Vantem Sattari Goa Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Vantem Sattari: सफर गोव्याची! त्रिपुरारी पौर्णिमेदिवशी चांदणे आणि तळ्यातील असंख्य दिव्यांनी झळाळणारे गाव

Vantem Sattari Goa: गोव्यात ज्या ज्या ठिकाणी बारमाही वाहणाऱ्या पाण्याचे स्रोत आहेत अशा ठिकाणी विविध जनसमुदायाने अन्नाची पैदासी करणारी शेती, बागायती निर्माण केली.

Sameer Panditrao

अ‍ॅड. सूरज मळीक

वास्को: पाणी हे जीवन आहे. खळखळत्या पाण्याचा शोध घेत नदी, ओहळ व झरे असलेल्या ठिकाणी लोकवस्ती वसवली जाते. जेव्हा पाणी गायब होऊ लागते तेव्हा लोकही दुसऱ्या जागी स्थलांतरित होतात. गोव्यात ज्या ज्या ठिकाणी बारमाही वाहणाऱ्या पाण्याचे स्रोत आहेत अशा ठिकाणी विविध जनसमुदायाने अन्नाची पैदासी करणारी शेती, बागायती निर्माण केली.

सत्तरीतील भिरोंडा ग्रामपंचायत क्षेत्रात येणारा वांते हा गाव गोव्यातील म्हादई आणि रगाडो नदी संगमाच्या उजव्या काठावर वसलेला आहे. कर्नाटकातील देगाव येथून उगम पावणारी म्हादई नदी जेव्हा वांते गावातून गांजे गावात प्रवेश करते तेव्हा त्याच्यातील क्षारतेचे प्रमाण वाढायला सुरुवात होते. त्यामुळे वांत्याला लागून वाहणाऱ्या म्हादई नदीच्या पात्रात गोड्या पाण्यात आढळणाऱ्या खुब्यांची पैदासी होते.

वांते गावातील चंद्र सूर्य डोंगर, आसण डोंगर, राई व इतर डोंगरावरील जंगले मान्सूनचे पाणी साठवून ठेवतात. बारमाही वाहणाऱ्या झऱ्याचे पाणी परवल ओहोळाद्वारे म्हादई नदीला येऊन मिळते. त्यामुळे गोड्यापाण्याचा साठा उपलब्ध करून म्हादई नदीतील क्षारता नियंत्रणात ठेवण्यास हा गाव कारणीभूत ठरलेला आहे.

वांते हा गाव जरी कोकण पट्टीपासून दूर असला तरी या गावात सदाहरित जंगलाचे पैलू दर्शविणारी वनसंपदा आहे. खाण व्यवसाय सुरू होण्यापूर्वी हा गाव हिरवळीने नटलेला होता. फोंडा, काणकोण, तिसवाडी व सत्तरी तालुक्यातील पडोशे गावातून लोक इथे स्थायिक झाले.

आदिवासी, बिगर आदिवासी, ब्राह्मण व इतर समाजाच्या लोकांनी सामूहिक जीवन पद्धतीचा स्वीकार करून नैसर्गिक झऱ्यांचे संवर्धन करून कुळागरे व भाजीचे मळे निर्माण केले. सातेरी, केळबाई ही या गावाची ग्रामदैवते आहेत. निसर्गवैभवाने संपन्न असलेल्या देवसू या जागेत गावाला बारमाही पाणी पुरविणारी देवाची तळी आहे.

आपले जगणे सुंदर सुखी बनवणाऱ्या या तळ्याला लोकमानसाने देवत्व प्रदान केले. या झरीचे पाणी आरोग्यवर्धक असल्यामुळे आजही या गावातील लोक पिण्यासाठी हेच पाणी वापरण्यास प्राधान्य देतात. इथल्या कष्टकरी समाजाने झऱ्यांचे पाणी तळ्यात साठवून ते कुळागरांना पुरविले जावे यासाठी नियोजनबद्ध पाट बांधले. दोन आठवड्यातून एखादा आळीपाळीने आपल्या कुळागराला पाणी मिळेल असा हा क्रम पूर्वापार सुरू आहे.

