I League 2025 Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

I League: चर्चिल ब्रदर्सच आय-लीग फुटबॉल विजेते! कमिटीच्या आदेशानंतर AIFF कडून घोषणा

I League 2024-25 Winner: नामधारी एफसीने केलेले अपील ग्राह्य ठरले आणि इंटर काशीच्या खाती तीन गुणांची भर पडली नाही. त्यामुळे हा संघ दुसऱ्या स्थानी कायम राहिला व चर्चिल ब्रदर्सचे अग्रस्थान अबाधित राहिले.

Sameer Panditrao

पणजी: अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) अपिल्स कमिटीने शनिवारी आदेश दिल्यानंतर आय-लीग फुटबॉल विजेत्याच्या घोळ संपुष्टात आला. २०२४-२५ आय-लीग फुटबॉल स्पर्धेत सर्वाधिक गुण प्राप्त केलेल्या गोव्याच्या चर्चिल ब्रदर्सला विजेते घोषित करण्यात आले. यासह राज्याचे माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांच्या संघाला २०२५-२६ मधील इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत खेळण्याचीही संधी प्राप्त झाली.

एआयएफएफ अपिल्स कमिटीने या प्रकरणी सुनावणी घेतली, दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले, त्यानंतर शनिवारी आदेश दिला. त्यानुसार, नामधारी एफसीने केलेले अपील ग्राह्य ठरले आणि इंटर काशीच्या खाती तीन गुणांची भर पडली नाही. त्यामुळे हा संघ दुसऱ्या स्थानी कायम राहिला व चर्चिल ब्रदर्सचे अग्रस्थान अबाधित राहिले.

सहा एप्रिल रोजी स्पर्धेची अखेरची फेरी संपल्यानंतर अपिल्स कमिटीचा निर्णय न झाल्यामुळे विजेता घोषित करण्यात आला नव्हता. मात्र अखेरचा सामना खेळून गोव्यात परतल्यानंतर चर्चिल ब्रदर्स संघाने दाबोळी विमानतळावरून वार्का येथपर्यंत विजयी मिरवणूकही काढली होती.

श्रीनगर येथे रियल काश्मीरविरुद्धच्या १-१ गोलबरोबरीमुळे गोव्यातील चर्चिल ब्रदर्स संघ ४० गुणांसह अव्वल स्थानी राहिला, पण त्यांना अधिकृतपणे आय-लीग विजेते घोषित करण्यात आले नाही. पश्चिम बंगालमधील कल्याणी येथे इंटर काशी एफसीने भरपाई वेळेतील दोन गोलमुळे राजस्थान युनायटेडला ३-१ हरविले. यामुळे ते ३९ गुणांसह द्वितीय स्थानी राहिले.

आय-लीग फुटबॉल स्पर्धेत (सामना क्रमांक ४५) नामधारी एफसीने इंटर काशी संघावर २-० फरकाने मात केली होती. मात्र नंतर इंटर काशी एफसीने एआयएफएफ शिस्तपालन समितीकडे नामधारी एफसीने अपात्र खेळाडू खेळविल्याची तक्रार नोंदविली. या तक्रारीनुसार, नामधारी एफसीचा क्लेडसन कार्व्हालो दा सिल्वा याला चार यलो कार्ड मिळालेली असल्यामुळे तो त्या सामन्यासाठी निलंबित असायला हवा होता, तरीही खेळला.

शिस्तपालन समितीने अपात्र खेळाडू खेळविल्याबद्दल नामधारी एफसीला ०-३ फरकाने पराभूत घोषित करून इंटर काशी एफसीला ३-० विजयासह तीन गुण बहाल केले. या निर्णयाविरोधात नामधारी एफसीने अपिल्स कमिटीकडे दाद मागितली. २७ मार्च रोजी अपिल्स कमिटीने अगोदरचा शिस्तपालन समितीचा निर्णय बदलला आणि इंटर काशीचे तीन गुण कमी झाले.

चर्चिल ब्रदर्सने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) या स्पर्धा ड्रॉ प्रक्रियेत उघडपणे दुर्लक्ष केल्याचा, गंभीर अनियमिततेचा, तसेच पारदर्शकतेच्या अभावाचा आरोप करत महासंघाला पत्र पाठवून सुपर कप स्पर्धेतून माघार घेतली. त्यामुळे मोहन बागानविरुद्ध रविवारी (ता. २०) नियोजित असलेला चर्चिल ब्रदर्सचा सामना रद्द करण्यात आला होता. आय-लीगच्या तात्पुरत्या गुणतक्त्यात चर्चिल ब्रदर्स संघ अव्वल, तर इंटर काशी द्वितीय स्थानी होता, मात्र सुपर कप ड्रॉमध्ये इंटर काशी संघाला १४वे मानांकन दिल्याबद्दल चर्चिल ब्रदर्सने नाराजी व्यक्त करत माघार घेतली होती.

इंटर काशी मागणार लवादाकडे दाद

एआयएफएफ अपिल्स कमिटीच्या आदेशानंतर आय-लीग विजेतेपद हुकलेल्या आता इंटर काशी संघाने क्रीडा लवादाकडे दाद मागण्याचे ठरविले आहे. प्राप्त माहितीनुसार, इंटर काशी या प्रकरणाच्या मुक्त आणि न्याय्य सुनावणीसाठी कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टसकडे (सीएएस) जाणार आहे. इंटर काशीची याचिका क्रीडा लवादाकडे वर्ग झाल्यास पुन्हा गुंता वाढू शकतो आणि कदाचित लवादाच्या निर्णयावर आय-लीग विजेत्याचे भवितव्य ठरू शकते.

बारा वर्षांनंतर आय-लीग विजेते

चर्चिल ब्रदर्सने तब्बल बारा वर्षांनंतर आय-लीग विजेतेपद पटकावले आहे. यापूर्वी, त्यांनी २००८-०९ व २०१२-१३ मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. याशिवाय तीन वेळा (२००७-०८, २००९-१०, २०२०-२१) उपविजेतेपदही पटकावले आहे.

‘‘शनिवार, १९ एप्रिल २०२५ रोजी एआयएफएफ अपिल्स कमिटीकडून मिळालेल्या आदेशानुसार, आय-लीग २०२४-२५ मधील सामन क्र. ४५ संदर्भात नामधारी फुटबॉल क्लबच्या अपीलवर निर्णय घेण्यात आला आहे. त्या निर्णयानुसार, लीगमध्ये सर्वाधिक गुण मिळवलेल्या चर्चिल ब्रदर्स एफसी गोवा संघाला आता विजेते घोषित करण्यात आले आहे.’’
आय-लीगचे अधिकृत घोषणापत्र

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Bollywood: रामायणाची 'स्टार कास्ट' उघड! रणबीर कपूर, साई पल्लवी सोबत 'हे' कलाकार साकारणार महत्वाच्या भूमिका

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT