Bits Pilani Student Death Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Opinion: ‘मी खूप थकलेय... मला माफ करा हो'! संपूर्ण भारताचाच गंभीर प्रश्‍न बनलेला विषय; विद्यार्थ्यांचे बळी

Student Stress Death Case: विद्यार्थ्यांच्या आत्महत्या हा तसा संपूर्ण भारताचाच गंभीर प्रश्‍न बनला नाही काय? आयआयटी, एनआयटीमध्ये विद्यार्थी आत्महत्येची मोठी लागण झाली आहे!

Raju Nayak

मुलीने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या पालकांना लिहून ठेवलेले पत्र हृदयद्रावक आहे. ‘मी खूप थकलेय... मला माफ करा हो. तुम्ही अत्यंत प्रेमळ माता-पिता आहात. तुमच्यासारखे पालक मिळणे म्हणजे माझे भाग्य. तुम्ही माझ्यासाठी सारे काही केले... सॉरी.’

‘बिट्स पिलानी’मधल्या या २० वर्षीय वैष्णवीची आत्महत्या करण्यापूर्वी काय घालमेल झाली असेल, याची कल्पना आपण करू शकतो.

आपल्या जाण्याने पालकांवर काय परिस्थिती ओढवेल? परंतु तिची मन:स्थितीच अशी होती, की ती विलक्षण खचली होती. तिच्या या मानसिकतेची जवळच्यांनाही कल्पना होती. परंतु ती त्यांना सांगत असे, की ‘मी आता सावरले आहे. माझ्या मनात आता आत्महत्येचे विचार येत नाहीत. मी परिस्थितीशी झुंजणार आहे...’

झुआरीनगरच्या ‘बिट्स पिलानी’ महाविद्यालयातील १३ महिन्यांतील हा सहावा बळी! मी ‘बळी’ एवढ्याचसाठी म्हटले, कारण हा व्यवस्थेने घेतलेला बळी आहे. बेजबाबदार व्यवस्था!

आजची तरुण पिढी एका विलक्षण तणावाखाली जगते आहे. परिस्थितीचा सामना करण्यास ती कमी पडते आहे, यात केवळ तिच्या पालकांचा, शिक्षण संस्थेचा दोष आहे काय? असलाच तर साऱ्या समाजाचा दोष आहे. नेत्यांचा तर आहेच!

परंतु ‘अज्ञानी’ नेत्यांनी ज्या पद्धतीने या प्रश्‍नावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या, त्या वरवरच्या होत्या. त्यातील अनेकांनी मूळ प्रश्‍न समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही. एका नेत्याने पोलिस प्रमुखांना आवाहन करून या आत्महत्यांकडे कायदा यंत्रणा व राज्य प्रशासनाने लक्ष दिले नसल्याचे म्हटले.

अनेकांनी ‘बिट्स पिलानी’ला दोष दिला, तर एका अवलियाने ‘बिट्स पिलानी’ बंद करून टाकण्याची सूचना केली आहे.

त्यापैकी एकानेही उच्च शिक्षण संस्था-विशेषत: तंत्रविज्ञान केंद्रांमध्ये आत्महत्या - विशेषत: शेवटच्या वर्षात विद्यार्थी अस्वस्थ का होतात, त्यांच्यात तणाव का वाढतो व ते असे आततायी पाऊल उचलण्यास प्रवृत्त का होतात, याचा अभ्यास केलेला नाही. गोव्यातील ‘बिट्स पिलानी’ बंद करणे हाच ‘उपाय’ असेल तर मग आत्महत्या केल्या जातात, त्या देशातील सर्वच प्रमुख तांत्रिक शैक्षणिक संस्था बंद कराव्या लागतील.

ज्यांचा सर्वसाधारण लोकांना अभिमान असतो, त्या आयआयटीसुद्धा! कारण गेल्या काही वर्षांत देशातील साऱ्याच प्रमुख शैक्षणिक संस्थांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण कमालीचे वाढलेय.

