
पणजी: आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील अखेरच्या दिवशी रविवारी प्रचंड उत्कंठा होती, मात्र विजेतेपदाचा निवाडा प्रत्यक्षात मैदानावर होऊ शकला नाही. श्रीनगर येथे रियल काश्मीरविरुद्धच्या १-१ गोलबरोबरीमुळे गोव्यातील चर्चिल ब्रदर्स संघ ४० गुणांसह अव्वल स्थानी राहिला, पण त्यांना अधिकृतपणे आय-लीग विजेते घोषित करण्यात आलेले नाही. कारण पश्चिम बंगालमधील कल्याणी येथे इंटर काशी एफसीने भरपाई वेळेतील दोन गोलमुळे राजस्थान युनायटेडला ३-१ हरविले.
यामुळे ते ३९ गुणांसह द्वितीय स्थानी राहिले. येत्या २८ एप्रिल रोजी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) अपिल्स कमिटीने तीन गुण बहाल केल्यास इंटर काशी संघ विजेता बनेल आणि गोव्यातील संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागेल.
एआयएफएफ अपिल्स कमिटीचा निर्णय इंटर काशीच्या विरोधात गेला, तर चर्चिल ब्रदर्स संघ तब्बल बारा वर्षांनंतर आय-लीग विजेता बनेल. स्पर्धेच्या अखेरच्या २२व्या फेरीत चर्चिल ब्रदर्सला रियल काश्मीरविरुद्ध विजेतेपद निश्चित करण्यासाठी विजयाची नितांत गरज होती, परंतु १-१ गोलबरोबरीवर त्यांना समाधान मानावे लागले.
सामन्याच्या २९व्या मिनिटास चर्चिल ब्रदर्सच्या पापे गास्सामा याचा पेनल्टी फटका रियल काश्मीरचा गोलरक्षक फुर्कान अहमद दार याने अडविला, त्यामुळे चर्चिल ब्रदर्सची सुवर्णसंधी हुकली. रिबाऊंडवर वेड लेके याचा फटका दिशाहीन हुकला. कदाचित पेनल्टी फटका हुकल्यामुळे चर्चिल ब्रदर्सला निर्विवाद विजयासह विजेतेपद पटकावणे शक्य झाले नाही असे मानता येईल.
चर्चिल ब्रदर्सने विजय नोंदविला असता, त्यांचे ४२ गुण झाले असते. इंटर काशीच्या राजस्थान युनायटेडविरुद्धच्या विजयानंतर त्यांचे ३९ गुण झाल्यानंतर अपिल्स कमिटीने त्यांना तीन गुण बहाल केल्यानंतर त्यांचेही ४२ गुण झाले असते, पण इंटर काशीविरुद्ध चर्चिल ब्रदर्सची यंदा विजय व बरोबरी अशी सरस कामगिरी असल्यामुळे गोव्यातील संघाचे तब्बल १२ वर्षांनंतर तिसरे आय-लीग विजेतेपद आणि पर्यायाने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील पात्रताही निश्चित झाली असती.
आय-लीग फुटबॉल स्पर्धेत (सामना क्रमांक ४५) नामधारी एफसीने इंटर काशी संघावर २-० फरकाने मात केली होती. मात्र नंतर इंटर काशी एफसीने एआयएफएफ शिस्तपालन समितीकडे नामधारी एफसीने अपात्र खेळाडू खेळविल्याची तक्रार नोंदविली. या तक्रारीनुसार, नामधारी एफसीचा क्लेडसन कार्व्हालो दा सिल्वा याला चार यलो कार्ड मिळालेली असल्यामुळे तो त्या सामन्यासाठी निलंबित असायला हवा होता, तरीही खेळला. शिस्तपालन समितीने अपात्र खेळाडू खेळविल्याबद्दल नामधारी एफसीला ०-३ फरकाने पराभूत घोषित करून इंटर काशी एफसीला ३-० विजयासह तीन गुण बहाल केले. या निर्णयाविरोधात नामधारी एफसीने अपिल्स कमिटीकडे दाद मागितली. २७ मार्च रोजी अपिल्स कमिटीने अगोदरचा शिस्तपालन समितीचा निर्णय बदलला आणि इंटर काशीचे तीन गुण कमी झाले. आता साऱ्यांच्या नजरा २८ रोजी अपिल्स कमिटीच्या निर्णयाकडे असतील.
