागा घेतील. साहाय्यक प्रशिक्षकांत बेनिटो माँटाल्व्हो व गौरमांगी सिंग कायम आहेत.
संघाचे प्रशिक्षक या नात्याने सर्वाधिक ६२ सामने
क्लबतर्फे सर्वाधिक ३८ विजयांची नोंद
सलग दोन मोसम (२०२३-२४ व २०२४-२५) आयएसएल करंडकाची उपांत्य फेरी
आयएसएल स्पर्धेत एकूण ५१ सामने, २९ विजय, १२ बरोबरी, १० पराभव
२०२५ मध्ये सुपर कप विजेतेपद, एएफसी चँपियन्स लीग २ प्ले-ऑफसाठी पात्र
आयएसएल साखळी फेरीत २०२३-२४ मध्ये तिसरा, २०२४-२५ मध्ये दुसरा क्रमांक
आयएसएलमध्ये २०२३-२४ व २०२४-२५ मध्ये सलग १२ सामने अपराजीत
२०२४-२५ मध्ये सलग २३ साखळी सामन्यांत गोल नोंदविण्याचा आयएसएल स्पर्धा विक्रम
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.