अॅड. सूरज मळीक
सत्तरीतील हिवरे खुर्द आणि कर्नाटकातील चोर्ला गावांच्या कुशीत सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर वसलेला सुर्ल हा गाव बाराही महिने तेथील आगळ्यावेगळ्या निसर्गसौंदर्याचे आविष्कार दर्शवीत असतो. ठाणे डोंगुर्ली ग्रामपंचायतीच्या कक्षेत येणारा, गोव्यातील माथेरान म्हणून नावारूपास आलेला हा गाव समुद्रसपाटीपासून ८११ मी. इतक्या प्रचंड उंचीवर आहे.
गोव्यातून या गावात जाताना चोर्ला घाटाच्या माथ्यावरती पोहोचताच हवामानात आकस्मिकपणे शीतलता जाणवू लागते. पुढे कर्नाटकातील चोर्ला गावात प्रवेश करून गोव्यातील सुर्ल गावात प्रवेश होतो. उन्हाळ्यातसुद्धा सकाळच्या वेळी थंड हवा आणि धुक्याने व्यापलेला परिसर माथेरानमध्ये अनुभवायला मिळतो.
तिथले हवामान निरंतर बदलत राहते. सुर्ल हा गावही तसाच आहे. विपुल हिरवाईने नटलेले जणू ते एक थंड हवेचे ठिकाण. आज घाटाच्या पायथ्याशी असलेल्या गोव्यातील इतर प्रदेशात तापमानवाढीमुळे आपल्याला घाम सुटतो. परंतु सुर्ल गावात या दिवसातसुद्धा आल्हाददायक वातावरण असते. फुलपाखरांचे प्रजनन सुरू असते. पक्ष्यांचा किलबिलाट असतो.
पूर्वी आशिया खंड आणि आफ्रिका खंड एकत्र होते. काही हजारो वर्षांपूर्वी ते तुटून एकमेकांपासून वेगळे झाले. आज सुर्ल गावाच्या पायकाच्या पठारावर उभे राहून कर्नाटकातील पारवडच्या दिशेने पाहिले तर तुटून वेगळा झालेला भाग इथे येऊन स्थिरावल्याची प्रचिती येते. हाच तो दख्खनचा पठार. कातळ दगडांनी युक्त, महाकाय उंची असलेल्या, कित्येक मैल लांब असलेल्या या प्रदेशाला पूर्वी गोंडवन म्हणून ओळखले जायचे. या पठाराच्या कुशीत दुग्ध स्वरूपात कोसळणारा लाडकेचा धबधबा तर आपल्याला वेगळ्याच विश्वात घेऊन जातो.
ऐतिहासिक वारसा मिरवणाऱ्या या गावात कधीकाळी झाडेझुडपे कापून इथल्या कष्टकरी जातीजमातींनी कुमेरी शेती करायला सुरुवात केली. दिवसेंदिवस झाडांची कत्तल होताना पाहून त्यांनी सगळ्याच जंगलसंपदेचा र्हास होऊ नये म्हणून देवराई निर्माण केल्या. गावातील सर्वांत उंचावर असलेला पाताळाचा सडा त्याचबरोबर पाईकाचा सडा, तळवाचा सडा, दवलेमाणीचा सडा ही स्थलनामे पाहिल्यास आपल्याला येथे वास्तव करीत असलेल्या आपल्या पूर्वजांच्या या कातळ सड्याशी पूर्वापार असलेल्या भावना आणि परस्परसंबंध लक्षात येतो.
सुर्ल हा गाव जांभ्या दगडाने युक्त आहे. हा सच्छिद्र दगड असतो. मान्सूनच्या मुसळधार कोसळलेल्या पावसाचे पाणी या विस्तीर्ण पसरलेल्या पठारात झिरपते. त्यामुळे गोव्याला नदी-झऱ्यांद्वारे बारमाही पाणी उपलब्ध होते. त्यामुळे हे पठार जणू नैसर्गिक पर्जन्य जल संचयनाची यंत्रणा इथे कार्यान्वित असते.
डोंगर माथ्यावरून धावत आलेले पाणी पठारावरून बाराजाण धबधब्यातून प्रवाहित होत लाडकेच्या धबधब्यातून कळसाच्या रूपाने खाली कोसळते. पुढे जाऊन नानोडा नदी बनून ती म्हादई नदीला भरपूर गोड्या पाण्याचा साठा उपलब्ध करते. उष्ण कटिबंधीय जंगलाने समृद्ध असलेल्या या गावाचे नैसर्गिक वैभव आज हरवत चालले आहे. या पाण्यावर अवलंबून असलेल्या गोमंतवासीयांवर आज संकट आलेले आहे, कारण कर्नाटक सरकारने याच नदीवर धरण बांधून हे पाणी मलप्रभा नदीत वळविण्याचा प्रस्ताव मांडलेला आहे.
फुलपाखरांची खाद्य वनस्पती असेल तर त्यांचे जगणे समृद्ध होते. वड, पिंपळ, रूमड या सारख्या फिग कुळातील सदाहरित वृक्ष कॉमन मॅप विंग फुलपाखराची खाद्य वनस्पती आहे. या झाडावर ती अंडी लावतात. मराठीत या फुलपाखराला नकाशा असे म्हणतात.