याचा डेटा ‘नेट’वर उपलब्ध आहे. आत्महत्येच्या प्रकारांत देशात गंभीर स्थिती असून २०१३ ते २०२३ या काळात त्यात ६५ टक्के वाढ झाली आहे. २०२३मध्येच १३,८९२ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या व एकूण आत्महत्यांमध्ये हे प्रमाण ८.०१ टक्के आहे. त्यात स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, एनईईटी, जेईई व आयआयटींचा समावेश आहे.

२०२३मध्ये ७,३३० मुलगे तर ६,५५९ मुलींनी आत्महत्या केल्या व १५-२० या वयोगटातील ही कोवळी मुले आहेत. २०१९ व २०२४ या काळात आयआयटी, एनआयटी व केंद्रीय विद्यापीठातील ९८ विद्यार्थ्यांनी आपले जीवन संपविले, त्यात प्रामुख्याने आयआयटीयनची मुले (३९) होती.

राजस्थानमधील कोटा येथे तर उच्च शिक्षण संस्थांच्या प्रवेशाचे कारखानेच चालतात. कोचिंग उद्योगातील दबावातून तेथे २०२३मध्ये २८ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या होत्या.

या प्रश्‍नाचा मागोवा घेताना आत्महत्यांसाठी जी सर्वसाधारण कारणे सापडली, ती अशी आहेत ः

१. अभ्यासाचा ताण तथा स्पर्धेची भीती. जेईई व वैद्यकीय प्रवेशासाठी स्पर्धात्मक दबाव प्रचंड असतो. त्यात नापास होण्याची भीती असते.

२. व्यवस्थेचे प्रश्‍न. शिक्षकांकडून सतावणूक, त्रास व मानसिक तणावाखाली असणाऱ्या विद्यार्थ्यांना साहाय्य करण्यास शैक्षणिक संस्थांचे अपयश.

३. माणुसकीशून्य वर्तणूक. समुपदेशकांचा अभाव. मानसिक कल्याणावर भर देण्याऐवजी जादा गुण मिळविण्याच्या अग्रक्रमावर भर देण्याचा प्रकार.

या प्रकरणांचा सरकार व न्यायसंस्थांनी कसा पाठपुरावा केला? २०२५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक राष्ट्रीय कृती दलाची स्थापना करून या घातक प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी सुधारणा सुचविण्यास सांगितले. न्यायालयाने देशातील साऱ्या प्रमुख शैक्षणिक संस्थांना तातडीचे उपाय योजण्याच्या सूचना केल्या.

त्यात समुपदेशक नेमणे, मानसिक आरोग्यावर भर, रॅगिंगविरोधी उपाय व एकूणच विद्यार्थ्यांच्या कल्याणाच्या योजना राबविण्याच्या सूचना होत्या. कोचिंग क्लासेस विरोधातही काही उपाय योजण्यात आले. त्यात १६ वर्षांखालील मुलांना प्रवेश न देणे, भरमसाट शुल्क आकारणी, टेलेमानस यासारख्या नेटवर्किंग व्यवस्थाही कृतीत आणण्यात आल्या.

तज्ज्ञांनी आणखीही काही उपाय सुचविले. त्यात शिक्षणक्रमात मानसिक आरोग्य हा विषय समाविष्ट करावा, मानसिक आरोग्यासंदर्भात शिक्षकांना प्रशिक्षण देणे, पालक-शिक्षक समन्वयावर भर देणे व भेदभाव न करणाऱ्या, सतावणुकीला आळा घालणाऱ्या उपायांची कास धरण्याचे निश्‍चित करण्यात आले. वर्षभरापूर्वी या सर्व सूचना अंमलात यावयाच्या होत्या. दुर्दैवाने ज्या उच्च शिक्षण संस्था आत्महत्यांसाठी प्रकाशात आल्या - ज्यात ‘बिट्स पिलानी’चाही समावेश आहे - तेथे प्रत्यक्षात काय घडले?

