Coconut Tree: पोर्तुगीज येण्याआधीपासून गोव्यात असलेला, 80 देशांत लागवड होणारा कल्पवृक्ष 'नारळ'

Coconut Tree Goa: आमचे पूर्वज पुढच्या पिढ्यांसाठी काही जतन करून ठेवावे म्हणून कवाथे लावत. त्याचे फळ त्यांना खायला मिळेल की नाही याची चिंता त्यांनी कधी केली नाही.
Coconut Day
coconut treeDainik Gomantak
Published on
Updated on

मधू य. ना. गावकर

दैनिक ‘गोमन्तका’ने दि. १० ऑक्टोबर रोजी माड आणि त्याचे उत्पादन या विषयावर गोव्यात चर्चासत्र आयोजित करून कृषी विकासाची जागृती केली, याबद्दल धन्यवाद! आपल्या भारतात पूर्व, पश्‍चिम आणि दक्षिण किनारपट्टीकडील बंगाल, ओरिसा, झारखंड, आंध्र, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र या राज्यांत माडाच्या बागायती मोठ्या प्रमाणात आहेत.

खरे म्हणजे नारळ उत्पादनात आपला देश स्वयंपूर्ण होता. आपल्या देशात सर्वच तालुक्यांनी कुळागरे, नारळाच्या बागा आणि शेती पाहावयास मिळत होती. गोव्यात बाणावली आणि कळंगुट या दोन गावांचे नारळ रुचकर म्हणून त्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

दोन्ही गावांतून माडाची रोपे आणून त्यांची लागवड करीत होते. गोव्यातील कृषी फळफळावळीची चव वेगवेगळ्या गावात प्रसिद्ध आहे.

जसा नारळ त्याच प्रकारे चोडणचा मानकुराद, जुवेची भेंडी, आगशीचा मुळा, खोल व मांद्रेची मिर्ची, ताळगावची वांगी, कुंभारजुवेची काकडी, काणकोणचे टरबूज, पर्राचे कलिंगड, केरीची काटेकणगी, साळगावचा अळसांदा, खांडोळ्याचा कांदा, पाळी व वांत्याचे फणस, शिवाय मयडेची केळी, तिवऱ्याचे पोहे, सत्तरीची अळूमाडी अशी वैशिष्ट्यपूर्ण फळे आपल्या गोव्यात मिळत होती.

गोव्यात नारळाला फार मोठे महत्त्व आहे. पूर्वी माड लागवड करताना एक/एक मीटर चौकोनी खड्डा खणून त्यात पालापाचोळा भरून त्याला आग लावून तो खड्डा भाजून घेत असत.

त्यात नारळाचा काथा, सोडणे आणि सुपीक माती भरली जात असे. मे महिन्यात कवाथ्याची लागवड करून त्या रोपाला पाणी देऊन मान्सून येईपर्यंत त्याची निगा राखत होते. तोपर्यंत त्याला मूळ धरून नवीन झावळे येण्यास सुरुवात होत होती.

पाऊस संपून हिवाळा सुरू झाला म्हणजे त्याचा मुळावर झुडपांचा पाचोळा, सुके शेण, चुलीतील राख घालून त्यावर थोडी माती पसरून मूळ झाकून त्याला पाणी देत होते. कोणतेही झाड पावसाळ्यानंतर मार्च, एप्रिलपर्यंत आपल्या अंगात पाणी खेचून साठवते.

माडाला वर्षाकाठी बारा झावळे येतात. चांगली मशागत केल्यास नारळाचे झाड आठ-दहा वर्षांत पीक द्यायला सुरुवात करते. खांदी नसलेले माडाचे झाड आकाशाला भिडण्याचा प्रयत्न करते. त्याचे उत्पन्न शंभर सव्वाशे वर्षापर्यंत मिळते.

माडाच्या झाडाला चांगले खतपाणी घातल्यास तो तीन महिन्यात तीन घोसांना चाळीस पन्नास नारळांची सहज खळे देतो. नारळाची शहाळी हे माणसाचे नैसर्गिक आरोग्याचे औषध अगर अन्न आहे. माणसाच्या अन्नात नारळ महत्त्वाचा घटक आहे.

कोणत्याही गोड तिखट पदार्थाला त्याची गरज लागते. नारळाच्या खोबऱ्यापासून तेल काढतात त्याचा अन्नात खाण्यास उपयोग करतात. त्याचे तेल शरीराला लावून आंघोळ करतात. त्या तेलाने मसाज करतात. देवळात अगर घरात दीप पेटवण्यास खोबरेल वापरतात.