जल सिंचनाची अशी व्यवस्था फक्त सामूहिक जीवनशैलीमध्येच सफल होऊ शकते. या तळ्यात ‘तळ्यातुम्याच्या देवचारा’चा वास आहे. त्यामुळे कुणीही चप्पल घालून आत प्रवेश करत नाही. आपल्या पूर्वजांनी लागू केलेल्या या नियमांमुळे आज तळ्यातील पेयजल स्वच्छ ठेवून त्याचे पावित्र्य जपलेले आहे. वर्षातून एकदा गावातील लोक एकत्र येऊन या तळ्यातील गाळ उपसा करून तळे स्वच्छ करतात.

त्यानंतर ‘तळ्यातुम्याच्या देवचारा’ला कोंबडा अर्पण करून त्याच्यासमोर कृषिउत्पन्न भरपूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना केली जाते. या तळ्यातील मन लुभावणारे दृश्य म्हणजे कडेला उगवलेली लहान उंच ‘नेचे’. झुडपासारखे उंच असलेले ‘नेचे’ झाड उगविण्यासाठी हवामानात आर्द्रता असावी लागते.

तळ्यासभोवतालच्या परिसरात ‘बिपट’, ‘खष्ट’, ‘धडकुसर’सारखी सदाहरित झाडे, वृक्ष पाहायला मिळतात जी हवामानात गारवा निर्माण करतात. यामधील धडकुसरीचे झाड तर विलक्षणच आहे. या झाडाची मुळे एखाद्या भिंतीसारखी इतकी उंच आणि लांब पसरलेली आहेत की त्याचासमोर १० माणसे एका रांगेत उभी राहिली तरी कमी पडतील.

या झाडाचे शास्त्रीय नाव फायकस नरवोसा असे असून हे झाड गोव्यातील खूप कमी गावांत पाहायला मिळते. महाराष्ट्रातील मेढे येथील नागनाथाच्या राईमध्ये या झाडाला देवत्व लाभलेले आहे. पिंपळ, वड, रूमड यांसारखी फायकस कुळातील झाडे धनेश पक्षांसाठी खाद्य वनस्पती आहे. तळ्याच्या कडेला असलेल्या ढोलीत मुठीपेक्षा लहान आकाराचा पण सात रंगाचे मिश्रण असलेला तिबोटी खंड्या या पक्षाचा नैसर्गिक अधिवास आहे.

अतिशय थंडगार आणि शीतल पाणी अखंड प्रवाहित होण्यामागचे रहस्य काय आहे, याचे उत्तर या गावात होणाऱ्या शिमगोत्सवातील लोकगीतात सापडते. गावातील मांडावर एकत्र येऊन झुंज, कासाळ्याच्या नादात ‘जती’ गायल्या जातात. या लोकगीतांतून निसर्ग आणि पर्यावरणातील घटकांचे वर्णन आढळून येते.

हाडा रे कुदळी मारा एक धेपा,

तेतू रोवया रोप त्या पिपळाचे,

हाडा रे खोरी मारा एक चरी

तेती येती झरी पाच पाताळाच्यो.

म्हणजेच कुदळीने खड्डा खणून त्यात पिंपळाचे रोप लावावे, फावडे घेऊन चरी माराव्यात, तेव्हा तिथे झरी उत्पन्न होणार.

एखाद्या पडीक जमिनीत झरा निर्माण होणे कठीण असते. सतत प्रवाहित राहणाऱ्या झऱ्यासाठी झाडे महत्त्वाची असतात. झऱ्याच्या सभोवताली तसेच वरच्या बाजूला असलेले घनदाट जंगल मातीवर पानांचा वर्षाव करतात. त्यामुळे हा पालापाचोळा कुजून जमिनीच्या वरच्या थराला सुपीक बनवून त्यात थंडाई निर्माण करतो. घनदाट वृक्ष आच्छादनातून पडलेला मान्सूनचा पाऊस मातीत झिरपतो ज्यामुळे जमिनीच्या वरचा थर वाहून जात नाही आणि भूभागातील पाण्याचा स्तरसुद्धा नियंत्रणात राहतो. झऱ्याच्या आजूबाजूला असलेले जंगल जर नष्ट केले तर झऱ्याचे पाणी गायब व्हायला वेळ लागत नाही.

