पणजी: गोव्यात २०१२ साली फुटबॉलला राज्य खेळाचा दर्जा बहाल करण्यात आला. त्याचवर्षी गोवा फुटबॉल विकास मंडळाची (GOA FOOTBALL DEVELOPMENT COUNCIL) स्थापना झाली; पण आता राज्यात या ‘लोकप्रिय’ खेळाची स्थिती निराशाजनक, चिंताजनक असल्याचे खुद्द क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनीच सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. फुटबॉलला गतवैभव आणि दर्जा सुधारण्यासाठी जीएफडीसी व गोवा फुटबॉल असोसिएशनच्या (जीएफए) सहकार्याने क्रीडा खात्याने धावाधाव करून दोन दिवसीय विचारमंथन शिखर परिषदेचे आयोजन केले आहे.
कांपाल येथील कला अकादमीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत क्रीडामंत्री गावडे यांनी सांगितले, की ‘‘फुटबॉल हा गोव्याचा राज्य खेळ. पण, या खेळाची सध्याची स्थिती निराशाजनक, चिंताजनक आहे. ती सुधारण्याची गरज आहे. राज्यातील खेळांचा दर्जा उंचावणे ही संबंधित खेळाच्या संघटनेची जबाबदारी आहे.
गोव्यातील फुटबॉलसाठी जीएफएने प्रयत्न सुरू केले असून त्यांचा पुढाकार स्वागतार्ह आहे.’’ गोव्यातील फुटबॉलच्या सर्व पैलूंच्या घसरणीवर चर्चा, वादविवाद आणि उपाय शोधण्यासाठी ही शिखर परिषद घेण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. गोव्यात फुटबॉलसाठी आवश्यक साधनसुविधा आहेत, परंतु प्रोत्साहनाचा अभाव आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दोन दिवसीय जीएफडीसी फुटबॉल परिषद बुधवारी (ता. ९) व गुरुवारी (१०) मडगाव येथील बीपीएस स्पोर्टस क्लबमध्ये होणार आहे. पहिल्या दिवशी क्रीडामंत्री गावडे परिषदेचे उद्घाटन करतील. समारोप मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत होईल. परिषद आयोजन समितीच्या अध्यक्षपदी मडगावचे आमदार दिगंबर कामत आहेत.
पत्रकार परिषदेत क्रीडामंत्री, आमदार कामत यांच्यासह गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या कार्यकारी संचालक गीता नागवेकर, अर्जुन पुरस्कारप्राप्त माजी फुटबॉलपटू ‘पद्मश्री’ ब्रह्मानंद शंखवाळकर, जीएफए अध्यक्ष कायतान फर्नांडिस, उपाध्यक्ष जोनाथन डिसोझा यांची उपस्थिती होती.
‘‘परिषदेत व्यक्त होणारी मते, चर्चा यातून आम्हाला नावीन्यपूर्ण सूचना अपेक्षित आहे. संबंधित दस्तऐवज सादर झाल्यानंतर लगेच त्यांच्या अमलबजावणीची प्रक्रिया सुरू होईल,’’ असे गावडे यांनी स्पष्ट केले.
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोव्यातील फुटबॉलच्या पायाभूत विकासासाठी ‘जीएफडीसी’ची स्थापना केली. मात्र, ब्रह्मानंद शंखवाळकर यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर मागील दीड वर्षांहून जास्त काळ हे मंडळ अध्यक्षाविना आहे. ही बाब क्रीडामंत्र्यांनीही मान्य केली आणि लवकरच जीएफडीसीला नवा अध्यक्ष प्राप्त होण्याचे संकेत दिले. ‘‘जीएफडीसीचा नवा अध्यक्ष येत्या १५ दिवसांत नियुक्त होईल. या अध्यक्षाची नियुक्ती मुख्यमंत्री करतात,’’ असे ते म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.