या संस्थांना अजून या गंभीर विषयावर उत्तरदायित्व निभावता आलेले नाही, त्यांना अद्याप शिक्षणक्रमात व्यवस्थित बदल करता आलेला नाही.

ज्या विषयाच्या अभ्यासक्रमांमध्ये खूप दबाव-तणाव असतो, तेथे बदल अपेक्षित आहेत. त्या पाठ्यक्रमांची पुनर्रचना करण्यात आलेली नाही. मानसिक आरोग्य हा विषय अधोरेखित झाला असला तरी त्यात सखोल अभ्यास कोणालाच करता आलेला नसून थेरपिस्ट किंवा समुपदेशक हे रात्रंदिवस उपलब्ध करून देणे एवढ्याने भागणार नाही. मी ‘बिट्स’च्या ज्या बुद्धिमान विद्यार्थ्यांशी बोललो, त्यांच्यात एकमत होते, की अभ्यासक्रमामुळे तर मुले कोलमडून पडत नाहीत ना, याचा सर्वार्थाने विचार केला जात नाही.

भारतातील उच्च शिक्षण संस्थांचा दर्जा जरूर आंतरराष्ट्रीय आहे. आपली मुले विद्यमान स्पर्धात्मक युगात अमेरिका किंवा युरोपात अव्वल ठरतात का; शैक्षणिक संस्थांचे तेच उद्दिष्ट आहे काय? अमेरिकेत मुले निर्यात करण्याचे त्यांचे ध्येय असावे का?

५० वर्षांपूर्वी जेव्हा अशा पद्धतीचे अभ्यासक्रम तयार केले जात, तेव्हा आव्हाने वेगळी होती. आता ही आव्हाने बदलली आहेत. त्यानुसार अनुरूप बदल व्हायला नकोत काय?

मी गेल्या महिन्यात इंजिनिअर सचिन लवंदे यांच्याशी त्यांच्या गोवा भेटीच्या वेळी बोललो होतो. लवंदे हे अमेरिकास्थित जागतिक अभियांत्रिकी संस्थेचे प्रमुख आहेत व या विषयातील जागतिक आव्हाने खूप चांगल्या प्रकारे जाणतात. भारतीय शैक्षणिक संस्थेतून उच्च पदवी मिळवून ते जेव्हा अमेरिकेत गेले, तेव्हा त्यांच्यासमोर वेगळेच आव्हान उभे राहिले. बुद्धिमान भारतीय उमेदवारांसमोर अशीच आव्हाने येत असणार.

भारतातील कितीही बुद्धिमान विद्यार्थी जेव्हा अमेरिकेतील विद्यापीठात प्रवेश घेतात, तेथे त्यांना चीनसारख्या देशातील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करावी लागते. सचिन लवंदे म्हणाले, की सुरुवातीला काही परीक्षांमध्ये चांगल्या ग्रेड, चिनी विद्यार्थ्यांच्या तुलनेत मिळू शकल्या नाहीत, तेव्हा मी चिनी विद्यार्थ्यांची मानसिकता समजून घेतली. ते स्पर्धेत टिकण्यासाठी, अव्वल ग्रेड प्राप्त करण्यासाठी सलग तीन दिवस-रात्र अभ्यास करीत. अनेक रात्री झोपत नाहीत. हा एक वेगळा ‘स्ट्रेस’ आहे!

मागे महाराष्ट्रातील ‘लातूर’ने एक वेगळा शैक्षणिक पॅटर्न आणला. म्हणजे आठवीपासूनच दहावीची तयारी करायची. नववीची परीक्षा दिल्याबरोबर सुटी न घेता दहावीचे वर्ग सुरू करायचे.

