Latambarcem: सफर गोव्याची! एकाच ठिकाणी दोन शिवलिंगे असणारी देवराई; गोवा महाराष्ट्र सीमेवरचे 'लाटंबार्से'

Latambarcem Goa: उत्तर गोव्यातील डिचोलीतल्या भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वांत मोठा गाव म्हणून महसुली दफ्तरात लाटंबार्से गावाची नोंद आहे.
Latambarcem Goa
Latambarcem Goa VillageDainik Gomantak
Published on
Updated on

History and cultural significance of Latambarcem Goa

उत्तर गोव्यातील डिचोलीतल्या भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वांत मोठा गाव म्हणून महसुली दफ्तरात लाटंबार्से गावाची नोंद आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोडामार्ग तालुक्याशी या गावाची सीमा भिडलेली आहे.

३६५१.६५ हेक्टरातल्या या गावात खरे तर लाडफे, खरपाल, उसप, कासारपाल, वडावल, नानोडा आणि गोवा-दोडामार्ग ही गावे विसावलेली आहेत. एकेकाळी दोडामार्ग वगळता बाकी सहा गावे धार्मिक, सांस्कृतिकदृष्ट्या स्वतंत्र होती. पाव शतकापूर्वी लाटंबार्सेत ८८.२३ हेक्टर जंगलक्षेत्र होते.

महसूल दफ्तरात सात गावांनी युक्त असलेल्या समूहास लाटंबार्से हे ग्रामनाम आहे. आज मेणकुरे, धुमासे आणि साळ ही गावे महसुली खेडी म्हणून स्वतंत्र असली तरी पूर्वीच्या काळी या गावांचा मावेश लाटंबार्सेच्या ग्रामसंस्थेत व्हायचा. सांस्कृतिक, धार्मिकदृष्ट्या संपूर्ण गोव्याला ललामभूत ठरण्यासारखा लाटंबार्सेसारखा दुसरा गाव अन्यत्र आढळणे कठीण.

जुन्या काबिजादीतल्या बार्देश महालात जेव्हा धार्मिक छळवणूक शिगेला पोहोचली आणि पोर्तुगिजांनी मंदिरांच्या विध्वंसाचे सत्र आरंभले, तेव्हा कांदोळी, हडफडे, कळंगुट गावातील मंदिराचे लाटंबार्सेत स्थलांतर झाले. साळ, मेणकुरे, पिर्ण, अडवलपाल, मुळगाव, बोर्डे, वन, म्हावळिंगे, या गोव्यातल्या तर माटणे, दोडामार्ग, आबंडगाव या महाराष्ट्रातल्या गावांशी लाटंबार्सेच्या सीमा भिडलेल्या आहेत.

दोडामार्ग हा कन्नड भाषेतला शब्द असून, आज कर्नाटकात असलेल्या विजापूर आणि महाराष्ट्रात असलेल्या कोल्हापूर संस्थानांतून घाटमार्गाद्वारे गोव्यात येण्यासाठी रामघाटातून उतरल्यावरती जो प्रशस्तमार्ग अस्तित्वात होता त्याला ‘दोडामार्ग’ ही संज्ञा होती.

व्यापाऱ्यांचे तांडे, घोडे, बैलगाडीतून दोडामार्ग आणि तेथून लाडफे, व्हाळशी, मये आणि हिंदोळे (नार्वे) गावांतून मांडवीच्या जलमार्गाद्वारे देशविदेशात जायचे. गोवा महाराष्ट्र सीमेवरती हे गाव वसलेले असल्याने ब्रिटिश- पोर्तुगीज सत्ताधीशांच्या कारकिर्दीत त्याला विशेष महत्त्व लाभले होते. डोक्यावरती ज्याकाळी सामान वाहून नेले जायचे तेव्हा विशिष्ट टप्प्यावरती ओझेवाल्याच्या सोयीसाठी कदंब राजवटीत जांभ्या दगडांची जी ‘दवरणी’ उभारण्यात आली होती.