पाऊस बाये नवरा, धरतरी तेज्यो अस्तुरी,

सात मार्गाची माती हाडा, तीयेची घोटी भरा

आपल्या भारतीय लोकमानसाने सनातन काळापासून माती धरणाऱ्या धरित्रीला भूमाता म्हणून पाहिले आहे. गावातील सुंदरे बोरकर यांच्याकडून हे गीत आजही ऐकायला मिळते. या गीतात पावसाला नवरा म्हटलेला आहे तर धरित्रीला त्याची बायको असे संबोधले आहे. मान्सूनचा पाऊस जमिनीतील सुपीक मातीमध्ये आविष्कार घडवतो.

गावातील डोंगर उतारावर उगवणारी सायकीण्याची भाजी तर माळरानात व शेतात सहज मिळणारी दुणदुण्याची भाजी आजही येथील लोकांच्या जेवणात आहे. अडवई गावातून वांते गावात येणाऱ्या दोव्हाळ या ओहोळाच्या काठावर ‘गोठण’ हे श्रद्धास्थान आहे. येथून धेणलो उत्सावाला प्रारंभ होतो. मान्सूनच्या पावसानंतर या परिसरात गोव्याचे राज्य फुलपाखरू, मलाबार वृक्ष परीचे दर्शन घडते.

या गावातील डोंगरभागात स्थायिक झालेल्या ब्राह्मण कुटुंबीयाने पेयजलाचे संवर्धन व्हावे व कुळागराच्या सिंचनासाठीही बारमाही पाणी उपलब्ध व्हावे या दृष्टीने गणपतीचे तळे बांधलेले आहे. दूरदृष्टी आणि अतिशय कौशल्यपूर्ण व्यवस्थेने जांभ्या दगडांनी बांधलेल्या या तळ्यातील पाणी कुळागरांना पुरविले जाते, तर तळ्याच्या खालच्या बाजूला असलेल्या झऱ्याचे पाणी फक्त पेयजलासाठीच वापरले जाते.

पावसाळ्यात डोंगरावरून येणाऱ्या पाण्याचा लोट तळ्यात जाऊ नये यासाठी तळ्याच्या बाजूने नियोजन केलेले आहे. त्रिपुरारी पौर्णिमेच्या रात्री या तळ्यात केळीच्या गभ्याचा दीपस्तंभ उभा करून संपूर्ण तळ्याला दिव्याने सजवून दीपोत्सव साजरा केला जातो. आकाशातील त्रिपुरारी पौर्णिमेचे कुळागरातून झिरपणारे चांदणे आणि तळ्यात असंख्य प्रज्वलित दिवे यामुळे त्या दिवशी हा सारा परिसर दिव्यत्वाने उजळून निघतो.

पूर्वी म्हादई नदीच्या वाहत्या पाण्यावर पालापाचोळा व नदीतील सुपीक गाळाचा थर बनवून त्यावर पुरण शेती केली जायची. पिढ्यान्पिढ्या गायी गुरांचे शेण, वृक्ष वेलींचा पालापाचोळा हे सेंद्रिय खत म्हणून वापरून पौष्टिक अन्नाची पैदाइस केली जायची.

गावातील ओहोळाच्या कुशीत विविध भाताची लागवड करण्यासाठी गावातील परवल ओहोळावर ठिकठिकाणी बांध घालून नदीतील पाणी भूमिगत शेतीसाठी नेले जायचे. नदीपासून शेतात पाणी आणण्यासाठी चक्क कातळ सड्याला कोरून पाट खोदलेले आहेत.

वांते गावातील धेणलो, शिगमो व दिवजा हे कृषिसंस्कृतीचे दर्शन घडवणारे उत्सव आहेत. आपल्या पूर्वजांची नैसर्गिक झऱ्यामध्ये सृजनत्वाचा साक्षात्कार अनुभवला होता, त्यामुळे नदी ओहोळाच्या ठायी त्यांनी मातृशक्तीचे दर्शन घेतले.

आज बेकायदेशीर खाणकाम, खडीसाठी डोंगर पोखरणे, अनियमित रेती उपसा करणे यांसारख्या अघोरी कृत्यामुळे पाण्याचा स्तर घटत चालला आहे,ही वर्तमान आणि भविष्याच्या दृष्टीने खेदजनक गोष्ट आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT