Water management  Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Opinion: भारतातील शहरांना भविष्यात अधिकाधिक पाण्याची गरज भासणार आहे, पण आपण ही मागणी पूर्ण करू शकू का?

India Water Crisis: २२ मार्च रोजी ‘जागतिक जल दिन’ आहे. बदलत्या हवामानामुळे व तापमानवाढीमुळे पाण्याची समस्या दिवसेंदिवस बिकट होत जाईल. याचा विचार करणारा व विचार करायला लावणारा विशेष लेख...

गोमन्तक डिजिटल टीम

सुनिता नारायण

पाणी, पाण्याचा वापर, जलस्रोत सांभाळणे, भूजल पातळी वाढवणे आणि सांडपाण्याचा पुनर्वापर या गोष्टी आज फारच महत्त्वाच्या आहेत. तरीही, आपण त्याकडे हव्या तेवढ्या गांभीर्याने लक्ष देत नाही.

तस्मा॒ अरं॑ गमाम वो॒ यस्य॒ क्षया॑य॒ जिन्व॑थ ।

आपो॑ ज॒नय॑था च नः ॥

(अन्न आणि अन्य वनस्पती उत्पन्न करून प्राणीमात्राचे पोषण करणाऱ्या पाण्याच्या दिव्य प्रवाहा, तुझे सांनिध्य आम्हाला सदैव लाभो. तुझ्यासोबत आमचीही वाढ होवो!)

अशी ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील नवव्या सुक्ताच्या तिसऱ्या ऋचेत पाण्याचे महत्त्व जाणण्याची परंपरा असणाऱ्या भारतीयांवर आज पाण्याचा विचार करण्याची पाळी आली आहे. हवामान बदल आणि इतर घटकांमुळे दूषित झाल्याने पाण्याची उपलब्धता कमी होतेय आणि गुणवत्ता खालावत चालली आहे. भारतातील शहरांना भविष्यात अधिकाधिक पाण्याची गरज भासणार आहे, पण आपण ही मागणी पूर्ण करू शकू का?

२०२६ हे ‘एल निनो’चे वर्ष असेल-याचा अर्थ आपल्याला अधिक उष्ण दिवस आणि रात्री अनुभवायला मिळतील, मान्सून विस्कळीत होईल आणि अवकाळी, अनियमित पाऊस पडण्याच्या घटना वाढतील. पाण्याच्या दृष्टीने हे वर्ष कठीण ठरणार आहे.

भविष्यात पाण्याचे अस्तित्व टिकावे यासाठी आपल्याला खूप काही करावे लागेल. यासाठी, एका बाजूला आपल्याला आपल्या भूतकाळातील जलज्ञानावर अवलंबून राहावे लागेल. दुसऱ्या बाजूला, भविष्यासाठी पाण्याबाबत सजग समाज उभारावा लागेल.

भारतामध्ये पाण्याचा जपून वापर करण्याची एक अद्भुत परंपरा आहे. पूर्वी प्रत्येक थेंब काळजीपूर्वक साठवला आणि जतन केला जात होता. प्रत्येक प्रदेशाची स्वतःची जलव्यवस्थापन पद्धती होती. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या ऐवजी आपण ‘एकमेकांना अडवा, एकमेकांची जिरवा’ करू लागलो आहोत.

वेदकाळापासून चालत आलेले पाण्याचे व पाण्याच्या व्यवस्थापनाचे महत्त्व पुन्हा शिकून घेऊन राबवले पाहिजे. ‘जिथे पाऊस पडतो, तिथेच पाणी साठवा’ हे आपले घोषवाक्य असले पाहिजे. यासोबतच, आपल्या शहरांमधील पाण्याचे स्रोत, पूरक्षेत्रे आणि पाणथळ जागांचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे. यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होईल आणि रणरणत्या उन्हात शहरे थंड राहतील.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण कचरा व्यवस्थापनाबाबत जागरूक झाले पाहिजे. पुरवठा झालेल्या प्रत्येक एक लीटर पाण्यापैकी ८० टक्के पाणी सांडपाण्यात रूपांतरित होते. आपण या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर का करू शकत नाही? आपण सांडपाण्याच्या प्रत्येक थेंबाचे पुन्हा पाण्यात रूपांतर केले पाहिजे. थोडक्यात, सांडपाण्याचेही जलस्रोतात रूपांतर केले पाहिजे.

