पणजी: गोव्यातील सुपर ३० सॉकर स्कूल आणि सुपर गोवन फुटबॉल क्लबने इंडियन सुपर लीग (आयएसए) फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱ्या बंगळूर एफसीसोबत खेळातील तांत्रिक बाबींसंदर्भात भागीदारी केली आहे.
राज्यातील फुटबॉल प्रशिक्षणाचा दर्जा उंचावताना प्रतिभाशाली खेळाडूंना बहुमूल्य संधी उपलब्ध करून देणे हे या भागीदारीचे मुख्य उद्दिष्ट आहे. रिकार्डो कार्दोझ हे सुपर ३० सॉकर स्कूलचे संस्थापक आहेत. बंगळूर एफसीच्या सहकार्याने गोव्यातील फुटबॉलमध्ये व्यावसायिकता, शिस्त आणि उत्कृष्टता आणण्यासाठी ही भागीदारी महत्त्वाची ठरणार असल्याचे रिकार्डो यांना वाटते. बंगळूर एफसीच्या प्रारंभीच्या काळात रिकार्डो खेळाडू या नात्याने योगदान दिले आहे.
भागीदारीअंतर्गत बंगळूर एफसी आणि बेळ्ळारी येथील त्यांच्या अकादमीसाठी गोव्यात चाचणी प्रक्रिया घेण्यात येईल. बंगळूर एफसीचे प्रशिक्षक नियमितपणे सुपर ३० सॉकर स्कूलला भेट देतील, तसेच प्रतिभा शोधण्यासाठी अव्वल श्रेणी प्रशिक्षण राबवतील, असे नमूद करण्यात आले. जेएसडब्ल्यू बंगळूर एफसीचे फुटबॉल संचालक डॅरेन काल्देरा यांनी सांगितले, की “फुटबॉल क्लब म्हणून आमचे ध्येय नेहमीच जास्तीत जास्त मुलांना या खेळात व्यावसायिक पद्धतीने पुढे जाण्याची संधी देणे हे आहे. सुपर ३० सॉकर स्कूल आणि सुपर गोवन फुटबॉल क्लब हे त्या दिशेने आणखी एक पाऊल आहे.”
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.