Tamarind tree in india, tamarind uses in goa, history of tamarind tree Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Tamarind Tree: राम, सीता, लक्ष्मण वनवासात गेल्यावर प्रथम जिथे झोपडी बांधून राहिले असा, गुणधर्माने देवपण लाभलेला 'चिंच वृक्ष'

History of tamarind tree: तामिळनाडूत पुदुच्चरीपासून वीस-पंचवीस कि.मी. अंतरावरील भागात तिरुवक्कराय नावाचे गाव आहे, तिथे चिंच वृक्षाचे जिवाश्म जंगल (फॉसिल पार्क) आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मधू य. ना. गावकर

चिंचेचे नाव घेताच माणसाच्या तोंडात पाणी तयार होते आणि चिंच खाण्याचा मोह आवरत नाही. निसर्गात अनेक फळे पाहताच ती आपल्याकडे आकर्षित करतात. माणूस, पक्षी, जनावरे, सरपटणारे प्राणी आपला जीव धोक्यात घालून फळे किंवा अन्न मिळवण्यासाठी झाडाकडे धाव घेतात. अशातला चिंच वृक्ष आहे.

भारतात सर्वच भागात चिंच वृक्ष पाहावयास मिळतो. काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला चिंच वृक्षांची लागवड सावली देण्यासाठी केलेली आहे. प्रत्येक ठिकाणी लोकवस्ती भागात चिंच वृक्ष इतर झाडांबरोबर वाढतात.

मात्र जंगल, डोंगराळ भागात तो तसा परकीय ठरला आहे. चिंच वृक्षाला माणसाच्या जीवनात फार मोठे महत्त्व आहे, माणसाने या वृक्षाला देवराईत देवचार, भूत, ब्राह्मण, सटी, पिसो, शाणो नावे दिलेली ऐकावयास मिळतात. दुसरा प्रकार कार्तिक महिन्यात तुळसीविवाहात चिंच वृक्षाला तुळशीवृंदावनात लाऊन त्याची पूजा करून त्याला कृष्ण-सख्यांचा सवंगडी मानला आहे.

गोव्यात रोजच्या जेवणात चिंचगराचा उपयोग मोठ्या प्रमाणात करतात. कोकम, ओटम, अमसूल, बिंबल, करमल आणि चिंच यातला एक तरी पदार्थ प्रत्येकाच्या घरात असतोच. त्या आंबट पदार्थाशिवाय जेवण होणे मुश्कील आहे.

बाणस्तारी, साखळी, वाळपई, उजगाव, फोंडा, होंडा, अस्नोडा, म्हापसा, पेडणे, म्हार्दोळ, सांगे, केपे, कुडचडे, काणकोण या तालुक्यांत शहरी आठवडा बाजारात एप्रिल, मे महिन्यात चिंचेचा गर विकण्यासाठी मोठ्या प्रमाणात आणला जातो. शिवाय कर्नाटक, महाराष्ट्र या शेजारील राज्यांतून व्यापारी लोक मोठ्या प्रमाणात चिंचगर घेऊन गोव्याच्या आठवडा बाजारात विकण्यास येतात.

तोंडात पाणी आणणारा हा वृक्ष आफ्रिका खंडातून भारत विभक्त होताना आला, असे शास्त्रज्ञ मानतात. चिंच वृक्ष आपल्या वयोमानाप्रमाणे वाढत जातो. साधारण पाच, सहा मीटर वाढ झाल्यावर त्याला दोन, चार फांद्या फुटून तो वर्तुळाने पसरतो.

चिंच वृक्षाचे लाकूड एकदम घट्ट असते. इतकी, ते कापताना हत्याराची धार बोथट होते. त्याचप्रकारे शिरस, घोटींग, भिलमाड, बकुळी वृक्षांचे लाकूड एकदम घट्ट असते. चिंच वृक्ष शंभर-दीडशे वर्षे वयोमान गाठू शकतो. तो जास्त करून उन्मळून पडतो.

पडलेल्या वृक्षावरून वर्ष-दोन वर्षे गेल्यास त्याचे लाकूड नारळाच्या खोबऱ्याप्रमाणे फुटते, त्या लाकडाची आग एकदम तापलेल्या लाल लोखंडाप्रमाणे उष्ण असते. त्याचप्रकारे जांभा वृक्षाची आणि नारळाच्या करवंटीची आग उष्ण असते. लोहार - बेकरीवाले त्या लाकडास पसंती देतात. चिंचेच्या लाकडापासून नांगर बनवतात.