तीन महिन्यांत अभ्यासक्रम आटोपायचा. त्यानंतर पुढचे सहा महिने केवळ उजळणी व परीक्षेची तयारी! त्यामुळे लातूरला दहावीत पहिला क्रमांक मिळविणारे कारखानेच तयार झाले. मग इतरांनीही त्याचे अनुकरण केले.

ही मुले पुढे आयुष्यात का करतात? किती यशस्वी होतात, यशस्वी होणे म्हणजे काय, आयुष्यात - जीवनात या अशा शिक्षणाचा संबंध, अर्थ काय?

- शिक्षणात प्रगती म्हणजे पैसे कमावणे एवढेच आहे काय?

पैसे कमावणे म्हणजेच सुखी होणे काय?

मग पैसे कमावणारी ही सारी मंडळी वेगवेगळ्या मानसिक प्रश्‍नांनी पछाडलेली असतात. त्यांना तरुण वयात अनेक आजार जडतात. काही साधू-बुवांच्या नादी लागतात, तर काहीजण सतत इस्पितळ-डॉक्टरांच्या वाऱ्या करीत राहतात.

‘थ्री इडियटस’मध्ये विनोदी पद्धतीने या प्रश्‍नाला सामोरे जाण्याचा प्रयत्न केला आहे. ‘कोटा’सारख्या अशा कोचिंग क्लासेसमधून स्पर्धात्मक परीक्षांना सामोरे जाणारे विद्यार्थी, उमेदवार हे खरोखरच बुद्धिमान असतात, तेथे ते आणखी उच्च अभिरुचीपूर्ण, कल्पक, प्रज्ञावान बनून बाहेर पडतात काय?

आमीर खान या ‘प्रशिक्षित’ मुलांना उद्देशून एक छान शब्द उच्चारतात. - ‘वेल ट्रेन्ड!’ असे शिकून तुम्ही पहिले आलात तरी काय फायदा? तुमची बुद्धिमत्ता वाढली? नाही! केवळ प्रेशर वाढले! अरे चाबूक दाखवला तर सर्कशीतला सिंहही उडी मारून खुर्चीवर जाऊन बसतो! अशा सिंहाला आम्ही ‘वेल ट्रेन्ड’ म्हणतो, उच्च शिक्षित नाही!

दुर्दैवाने आपल्या उच्च शैक्षणिक संस्थाही याच प्रकारची ‘प्रशिक्षण’ देणारी केंद्रे बनली आहेत, तेथे देशाचे प्रश्‍न सुटत नाहीत. तेथून योग्य प्रशिक्षित उमेदवार बनवून आपली मुले विदेशात निर्यात करतो- तीसुद्धा आता चीनी विद्यार्थ्यांपुढे टिकाव धरू शकत नाहीत!

येथेच महत्त्वाचा मुद्दा उदभवतो...

बहुतांश मुले इंजिनिअर का बनू पाहतात? कारण त्यांना वाटते, आई-वडिलांची गरिबी आपण दूर करणार. पालकही भरपूर राबून, कर्जबाजारी होऊन मुलांना अशा महाविद्यालयांमध्ये पाठवतात. ‘थ्री इडियटस’मध्ये जसे ‘राजू’ व ‘फरहान’ दाखवले आहेत- ज्यात राजूचे वडील अंथरुणाला खिळले आहेत,

बहीण लग्नाची आहे व आई संसाराचा गाडा कसाबसा रेटते आहे. फरहानचे वडील स्वत: गाडी घेत नाहीत. एसी मुलाच्या खोलीत बसवितात... मुलाने इंजिनिअर बनून आपली गरिबी दूर केलेली त्यांच्या पालकांना हवी आहे. ते मोठ्या अपेक्षेने त्यांच्या शिक्षणाकडे पहात आहेत.

