Goa Tourism: सफर गोव्याची! चोर्ला घाटातून दिसणारा 3 नद्यांचा उगम, पोर्तुगीज पुस्तकात रेखाटलेले गुळ्ळेच्या धबधब्याचे सुंदर चित्र

Scenic Goa: फणसुली गावाच्या माथ्यावरती उभे राहिले असता पावसाळी मौसमात भारताच्या नकाशासारखा जो विलोभनीय जलाशय दिसतो, तेथून एकेकाळी तीन नद्यांचा उगम व्हायचा.
River water
Stream Canva
Published on
Updated on

सत्तरीतल्या बहुतांश गावांना पश्चिम घाटातल्या एकापेक्षा एक उंच पर्वतरांगांचे वैभव लाभलेले आहे. त्यामुळे इथल्या वृक्षांनी आच्छादलेल्या डोंगर उतारावरती कोसळणारी मान्सूनी पावसाची वृष्टी भूमीत जिरते आणि इथल्या जमिनीत भूजलाची वृद्धी होते. जमिनीत जिरलेले हे पाणी बारमाही जेव्हा प्रवाहित होते. तेव्हा तेथे नदीचा जन्म होतो.

केरीहून चोर्लाघाटमार्गे जाणाऱ्या बेळगावच्या मार्गावरती असलेल्या फणसुली गावाच्या माथ्यावरती उभे राहिले असता पावसाळी मौसमात भारताच्या नकाशासारखा जो विलोभनीय जलाशय दिसतो, तेथून एकेकाळी तीन नद्यांचा उगम व्हायचा असे जर कोणाला सांगितले तर त्यांचा विश्वास बसणार नाही इतका कायापालट या परिसराचा झाला आहे.

२.३२५ चौरस किलोमीटर क्षेत्रफळात विसावलेल्या हणजुणे धरणाच्या जलाशयात गुळ्ळे, फणसुली, केळावडे आणि हणजुणे या चार गावांतले जलस्रोत आणि नद्या आज विसर्जित झालेल्या आहेत. हणजुणे, केळावडे, गुळ्ळे, आणि फणसुली या चार गावांतून येणारे पाणी इथल्या तीन नद्यांद्वारे वाहत यायचे आणि जेथे हणजुण्याचे धरण उभे राहिलेले आहे, तेथून हे तिन्ही जलस्रोत एक होऊन केरी गावात कळटी या नावाने नदी प्रवेश करायचे.

हणजुणे, फणसुली, केळावडे आणि गुळ्ळे ही केरी गट ग्रामपंचायत क्षेत्रातली स्वतंत्र ओळख असलेली चारही गावे आज धरणाच्या जलाशयाखाली गेलेली आहेत. इथल्या चार गावांत गुळ्ळेला शेकडो वर्षांच्या समृद्ध इतिहासाची पार्श्वभूमी लाभली होती.

गोवा कदंब राजघराण्याचे चिन्ह कोरलेली गजलक्ष्मी गुळ्ळेच्या वैभवशाली इतिहासाची प्रचिती आणून देते. सप्तमातृकादैवत परिवाराशी नाते सांगणाऱ्या देवदेवतांचे होणारे पूजन, घोड्यांना पाणी पाजण्यासाठी असलेल्या दगडाच्या दोणी, इथल्या काही घरांत असणाऱ्या लखलखत्या तलवारी, शिगमोत्सवात सादर केले जाणारे भरणूल लोकनाट्याची समृद्ध परंपरा, बारा वंशाच्या मळावर चारही गावांची संयुक्त घोडेमोडणी लोकनृत्याची परंपरा, गुळ्ळेच्या इतिहास आणि संस्कृतीवरती प्रकाशझोत टाकते.

चोर्लाघाटाचा पारंपरिक मार्ग जात असल्याकारणाने इथे नाना जाती जमातींच्या आणि व्यवसायांतल्या लोकांचे वास्तव्य होते. गुळ्ळेच्या जुन्या गावात मुस्लिमांची वस्ती होती. आणि त्यांच्यासाठी तेथे मशिदीची उभारणी करण्यात आली होती.

गुळ्ळे गावात असलेल्या राणे सरदेसाई कुटुंबाचा विस्तार केवळ गुळ्ळेपुरता राहिला नाही तर इथल्या घराण्यातून सत्तरीतल्या राणेच्या बंडात पोर्तुगिजांविरुद्ध कडवी झुंज देणारे आणि वेळप्रसंगी लढता लढता हौतात्म्य पत्करणारे कर्तृत्ववान पुरुषोत्तम निर्माण झाले होते. गुळ्ळे या सह्यद्रीच्या कुशीत वसलेल्या गावात दक्षिण गोव्यातल्या धारबांदोड्यातल्या आदिवासी कुणबी जमातीचे जुन्या काळी आगमन झाले होते. कुमेरी शेती करणाऱ्या या जमातीची कथा आणि या गावातल्या सांस्कृतिक, सामाजिक पैलूंचे दर्शन शिगम्यात होणाऱ्या भरणूल लोकनाट्यातून घडते.