गोव्यातील इतर भागातही वृक्ष भरपूर प्रमाणात आहेत पण तिथे हे फुलपाखरू काही आपल्या नजरेस येत नाही. परंतु कळसा नदीच्या पात्रात व सभोवतालच्या म्हादई अभयारण्यात त्यांचे विशेष दर्शन होते. एखाद्या कागदाच्या तुकड्यावर नकाशासारख्या उभ्या आणि आडव्या रेषा असतात.
पांढरा रंग असल्यामुळे नदी पात्रात ठिकठिकाणी क्षारशोषण करताना ही फुलपाखरे लगेच दृष्टीस पडतात. ही फुलपाखरे इथेच विपुल प्रमाणात का दिसतात हा प्रश्न पडतो. फुलपाखरांना तेथील बारमाही वाहणारे नदी, झरे आणि हवामानातील आर्द्रता कारणीभूत ठरते. मे महिन्यात सुर्ल गावातून पठाराच्या दिशेने चालत जाताना अंगणातील फणसावर व पठारावरील अंजनाच्या झाडावर कानफोडी आमरीचे दर्शन घडते. पावसाळ्यात तर संपूर्ण पठारावर आमरीच्या असंख्य प्रजाती पाहायला मिळतात. झाडाझुडपांवर बाहुलीसारखी दिसणारी पांढरीशुभ्र आमरी वाऱ्यासोबत डुलताना कोणाचेही मन लुभावणारी असते. जमिनीवर उमलणारी टूथ ब्रश आमरी बरोबर इतर कीटक भक्षी पुष्प वनस्पती संपूर्ण पठाराला सुगंधित बहराने सजवतात.
सकाळच्या वेळी येथे जणू पांढरे ढग जमिनीला स्पर्श करून पुढे सरकत असतात. येथील झाडांच्या फांद्यांकडे पाहिले तर त्याच्या नागमोडी रचना बघून थक्क व्हायला होते. फांद्या वर जाण्याचा प्रयत्न करतात पण पुन्हा खालच्या दिशेने वाकतात. पुन्हा पुन्हा या फांद्या वर खाली का जातात?
हा गाव भरपूर उंचीवर असल्यामुळे येथे प्रचंड हवा खेळत असले. पावसाळ्यात तर मुसळधार पावसामुळे झाडावर दबाव येतो. तेव्हा आपल्या फांद्या खालच्या बाजूने करून ती तग धरून उभी राहतात. वारा आणि पाऊस इथल्या झाडाझुडपांना आकार देत असतो. गोव्यातील स्थानिक जंगलात आढळणारे नाण्याचे झाड साधारणतः सरळ वर वर जाते. परंतु या पठारावर त्याच्या फांद्या पसरट झालेल्या दिसतात. फांद्यांना नागमोडी आकार आलेला दिसतो.
उन्हाळ्यात पठारावर ठिकठिकाणी जंगली जांभूळ उपलब्ध होतात. या झाडाच्या फांद्यासुद्धा जमिनीच्या दिशेने वाकलेल्या असतात. त्यामुळे ही फळे जमिनीवर उभे राहून सहज काढता येतात. गोव्यातील इतर भागात आढळणाऱ्या जांभळापेक्षा ही जांभळे लहान असतात. त्याची पानेसुद्धा लहान असतात. पण फळांचा रंग आणि पानांचा आकार सामान असल्यामुळे ती लगेच ओळखता येतात.
गवा, अस्वल, वाघ, रान कुत्रे या सारखी जंगली श्वापदांचे दर्शन या पठारावर होत असते. भ्रमंती करताना कधी वाटेवर अस्वलाची विष्ठा नजरेस येते. त्यामध्ये भरपूर प्रमाणात जांभळाच्या बिया आढळतात. त्यामुळे हे स्पष्ट होते की जांभळाच्या झाडाच्या परिसरात अस्वलांचा वावर असतो. उन्हाळ्यात ती मौसमी फळासोबत जांभळे खाऊन आपले पोट भरत असतात. जंगलातील झाडांच्या खोडाकडे लक्ष फिरविले तर काही झाडांवर काहीतरी घासून तेथे माती लागलेली दिसते. ही त्यांची खूण असते. या प्रकारे अस्वल आपल्या प्रदेशाची ओळख दाखवते.
आज देशविदेशातल्या पर्यटकांसाठी नंदनवन ठरलेल्या या गावातील जंगल, पर्यावरणीय परिसंस्था आणि वन्यजीव यांचे सर्वधन आणि संरक्षण करून येथील भूमिपुत्रांनी शाश्वत विकासाची मुहूर्तमेढ रोवली होती. या गावात असलेल्या देवरायांनी केवळ तेथील वृक्षवेलींचेच नव्हे तर तेथे राहणाऱ्या पशुपक्षी, कृमीकिटकांसारख्या असंख्य सजीवांचे संवर्धन करताना नद्या झऱ्यांचे पावित्र्य त्यांनी जपले. देवराईच्या नियमांचे त्यांनी काटेकोरपणे पालन केले. त्यामुळे आज दुर्मीळ प्रजातीच्या वृक्षवेली पशुपक्षी या गावात बघायला मिळतात. निसर्गप्रेमींना सुंदर आणि समृद्ध जीवन जगण्याचा सूर इथे गवसला होता आणि त्यामुळे या गावाचे नाव सुर्ल पडले असावे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.