भारतातील सर्वांत स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये पिण्याचे पाणी दूषित झाल्याने अनेक लोकांचा मृत्यू झाला, ही बाब धक्कादायक तसेच विचार करायला लावणारी आहे.

ही समस्या केवळ इंदूरची किंवा केवळ पाणीपुरवठ्याची नाही; उलट आपण निर्माण केलेले सांडपाणी विनावापर तसेच सोडून देतो, ही खरी समस्या आहे. आपण या गोष्टी एकमेकांशी जोडत नाही. प्रत्येक शहर प्रशासन आणि सरकार पाणीपुरवठ्यावर लक्ष केंद्रित करते, पण निर्माण होणारे सांडपाणी दुर्लक्षित राहते. जोपर्यंत आपण सांडपाण्याचा गांभीर्याने विचार करणार नाही, तोवर स्वच्छ पाणी सुरक्षित उरणार नाही.

पाणी आणि सांडपाणी यांचे व्यवस्थापन करण्याच्या रचनेत बदल घडवण्यासाठी पुरेसे प्रयत्न होत नाहीत, हे भारतीय शहरांचे वास्तव आहे. गमतीचा भाग म्हणजे ‘अटल मिशन फॉर रीजुव्हनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (‘अमृत’- AMRUT)’ या योजनेत पाणीपुरवठा, सांडपाणी आणि हरित पायाभूत सुविधांना निधी दिला जातो.

पण, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयानुसार, ६२ टक्के खर्च पाणीपुरवठ्यावर होतो, तर केवळ ३४ टक्के सांडपाणी व्यवस्थापनावर! त्याहीपेक्षा भयानक बाब म्हणजे भूजलाची पातळी वाढेल अशा जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन करण्यावर फक्त ३ टक्के खर्च केला जातो!

ही स्थिती बदलण्याची गरज आहे. त्यासाठी सांडपाणी व्यवस्थापनावर अधिक खर्च करण्याची आवश्यकता नाही, तर पायाभूत सुविधा परवडतील अशा पद्धतीने त्यांची पुन्हा रचना करून हे शक्य आहे. तसे केल्यास सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी आवश्यक साधने प्रत्येक शहरात असतील.

आजची पाणीपुरवठा पद्धत लांब अंतरावरून पाणी आणणाऱ्या पाइप्स आणि पंपांवर अवलंबून आहे. कारण ओहळ, झरे हे पाण्याचे स्थानिक स्रोत आटले आहेत किंवा प्रदूषित झाले आहेत. पण आपल्याला माहीत आहे की पाइपलाइन जितकी लांब, तितकी तिची उभारणी महाग होते;

त्यात गळतीही अधिक होते आणि पंपिंगसाठी अधिक वीज लागते. या सर्वामुळे पाण्याचा खर्च वाढत जातो, इतका की श्रीमंतांनाही परवडेनासा होतो. परिणामी, घरगुती वापरासाठी लोक भूजलावर अवलंबून राहतात.

‘हर घर जल’ पोहोचवण्यासाठी पाइप, पंप, नाल्यांची सुधारणा, रस्ते वारंवार फोडणे व घरांना जोडणी इतके सगळे खर्चीक उपद्व्याप करावे लागतात. एवढा खर्च करून निर्माण झालेले पाणी वापरून जे सांडपाणी तयार होते,

ते भूमिगत जाळ्यातून शुद्धीकरण प्रकल्पांपर्यंत नेले जाते आणि नाल्यांमध्ये, नद्यांमध्ये किंवा तलावांमध्ये सोडले जाते जे आधीच अशुद्ध सांडपाण्याने भरलेले असतात. अंदाजित खर्चापेक्षा कितीतरी पट खर्च प्रत्यक्षात होतो. अनेकदा हा प्रचंड खर्च वाया जातो. एक नेटवर्क पूर्ण होईपर्यंत शहराचा दुसरा भाग कोसळलेला असतो आणि हे चक्र काही केल्या थांबत नाही.