त्यांचे जीर्णावशेष आज ही नानोडा कासारपाल रस्त्यांच्या दुतर्फा दृष्टीस पडतात. नाना जाती, धर्मांच्या लोकांनी शेकडो वर्षांपासून इथे व्यापार उद्योगानिमित्त वास्तव्य केले. लाटंबार्सेतल्या एका नानोड्याच्या परिसरातील मंदिराचा धार्मिक स्थळांचा व्यक्तिमत्त्वांचा आढावा घेतला तर ग्रंथापेक्षा प्रचंड माहिती उपलब्ध होईल.

२५ फेब्रुवारी १५२७ रोजी कळंगुटच्या शांतादुर्गेचे तेथून स्थलांतर झाले आणि ३ मार्च १५२७ रोजी देवी आणि तिचे पंचायतन नानोड्यात स्थायिक झाले. नानोड्याचे सातेरी पुरमार ही ग्रामदैवते असून, नानोड्यात बार्देशातल्या हडफडे गावातला चौरंगीनाथ, कांदोळीतली शांतादुर्गा आणि तिचे पंचायतन आले.

अडीचशे वर्षांपूर्वी नानोडा येथे लक्ष्मी- व्यंकटेशाच्या उभारणीत बाताबाई कळंगुटकर या कर्तृत्ववान स्त्रीने विशेष योगदान दिले. लक्ष्मी-व्यंकटेशाची गोव्यात केवळ जी दोन मंदिरे आहेत त्यातील एक काणकोणात फणसखिंडीला, तर दुसरे नानोड्यात आहे. लक्ष्मी- व्यंकटेशाच्या नानोडा यथील मंदिरात विवाहाच्या मुहूर्ताविना लग्नसोहळा वर्षाचे बारा महिने आयोजित करता येतो.

नानोडा येथील देवतांच्या सेवेसाठी बाताबाईने जोशी, केळकर, नातू, भुस्कुटे, गाडगीळ, शास्त्री, ओगले, दांडेकर, दामले, देवधर, गणपुले, सिद्धये अशा चित्पावन ब्राह्मण कुटुंबीयांची नियुक्ती केली. आयुष्यभर कमावेलली धनदौलत बाताबाईने देवस्थानासाठी अर्पण केली. नानोड्यात येण्यासाठी ओहोळावरती पुलाची आणि प्रवेशद्वाराची उभारणी तिने केल्याने घोडेमोडणी आणि विवाहसोहळ्याची मिरवणूक पूर्वी या पुलाचा आणि प्रवेशद्वाराचा उपयोग करत नव्हती.

कासारपाल पूर्वीच्या काळी कास्यांच्या धातूपासून दिवे, भांडीकुंडी तयार करणाऱ्या कासाराशी संबंधित असला पाहिजे. कर्नाटकातून कास्याचा होणारा पुरवठा जेव्हा खंडित झाला तेव्हा येथील कासार अन्यत्र स्थलांतरित झाले. आज कासारपाली येथे महामाया कालिकेचे प्राचीन संस्थान आहे.

तेराव्या शतकात नागदेवाने पेडण्यातील कासारवंडे हा गाव कासारपालच्या देवीला लखणशेट्टीच्या नावे दान दिला अशा आशयाचा ताम्रपट आढळला होता. गोव्यातल्या सुवर्णकार समाजासाठी महामायेचे हे संस्थान प्रेरणस्रोत आहे. कासारपाल येथून साळ जाण्याच्या मार्गावरती जेथे ‘सिद्धाची राय’ वडावल येथे आहे, तेथे संपूर्ण गोव्यातले महाकाय शिवलिंग आहे.

एकाच ठिकाणी दोन शिवलिंगे पाहायला या देवराईत मिळतात. तिसवाडी तालुक्यातल्या दीपवती बेटावरच्या नार्वे गावातून शिवलिंग सप्तकोटेश्वराच्या मंदिरातून मांडवी नदीपल्याड आणले तेव्हा ते लाटंबार्सेत आणल्याचा संदर्भ आढळतो. आज सिद्धाच्या देवराईत असलेले हे महाकाय शिवलिंग दीपवती बेटावरचे सप्तकोटेश्वराचे की मूळचे इथलेच, हे निश्चित सांगणे कठीण.