कोझिकोड येथे गोकुळम केरळा संघ ३७ गुणांसह विजेतेपदासाठी दावेदार होता, पण तब्बल सात गोल झालेल्या लढतीत धेंपो स्पोर्टस क्लबने ४-३ अशी बाजी मारली. या पराभवाच्या धक्क्यामुळे गोकुळम केरळा संघ विजेतेपदाच्या शर्यतीतून गारद झाला आणि माजी विजेत्या धेंपो क्लबला विजयासह मोहीम संपविणे शक्य झाले.
कल्याणी येथे सामन्याच्या निर्धारित नव्वद मिनिटांत इंटर काशी व राजस्थान युनायटेड यांच्यातील सामना १-१ असा गोलबरोबरीत होता आणि श्रीनगरमध्ये चर्चिल ब्रदर्स संघ बरोबरीनंतर विजेतेपदाच्या दिशेने कूच करत होता. मात्र भरपाई वेळेतील (इंज्युरी टाईम) आठ मिनिटांत दोन गोल नोंदवून इंटर काशीने जबरदस्त मुसंडी साधली. सामना ३-१ फरकाने जिंकून विजेतेपदाचा दावा कायम राखला. सामना बरोबरीत राहिला असता, तर इंटर काशीचे २२ लढतीतून ३७ गुण झाले असते आणि ते विजेतपदाच्या शर्यतीतून बाहेर गेले असते.
‘‘विजेतेपद मैदानावर जिंकले जाते—न्यायालयात नाही.
भारताचे चॅम्पियन्स. आम्ही परत आलो.
थॅंक यू, गोवा.
तुमच्यामुळे आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत लढलो.
हे त्यांच्यासाठी आहे ज्यांनी म्हटलं की गोव्यातील फुटबॉल संपलं आहे.
हे त्यांच्यासाठी आहे ज्यांनी आमची गणना सुरवातीपासूनच केली नाही.
हे त्यांच्यासाठी आहे जे अजूनही ‘अंडरडॉग्स’वर विश्वास ठेवतात.
आम्ही व्यवस्थेला हरवलं.
आम्ही इतिहास रचला.
आणि सगळ्यात महत्त्वाचं—
आम्ही सगळ्यांना आठवण करून दिलं की फुटबॉल हा लोकांचा खेळ आहे.
हा गरिबांचा खेळ आहे, श्रीमंतांचे मैदान नाही.’’
श्रीनगर येथे ः रियल काश्मीर १ (लालरामासांगा ७ वे मिनिट) बरोबरी विरुद्ध चर्चिल ब्रदर्स १ (रफिक अमिनू ५०वे मिनिट)
कल्याणी येथे ः इंटर काशी ३ (के. प्रशांत १२ वे मिनिट, डेव्हिड मुनोझ ९०+४ वे मिनिट, मातिया बाबोविच ९०+७ वे मिनिट) विजयी विरुद्ध राजस्थान युनायटेड १ (अलेन ओयार्झून ६९वे मिनिट)
कोझिकोड येथे ः धेंपो स्पोर्टस क्लब ४ (ख्रिस्तियन दामियन पेरेझ २१ व ९०+४ वे मिनिट, कपिल होबळे ३४वे मिनिट, दिदिए ब्रॉसू ७१वे मिनिट) विजयी विरुद्ध गोकुळम केरळा ३ (थाबिसो नेल्सन ब्राऊन ४, ११ व ७३वे मिनिट).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.