त्यानंतरच्या २० वर्षांत भारतीय समाज खूप बदललाय, मान्य आहे; परंतु त्याची मध्यमवर्गीय स्वप्ने मात्र तशीच आहेत. ती पुरी करण्यासाठी मुलांना इंजिनिअर बनविले जाताहेत, म्हणजे ते अमेरिकेत जाऊ शकतील... आणि जी मुले अमेरिकेत गेली ती विविध कारणांमुळे आई-वडिलांच्या अंत्यविधीलाही उपस्थित राहू शकत नाहीत. पालक एकाकी जीवन कंठून मरून जातात... परवा मध्य प्रदेशात एका वृद्धाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला...

परंतु अडथळ्यांची क्रूर स्पर्धा वाढतेच आहे. एका बाजूला अमेरिकेने व्हिसा अटी कडक केल्या आहेत व भारतीय अर्थव्यवस्था हवा तसा वेग निर्माण करू शकलेली नाही.

एक काळ असा होता, की आयआयटी व इतर प्रगत शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणाऱ्या मुलांना तिसऱ्या वर्षातच नोकऱ्या चालून येत. सध्या कमकुवत अर्थव्यवस्था असो की औद्योगिक मंदीच्या कारणामुळे असो, हव्या तशा नोकऱ्या उपलब्ध होत नाहीत...

त्यामुळे स्पर्धा वाढली आहे. इंजिनिअर मुले बेकारांची फौज वाढवू लागली आहेत... अनेक इंजिनीयर ‘स्विगी’ची मुले म्हणून काम करतात...

आत्महत्यांसाठी शिक्षणक्रम कारण असल्याची चर्चा आपण इतकी वर्षे करीत राहिलो; परंतु आता त्या भयंकर ‘साथी’चे वास्तवपूर्ण अतिगंभीर कारण पुढे येतेय ते आहे आपल्या अर्थकारणाचे! हे सारे अर्थव्यवस्थेचे ‘बळी’ आहेत. स्पर्धा करायची, जीवघेण्या शर्यतीत जुंपून घ्यायचे, अंगतोड मेहनत घ्यायची, कर्ज, कोचिंग क्लास यात पाल्यास घालायचे, परंतु शेवटी हातात काही नाही!

अर्थकारण बेरोजगारांना नवे पंख देऊ शकलेले नाही. अभियांत्रिकी मुलांचे भविष्य अंध:कारमय बनले आहे. गरिबी दूर करण्यास हे शिक्षण कुचकामी ठरतेय. हे तरुणांच्या, विद्यार्थ्यांच्या अस्वस्थपणाचे मोठे कारण बनले आहे.

अर्थव्यवस्थेमुळे तरुणांचे मानसिक आरोग्य बिघडतेय! आपली पुढची पिढी त्याचा गंभीर परिणाम भोगतेय. परंतु आपली अर्थनीती, उद्योग धोरण, आपले सरकारी अर्थसंकल्प अजून त्या दिशेने विचार करू लागलेत काय? अनेक देशांमध्ये तरुण अस्वस्थ आहेत. जेंझी रुद्रावतार धारण करतोय. नेपाळमध्ये त्याची झलक पाहायला मिळालीय...त्यांनी सरकारच पाडलेय...आणि आपण?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Coconut Price: नारळासह करवंटीलाही आला भाव! इंधन-प्लायवूड निर्मितीसाठी वापर; 100 रुपयांना एक टोपली दराने विक्री

Kala Academy: कला अकादमीत पाण्याची वानवा! टँकर मागवूनही उशिरापर्यंत आलाच नाही

Tragic Death: मातीखाली गाडली गेली स्वप्नं! खोर्लीत दुर्दैवी घटना; भिंत कोसळून बंगालच्या कामगाराचा मृत्यू

Goa Crime: कोयता-दांडक्याने मारहाण करून दिली जीवे मारण्याची धमकी, जखमी अवस्थेत केली तक्रार; पुराव्याअभावी दाम्पत्य निर्दोष

Dudhsagar Temple Theft: प्रसिद्ध दूधसागर देवालयात चोरी! मंदिराची दानपेटी फोडली; चोरटे पसार

SCROLL FOR NEXT