गुळ्ळे गाव वाघेरी डोंगराच्या सावलीत वसलेला आहे. वाघेरीवरचे पावसाळी पाणी इथल्या जंगलात मुरते आणि येथील माड्यातून नदीचे रूप घेऊन हे पाणी खाली वाहत येते. पूर्वी नदीच्या उगम परिसरात खष्टाची झाडे विपुल प्रमाणात होती. या खष्टाच्या फळांपासून खष्टैल काढले जायचे आणि त्यामुळेच ही नदी कळटी म्हणून नावारूपास आली. घाटमाथ्यावरच्या प्रदेशाला जोडणारा महत्त्वाचा घाटमार्ग तेव्हा गुळ्ळे, केळावडे गावांतून जायचा. ते

थून चोर्लाघाटात जाणाऱ्या प्रवाशांना गुळ्ळे येथील विलोभनीय धबधब्यांचे दर्शन व्हायचे. गोव्यासंदर्भात पोर्तुगीज भाषेत लिहिलेल्या पुस्तकात लॅपिश मेंडिस यांनी गुळ्ळेच्या धबधब्याचे सुंदर चित्र रेखाटलेले आहे. हणजुणे धरणाच्या जलाशयाखाली जेव्हा इथून जाणारा प्राचीन चोर्लाघाट जलाशयाखाली गेला तेव्हा गुळ्ळेचा कळटी नदीशी निगडीत धबधबा विस्मृतीत गेला. शिगम्यात गुळ्ळेत पारंपरिक सकारती गायन, तालगडी, घोडेमोडणीसारखे लोकनृत्य, भरणूलसारखे पारंपरिक लोकनाट्य या साऱ्या लोकसंचितातून गावच्या संस्कृतीचे दर्शन व्हायचे.

River water
Codar: सफर गोव्याची! भातशेती भिजवून, दुधसागराकडून वाहत येऊन खांडेपार नदीत सामील होणारा 'कोडारचा ओहळ'

गुळ्ळेशेजारी असलेले केळावडे हे सातेर केळबाय लोकदैवतांशी निगडीत गाव केळीच्या लागवडीसाठी प्रसिद्ध होते. सालदाटी, रसपाळी, अशा केळ्यांच्या प्रजातीची इथे लागवड केली जायची. सोमवारी साखळीत भरणाऱ्या साप्ताहिक बाजारात केळ्यांच्या घडांचे ओझे पाठीवरती टाकून इथले कष्टकरी रविवारी दुपारी निघून संध्याकाळी केरीत मुक्काम करायचे आणि पहाटे लवकर उठून साखळीतल्या बाजारात केळी विक्री करण्यासाठी जायचे.

केळ्याबरोबर त्याकाळी कुमेरी शेतीत पिकवले जाणारी वरी,पाखड, कांगो, तूर, कुळिथासारख्या धान्यांची विक्री करण्यास या परिसरातले कष्टकरी यायचे. वृक्षवेलींच्या सावलीत आणि महापाषाणांच्या सान्निध्यात असलेले केळावडे गावचे सांतेर-केळबायचे देवस्थान इथल्या कष्टकऱ्यांसाठी सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक मूल्यांचे केंद्र ठरले होते. आंबे, फणस, केळी आणि कुमेरी शेतीसाठी प्रसिद्ध असलेल्या गावात कालांतराने काजूच्या बागायती निर्माण झाल्या. कोकम, ओटमाची सोलांची विक्री केली जायची.

River water
Goa Tourism: सफर गोव्याची! गोमंतकीयांना पाणी पुरवणारा निसर्गरम्य 'ओपाचा ओहोळ', जैवविविधतेचा समृद्ध ठेवा पर्यावरणप्रेमींसाठी पर्वणी

गोवा कदंब राजवटीत कर्तृत्ववान मुस्लिमांना राजाश्रय लाभला होता. मध्ययुगीन काळात हणजूण येथे मुस्लिमांची वस्ती असावी आणि त्यामुळे हंजामनवरून हणजुणे हे ग्रामनाम निर्माण झाले असावे. आफ्रिकेतल्या खाप्रींचे बंड मोडण्यासाठी पोर्तुगीज सरकारने गोव्यातून इथल्या सैनिकांची पाठवणी आफ्रिकेतल्या मोझांबिक देशात केली होती, त्यात हणजुणे गावातल्या सैनिकांचा सहभाग होता.

मौसमकर नावाने ओळखले जाणारे हे घराणे मोझांबिक देशाची स्मृती जागवते. महाराष्ट्रातल्या विर्डी गावाशी तसेच सत्तरीतल्या चरावणेशी सीमा भिडलेला फणसुली, पूर्वी फणसांच्या मुबलक पैदासीसाठी प्रसिद्ध होता. वृक्षवेलींनी नटलेले सह्याद्रीचे डोंगर फणसुलीची शान होती. इथल्या फणसांचा आणि जंगली फळांचा आस्वाद घेण्यासाठी फणसुलीत अस्वलांचे वास्तव्य होते. मेरू, पिसय, भेकरे, साळिंदर, चितळ या प्राण्यांमुळे पट्टेरी वाघांसाठी फणसुलीचे जंगल आणि जलस्रोत नैसर्गिक अधिवास ठरला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com