पोहे तयार करणाऱ्या लाटीस वापरतात. शेतातील खळीच्या मानशीस वापरतात. डॉकमध्ये बार्ज, बोटी उभारण्यासाठी अगर नवीन बांधकामासाठी वापरतात. खाऱ्या पाण्यात तेलाकुड टिकून राहते. चिंचेच्या झाडाची साल आतून तपकिरी-तांबूस रंगाची असते.

बाहेरच्या भागात काळपट दिसते. तो वृक्ष स्वत:च नैसर्गिक चित्रकार आहे. आपल्या अंगावरील सालीत एखादा कारागिराने बांबूपासून बनवलेल्या मोठ्या चटईप्रमाणे (हातरी, कडा) (डिझाईन) चित्र तयार करतो. संपणाऱ्या वसंत ऋतूत आणि ग्रीष्म ऋतूत त्याची पानगळ होऊन सात, आठ दिवसात पोपटी रंगाची नवीन पालवी अंगावर परिधान करून तो नव्या नवरीप्रमाणे सजण्यास लागतो.

पावसाचे पाणी अंगावर पडताच तांबूस पिवळ्या रंगाची फुले त्याला फुलू लागतात. त्या काळात त्या फुलांच्या परागावर बारीक काळ्या मुंग्यांचा वावर मोठ्या प्रमाणात चालतो.

फुलांच्या पाकळ्या गळल्यानंतर वृक्षाच्या खाली जमिनीवर तांबड्या, पिवळ्या रंगाची रांगोळी घातल्याप्रमाणे पाहावयास मिळते. फूल पंचपाकळी दिसले तरी वरच्या तीन पाकळ्यात वाढ होते. नंतर त्या फुलातून लांब देठाप्रमाणे चपट्या स्त्रीकेशर शेंगा दिसू लागतात.

आठ-दहा दिवसांत हिरव्या पिवळ्या रंगाच्या बहराने बाळशेंगा लटकतात. पावसाळ्यात त्यांची पूर्ण वाढ होऊन हिवाळ्याच्या सुरुवातीस येणाऱ्या कार्तिक द्वादशीला त्या वृक्षाची चिंचेच्या शेंगांची फांदी तुळशी वृंदावनात लाऊन त्या शेंगा श्रीकृष्णास अहेर म्हणून अर्पण करतात.

शिवरात्रीच्या दिवसांत त्या शेंगा पिकण्यास सुरुवात होते. लहान शाळकरी मुले त्या पिकल्यावर झाडावर दगड भिरकावून शेंगा खाली पाडून आवडीने खातात. चिंचेबरोबर रासळ, बोर, कणेर हा रानमेवा खाण्यास मुले टपलेली असतात.

चिंचेच्या गरापासून काट तयार करतात. पाणीपुरी, भेळपुरी करताना चिंतेच्या गाराचे पाणी वापरतात. लांब हिरवी मिर्ची तिखट असते. तिचा तिखटपणा जाण्यासाठी ती उभी चिरून त्यात मीठ आणि चिंचेच्या गराचे पाणी करून त्या पाण्यात त्या काहीवेळ ठेवल्याने तिचा तिखटपणा जातो. नंतर मिरच्या चण्याच्या पातळ पिठात बुडवून त्या तळतात.

अशा मिरच्या खाण्यास चवदार लागतात. चिंचेच्या बिया भाजून त्यांचे पीठ करून लाडू बनवतात. असे लाडू (डायबिटीज) मधुमेह झालेल्या माणसांना आरोग्यदायक असतात. चिंचेच्या भाजून सोललेल्या बिया शाळकरी मुले चॉकलेट प्रमाणे तासन्तास चघळतात. खाण्यास त्या रुचकर लागतात, पण तोंडात घातलेला चिंचोका तासभर तोंडात घोळवावा लागतो. तरीसुद्धा फोडताना दातात शक्ती आणावी लागते.

असा हा चिंच वृक्ष त्याची लागवड जास्त करून लोकवस्ती परिसरातील शेताचे बांध, नारळाच्या बागा, कुळागर बागायतीमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते. मात्र धार्मिक भावनेत त्याला काही लोक अशुभ मानतात.

काही ठिकाणच्या देवरायांत हे मोठाले वृक्ष पाहावयास मिळतात. त्याच्या झाडावर अगर मुळात ब्रह्मो, देवचार, सटी, भूत, अगर देवाचा साप राहतात असे धार्मिक लोक मानतात. आपल्या देशातील पर्वत, डोंगर अशा उंचावरील जंगलभाग सोडून तो सर्वच भागात पाहावयास मिळतो.

कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू राज्यात रस्त्याच्या कडेला याची लागवड मोठ्या प्रमाणात दिसते. त्या झाडावर कावळे, कवडे, खार, कोकीळ घरटी बांधून आपले भविष्य घडवतात. एखादे वेळी सरपटणारा प्राणी पक्ष्यांची अंडी अगर पिल्ले खाण्यास आला तर पक्ष्यांना जमवण्याचे काम खारुताई करते.

चिंच वृक्षाच्या पानापासून रंग तयार करून तो रेशीम कापडास वापरतात. त्याच्या शेंगांना अरबीत ‘तमर-ए-हिंद’ म्हणजे खजूर म्हणतात. ब्रिटिश वनस्पतीशास्त्रज्ञ कॅरोलस लिनीयस याने त्याला ‘टॅमरींड’ नाव दिले.

संस्कृत साहित्यात चिंचेचा उल्लेख सापडतो. राम, सीता, लक्ष्मण वनवासात गेल्यावर ते चिंचेच्या वृक्षाखाली प्रथम झोपडी बांधून राहिले असे रामायण म्हणते. महाभारत, अथर्ववेद, चरक, अमरकोष ग्रंथ साहित्यात चिंचेचा उल्लेख सापडतो.

महाकवी कालिदासाच्या ‘अभिज्ञान शाकुंतला’त चिंच फळाचा उल्लेख सापडतो, तसाच दंवडिच्या साहित्यात मिळतो. तामिळनाडूत तिरुनेलवली / तिरुचेंदूर गावात भलामोठा चिंच वृक्ष पाहावयास मिळतो. तिथले श्रद्धाळू त्याला देव मानतात.

कर्नाटकात बंगळूर शहराजवळ नल्लूर गावात भरपूर प्रमाणात चिंच वृक्ष आहेत. त्यात पाचवे शतक पूर्ण करणारा एक महाकाय वृक्ष आहे. तामीळ लेखक सुंदरस्वामी यांनी चिंच वृक्षाबद्दल बरेच साहित्य निर्माण केले आहे. तामिळनाडू राज्यात पुदुच्चरीपासून वीस-पंचवीस कि.मी. अंतरावरील भागात तिरुवक्कराय नावाचे गाव आहे, तिथे चिंच वृक्षाचे जिवाश्म जंगल (फॉसिल पार्क) आहे.

त्या जागेला तिथल्या सरकाराने देवराईप्रमाणे संरक्षित केले आहे. त्या संरक्षित जंगलात लाखो वर्षांपूर्वी गाडलेले चिंचेचे जिवाश्म पाहावयास मिळतात. तिथे अनेक जातीचे अश्मीभूत वृक्षांचे पडलेले ओंडके जिवाश्मांचा इतिहास सांगतात. शास्त्रज्ञांनी त्या ओंडक्यांचा अभ्यास करून त्यांना ‘टमरीन डोक्सोलोन’ नाव दिले आहे.

अशा कठीण कवच असलेल्या धनुष्य आकाराच्या चेपट्या शेंगांमधील गराने तांब्या, पितळीची भांडी घासल्यास त्यांना नवी चकाकी येते. असा हा चिंच वृक्ष माणूस आणि इतर प्राण्यांचा तारणकर्ता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: आरोन जॉर्जनं धू-धू धुतलं, मग दीपेश-कनिष्कनं गारद केलं, टीम इंडियानं पाकिस्तानला 90 धावांनी लोळवलं VIDEO

School Bus Accident: 25 शाळकरी मुलांवर काळाचा घाला! स्कूल बस नदीत कोसळल्याने हाहाकार; पालकांची धावपळ

Accident News: कार थेट झाडावर आदळली, रामनगर-धारवाड महामार्गावर भीषण अपघात; पणजीच्या 55 वर्षीय चालकाचा जागीच मृत्यू

2 मुलं, 6 वर्ष एकत्र; धुरंधर फेम अर्जुन रामपाल 'एंगेज्ड'! गिर्ल्डफ्रेन्डबद्दल म्हणाला, 'मी तिच्यामागे लागलो कारण ती..."

IND vs PAK: डोक्याला चेंडू लागला, पण मैदान सोडलं नाही, भारताचा 'फायटर' लढला; हायव्होल्टेज सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांची केली चांगलीच धुलाई VIDEO

SCROLL FOR NEXT