वृक्षवेलीच्या नैसर्गिक आच्छादनात वसलेले हे शिवलिंग गोव्याच्या सांस्कृतिक, धार्मिक वैभवाचे संचित आहे. कासारपाल येथे मृण्मयी भूमिकेचे, मूळ ग्रामदैवताचे मंदिर आहे. खरपाल येथे शांतादुर्गा केळबायचे मंदिर आहे. कोळगिरोसीठी केळाचे झाड राखून ठेवलेले आहे. खरपालच्या डोंगरमाथ्यावरती आदिम जमातीशी संबंधित असलेला विस्तीर्ण वड शेकडो वर्षांच्या इतिहासाचा साक्षीदार आहे. पोर्तुगीज कालखंडात दोडामार्ग येथे जी पोलिस चौकी होती, तेथील ख्रिस्तपंथीयांच्या सोयीसाठी प्रार्थना मंदिर उभारण्यात आले होते. आज ही चर्च त्याची स्मृती जागवत उभी आहे.

उसप सातेरी केळबायच्या कृपासावलीत विसावलेला गाव आहे. तेथून सावरधाटचा वाडा आहे. लांबोर, शिंदे, वरक, झोरे, कोकरे, खखत, शिंगाडी, शेळके या कुळातील धनगर जमातीचे वास्तव्य आहे.

Latambarcem Goa
Kalem: सफर गोव्याची! विजेचा कडकडाट झाला, शिलाखंडाला भेग पडली आणि दूधसागरचे पाणी 'काले' येथे प्रकट झाले

‘गजानृत्य’, ‘वाकुली’, फुगडी सारख्या लोकनृत्यांच्या सादरीकरणाद्वारे एकेकाळी त्यांचा दसरा सण साजरा व्हायचा. लाटंबार्सेत माड-पोफळीने नटलेली कुळागरे आहेत, तशाच आंब्या फणसाच्या बागा आहेत. लोहखनिजाच्या उत्खननाचा व्यवसाय इथे चालला होता. आज इथल्या खाणीच्या लिजेसच्या नूतनीकरणासाठी खाण व्यावसायिक प्रयत्नरत आहेत. चिरे, खडीचा व्यवसायही चालू आहे. गोव्याच्या ग्रामीण लोकजीवनाचे, सांस्कृतिक मूल्यांचे वैविध्यपूर्ण दर्शन घडवणारा हा गाव आज झपाट्याने बदलत चालला आहे.

शेती, बागायतीवरती जीवन जगणाऱ्या लोकसमूहाला पैशाची, संपत्तीची भूल घातली जात आहे. लोकवस्तीसाठी नवीन घरांची संख्या वाढत चालली आहे. वन आणि पर्यावरणाच्या अस्तित्वावरती संकटांची मालिका चालू आहे.

Latambarcem Goa
Panchwadi: सफर गोव्याची! आपल्या पूर्वजांना पाणी ‘खाता’ येत नाही, ते प्यावे लागते, एवढेच राजकीय ज्ञान होते; म्हैसाळचा ओहळ

तिराळी धरणाचे पाणी कालवे, पाटाद्वारे इथे आले. परंतु या जलसिंचनाला वारंवार गळती लागत असल्याने शेतकऱ्यांच्या जगण्याला अजूनही अर्थपूर्णता लाभण्यासाठी त्याचा परिणामकारक उपयोग होऊ शकलेला नाही. गोव्यात ठिकठिकाणी स्थापन केलेल्या औद्योगिक वसाहतीतल्या रिकाम्या जागांचा उपयोग परिपूर्ण झालेला नसताना, लाटंबार्सेत नवी वसाहत उभारण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. या साऱ्यामुळे इथला ग्रामीण चेहरा विस्मृतीत जाण्याच्या वाटेवर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com