पणजी शहरातच पाहिल्यास नेहमी कुठे ना कुठे तरी खोदण्याचे काम सुरूच असते. याच कारणांमुळे भारतातील बरीच शहरे अजूनही सांडपाणी व्यवस्थापनापासून वंचित आहेत आणि बहुतेक घरे सेप्टिक टँकसारख्या स्थानिक प्रणालींवर अवलंबून आहेत. इंदूरमध्ये अशाच प्रणालींमधून झालेल्या गळतीमुळे पिण्याचे पाणी दूषित झाले.

व्यवस्थित लक्ष दिल्यास ही आपत्ती भविष्यासाठी इष्टापत्ती ठरू शकेल. पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा शौचालयांतील गाळ नियमितपणे काढला जाईल, त्यावर प्रक्रिया केली जाईल आणि शुद्ध केलेले पाणी (सांडपाणी नव्हे) तसेच घन पदार्थ खत किंवा इंधन म्हणून पुन्हा वापरले जातील. अन्यथा, पाणी दूषित होण्याच्या धोका नेहमीच राहील.

आपल्याला सांडपाणी व्यवस्थापन परवडण्याजोगे करण्याकडेही लक्ष दिले पाहिजे. त्यासाठी, ‘अमृत’A मार्गदर्शक तत्त्वे पुन्हा डिझाइन करून घरांमधील सर्व मलमूत्र संकलनाला प्राधान्य दिले पाहिजे. हे परवडण्याजोगे करण्यासाठी शहरांना विद्यमान सेप्टिक टँक नेटवर्कच्या वापरास प्रोत्साहन द्यावे लागेल.

भूमिगत पाइप्सऐवजी टँकर्सद्वारे हे सांडपाणी शुद्धीकरण केंद्रांपर्यंत नेले पाहिजे. असे करणे अधिक जलद, स्वस्त आणि सर्वसमावेशक आहे. दुसरे म्हणजे, शुद्ध केलेले सांडपाणी आणि गाळ खत किंवा इंधन म्हणून शहरी भागांत वापरले जावे यासाठी जागृती करणे व प्रोत्साहन देणेही गरजेचे आहे.

त्यासाठी केला जाणारा वित्तपुरवठा हा पुनर्वापर केलेल्या पाणी आणि गाळ यांच्या प्रमाणाशी जोडला गेला पाहिजे. तिसरे म्हणजे, स्थानिक जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन करून ते पाणी प्रकल्पांत नेले पाहिजे. यामुळे लांब अंतरावरून पाणी आणण्याचा खर्च कमी होईल, भूजल अधिक टिकाऊ बनेल आणि पाणीपुरवठा अधिक परवडणारा होईल. पण हे फक्त ‘सांडपाणी प्रथम’ या दृष्टिकोनातूनच शक्य आहे.

जोपर्यंत जलसाठे प्रदूषित होत राहतील, तोपर्यंत शहरांसाठी दूरवरून स्वच्छ पाणी आणत राहावे लागेल. अशा प्रकारे स्वच्छ पाण्यापासून धोकादायक पाण्यापर्यंतचे दुष्टचक्र सुरूच राहील आणि शहरांतील पाणी दूषित होतच राहील. ते टाळण्यासाठी ‘मृत’ पाण्यास ‘अमृत’ करणे अत्यावश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Quepem: तब्बल 14 वर्षांनी होणार रस्त्याचे डांबरीकरण! बाळ्ळी चार रस्ता ते केपे कामाला सुरुवात; नागरिकांकडून समाधान व्यक्त

VIDEO: कारने चुकीचा टर्न घेतला अन्... मुंबई - गोवा महामार्गावर भयंकर अपघात, तरूणाचा जागीच मृत्यू

Dabolim: प्रक्रिया न केलेले पाणी मिसळल्यानेच अतिसार! दाबोळीतील स्थिती नियंत्रणाखाली; संकुलाची पाणी जोडणी खंडित करण्याचे आदेश

Goa News: गोव्यासाठी आनंदाची बातमी! राज्याला ‘स्मार्ट गव्हर्नन्स’ सुवर्ण पुरस्कार; दिल्ल्लीत मंत्री गुदिन्होंनी स्वीकारला सन्मान

गल्फ एअऱची बहरीन-दाबोळीदरम्यानची सर्व उड्डाणे 26 मार्चपर्यंत रद्द! दुबई–दाबोळी सेवा स्थगित; युरोपकडील विमानांनाही मर्यादा

SCROLL FOR NEXT