सर्दी झाल्यास तापवलेले तेल थंड करून कानात, नाकात घालतात व डोक्यासही चोळतात. या तेलाने केस काळे राहतात. त्याशिवाय गोवेकरांची ‘तैलबुद्धी’ पूर्वी फार प्रसिद्ध होती, तीही बहुधा या खोबरेल तेल लावण्यामुळेच असावी!

पूर्वी घरातील मातीची जमीन घट्ट आणि गुळगुळीत होण्यासाठी लाकडी धपाट्याने जमीन बडवताना त्या जमिनीवर खोबरेल तेलाचा लेप लावून जमीन सारवीत होते. माडाचा प्रत्येक भाग माणसाला सर्वबाबतीत उपयोगी पडतो; म्हणूनच तर त्याला कल्पवृक्ष म्हटले जाते.

फळधारणा होण्यास ‘घुंगुल्ला’ नामक भडक निळ्या रंगाचा कीटक मदत करतो. माडाला नर आणि मादी दोन प्रकारची फुले येतात. मादी फूल जरा मोठ्या आकाराचे असते. त्याचा पिवळा कोवळा भाग आवडीने खातात. कोंब आलेल्या नारळाला आत क्रिकेटच्या चेंडूप्रमाणे सफेद नारळ मिळतो. त्याला ‘मरांदा’ म्हणतात.

खोबऱ्याचे तेल काढून राहिलेली पेंड गुरांना खाण्यास देतात. नारळाच्या हिरव्या झावळापासून चटई, मल्ल, पलय, पावसाळ्यात वापरण्यास कण्णा पोह्यांची हिरावणी, कचरा एकत्र करण्यास झाडू, पक्ष्यांना ठेवण्यास पिंजरा,

घर शाकारणीस सापळे, डोक्यावर घालण्यास टोपी, सजावट करण्यास हार, झावळाच्या वरील बाजूचे दोर, बाजूच्या कामटाच्या काड्या पत्रावळी करण्यास उपयोग करतात. हिरवे झावळ विणून दारात लग्नास अगर देवळाकडे मुलांचा मंडप उभारतात.

घराच्या पडवीला पावसाचे पाणी आत येऊ नये म्हणून मल्लाचा पडदा बनवतात. सोडणांच्या काथ्यापासून दोरी बनवतात. कीस झाडांच्या मुळात खत म्हणून वापरतात. माडाचा मऊ कीस मुळात पाणी साठवून ठेवतो. माडाच्या मुंड्याचे वासे बनवून ते घर शाकारणीस वापरतात. माडाची साल जळणास वापरतात.

नागाच्या फण्याप्रमाणे दिसणारा झावळाचा पिडा सीमा आखण्यास शेतात वापरतात. झावळाचा जुना पालापाचोळा नैसर्गिक खत म्हणून झाडांना अगर बागायतीला वापरतात. नारळ जेवणा-खाणात वापरला जातो, त्याहीपेक्षा त्याला मानवाने देवकार्यात प्रथम स्थान दिले आहे.

बोहल्यावर चढणाऱ्या नवरदेवाच्या हातात नारळ देत, सुवासिनी बायांची ओटी भरतात. देवाला ओटी अर्पण करतात. पालखी, उत्सवात नारळ ठेवतात. देवाला सांगणे घालताना नारळ ठेवतात. होळीला नारळ बांधतात. देवाला पुजण्यापूर्वी नारळाची पूजा करतात. नारळ वाढवण्याचा व नरबळीचा बादरायण संबंध काही विचारवंत जोडतात, तो अत्यंत चुकीचा आहे.

‘श्रीफलानि समायुञ्जन्, श्रियं वर्धयन्तु नः्।(अथर्ववेद ११.४.२)’ असा उल्लेख अथर्ववेदात आहे, याचा अर्थच वेदकाळापासून नारळाला मंगल, पवित्र, शुभ फळ मानले गेले आहे. अपवादात्मक, तंत्रमार्गी नरबळीचा संबंध संपूर्ण संस्कृतीशी जोडून ‘लोक आधी नरबळी द्यायचे त्याऐवजी नारळ फोडू लागले’, असा लावणे म्हणजे आमची समृद्ध संस्कृती किती हीन आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न करणे होय!

नारळ हा मंगलकार्यात शुभफलच होता, तो नरबळीचे प्रतीक कदापि नाही! देवकार्यात शुभ व मंगल असणारे या फळाचा प्रत्येक भाग माणसाच्या कोणत्या ना कोणत्या व्यावहारिक कामास उपयुक्त होता.

नारळाच्या करवंट्यांचे कोळसे इस्त्रीत घालून पूर्वी कपड्यांना इस्त्री करीत होते. कारण करवंटीची आग आणि जांभा लाकडाची आग एकदमच तापलेल्या लाल लोखंडाप्रमाणे असते. करवंट्यापासून सजावट करतात. असे हे कल्पवृक्षाचे झाड रखरखत्या उन्हात काम करून थोडा विसाव्यासाठी सावली शोधणाऱ्या शेतकऱ्याला बांधावर सावली देते. पक्ष्यांना घरटी देणारे, पोपटाला (ढोल) बीळ देणारे माड कायम सर्वांसाठी आप्त, देवतुल्यचआहे.

गोव्याच्या बाराही तालुक्यांना अर्धी हिरवळ माडांनी दिली आहे. माड (नारळाचे झाड), भिल्लमाड, पाम, रुमड, माडी (पोफळी), एरंड, केळ, ऊस ही झाडे आणि तृण मोठ्या प्रमाणात पाणी खेचून घेतात. माडाच्या रसापासून गूळ आणि दारू बनवतात. पूर्वी ‘पदेर’ माडाचा रस पिठात घालून पाव, उणा, काकण, बिस्कीट करण्यास वापरत होते. त्याने त्या वस्तू रुचकर लागत होत्या.

भूगोल, इतिहासकारांच्या मते सुपारीचे मूळ पूर्व-दक्षिण भारताच्या किनाऱ्यावर सापडले. पण नारळाचे कूळ आणि मूळ उत्तर अंदमान बेटाकडील कोकोस बेटावर सापडले असे तज्ज्ञ मानतात.

काहीच्या मते कोको म्हणजे माकडाचा चेहरा नारळाच्या कवचाला वरून तीन डोळे असतात. म्हणून त्याला करवंटीला माकडाचे दोन डोळे आणि तोंड मानतात. वाल्मिकी रामायणात नारळाचा उल्लेख सापडतो.

संस्कृत भाषेत त्याला नारिकेल, बंगाली नारीकेल, कन्नड तरे, तामीळ तेन्न, तेलगू टेकीया, इंग्रजी कोकनट, मराठीत नारळ कोकणीत नाल्ल, अशी वेगवेगळी नावे आहेत. आज जगातील ऐंशी देशात त्याची लागवड पोहोचली आहे.

Coconut Day
National Coconut Conclave: खोबऱ्याचे चिप्स, माडाच्या सुरापासून साखर; नारळ उत्पादने ठरली लक्षवेधी, दालनांवर कृषीप्रेमी रमले

त्याच प्रकारे भारताच्या किनारपट्टीशिवाय इतर राज्यांतही त्याची लागवड होऊ लागली आहे. गोव्यात काही फळझाडे पोर्तुगिजांनी आणली. पण माड हा कल्पवृक्ष ते येण्याच्या अगोदरपासून होता, हेही तितकेच खरे!

आज नारळाच्या कोवळ्या खोबऱ्यापासून बाजारात आइस्क्रीम आले असून ते बरेच महाग आहे. तरीसुद्धा त्याला मोठी मागणी आहे. गोव्यात श्रावणातील रविवार, नागपंचमी, चतुर्थी पंचमी उत्सवाच्या दिवशी कोवळ्या खोबऱ्याच्या हळदीची पाने वापरून पातोळ्या बनवतात.

Coconut Day
National Coconut Conclave: नारळ उत्पादकांसाठी खुशखबर! 80% मागण्या मुख्यमंत्र्यांकडून मान्य; वाचा संपूर्ण अहवाल

चतुर्थी, शिगमोत्सवात खोबऱ्याच्या करंज्या, पंचखाद्य, मोदक बनवतात. आता गोव्यात विकासाच्या नावाने देवतुल्य मानलेल्या माडावर संकट येऊन त्यांना कापून शहरीकरण होत आहे. आमच्या पूर्वजांनी माड लावून त्याची फळे खात, पाण्याच्या आधारे पर्यावरण राखले होते. आज माडाचे झाड संकटात आहे.

दोन आण्यास मिळणारा नारळ ७०-८० रुपयांवर पोहोचला आहे. आमचे पूर्वज पुढच्या पिढ्यांसाठी काही जतन करून ठेवावे म्हणून कवाथे लावत. त्याचे फळ त्यांना खायला मिळेल की नाही याची चिंता त्यांनी कधी केली नाही. आज आम्ही आकाशी झेप घेत अमृत देणाऱ्या या कल्पवृक्षाचे संचित नष्ट करून पुढील पिढ्यांसाठी काय मागे ठेवणार आहोत?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com