Shravana rituals Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Shravan In Goa: आदित्यपूजन, नागपंचमी, गोडशें परब; श्रावणाच्या दिव्यत्वाचा प्रत्यय नक्की येतो..

Shravana month celebrations in Goa: चांद्र कालगणनेतील श्रावण हा ‘पाचवा महिना’ असून यावेळी रंगांचे सुंदर दर्शन घडत असते. आषाढात शिगेला पोहोचलेली पर्जन्यवृष्टी श्रावणात काही अंशी कमी होते.

राजेंद्र केरकर

चांद्र कालगणनेतील श्रावण हा ‘पाचवा महिना’ असून यावेळी रंगांचे सुंदर दर्शन घडत असते. आषाढात शिगेला पोहोचलेली पर्जन्यवृष्टी श्रावणात काही अंशी कमी होते. मध्येच पावसाच्या रेशीमधारा, मध्येच सूर्याची डोकावणारी किरणं यामुळे खरे तर ऊनपावसाचा खेळ सुरू झालेला असतो.

क्षितिजावर सप्तरंगी इंद्रधनूची लोभस कमान आपले लक्ष वेधून घेत असते. माळराने रानफुलांनी भरून गेलेली असतात. टाकळू, कुरडू, यांसारख्या रानभाज्यांची चव लोकमानसाच्या ओठी तरळत असते आणि अशा पार्श्वभूमीवर जेव्हा श्रावणाचे आगमन होते, तेव्हा तनामनात उत्साह संचारतो.

मानवी जीवन जेव्हा आदिम काळात वावरत होते, तेव्हा त्यांचे जगणे बहुतांशी निसर्ग आणि पर्यावरणावर अवलंबून होते आणि त्यामुळे विजेच्या लखलखाटाने, झाडांच्या फांद्यांना गदागदा हालवणाऱ्या वादळी वाऱ्याने, दिवस रात्रीच्या चक्राने, अशा नैसर्गिक शक्तींना नियंत्रित करणारी आकाशापल्याड असीम शक्ती असल्याचा साक्षात्कार त्याला झाला आणि कालांतराने त्यातून लोकधर्माचा उगम झाला.

लोकधर्मातून निसर्गातल्या विविध घटकांना देवत्व देण्याची संकल्पना उदयास आली. संस्कृतीच्या उन्नयनाबरोबर मानवी मनात लोकधर्माच्या अनुषंगाने विविध रीतीरिवाज, सण-उत्सव जन्माला आले.

गोवा-कोकणातल्या लोकमानसाने निसर्गातला आनंद आपल्या जगण्याचा भाग ठरवून मौसमानुसार विविध सण उत्सवांची मांडणी केली. श्रावणातल्या बहुतांश सण उत्सवातून शेकडो वर्षांपासून निसर्गातल्या वेगवेगळ्या तत्त्वांशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्याचा प्रत्यय या महिन्यात येणाऱ्या सण-उत्सवांतून आल्याशिवाय राहत नाही.

श्रावणातली सोमवारची शिवामूठ, मंगळागौर, गुरुवारचे दत्तात्रय पूजन, शुक्रवारचे लक्ष्मीपूजन, शनिवारचे हनुमान पूजन आणि रविवारचे आदित्यपूजन, अशी व्रतवैकल्ये व्यक्तिगत आणि काही सामूहिक पातळीवर साजरी केली जातात.

यावेळी निसर्गातल्या मौसमी फुलाफळांना पूजनाच्या वेळी प्राधान्य दिले जाते. मंगळवारी ब्राह्मण स्त्रिया विविध प्रकारची मौसमी रानटी फुलं, तृणपाती, पानं गौरी पूजनात वापरतात. मंगळागौरीच्या पूजनातल्या फुगड्यांचा जोश, उत्साहातून स्त्रिया आपल्यातल्या नृत्य, नाट्यगायन आदी कला कौशल्यांचे उत्स्फूर्तपणे सादरीकरण करतात.

मंगळागौर ही देवी पार्वती असून तिच्या पूजनाद्वारे भाविकांनी पृथ्वीतत्त्वाला आदरभाव व्यक्त केलेला आहे. नवविवाहिता आपल्या सासरी व माहेरी मंगळागौरीचा उत्सव साजरा करताना गौरी पूजनासाठी जी पत्री गोळा करते, त्यात रानातल्या पानांना-फुलांना स्थान प्रदान करण्यात आले आहे.

माडाच्या चुडतांपासून दोन घरे करून, एकात गणेश तर दुसऱ्यात गौरीची मूर्ती ठेवतात. देवीची पूजा करण्यासाठी प्राजक्त, करंडा, चटकचांदणी, केवडा, तगर, विष्णूकांत, वेल, कृष्णकमळ आदी सोळा प्रकारच्या वनस्पतींची प्रत्येकी पाच नगांची पत्री वापरतात.

हिरव्या बांगड्या, वस्त्रांचा जोड, तांदळाच्या पिठाचे हार, नथ, मंगळसूत्रासारखे दागिने, नैवेद्यासाठी मोदक असे साहित्य वापरले जाते. फुगड्या, उखाण्याबरोबर भजन-पूजनाने अख्खी रात्र जागवली जाते. गौरीसाठी जी सजावट केली, जाते त्यात कर्दळीचे खुंट चौरंगाला बांधून ते लतापल्लवांनी सुशोभित केले जाते. ब्राह्मण स्त्रिया रात्र जागवून मंगळागौरीचे व्रत साजरे करतात.

रविवारी आदित्यपूजन केले जाते. त्यात ब्राह्मण पुरुष आपणाला सूर्यासारखे तेजस्वी आयुष्य लाभावे म्हणून सूर्यपूजन करतात, तर बहुजन समाजातल्या स्त्रिया आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे म्हणून पहिल्या रविवारी पानवेल, दुसऱ्या रविवारी हळदीचे पान, तिसऱ्या रविवारी कोनवेलीच्या पानाचे तर चौथ्या रविवारी शेरवडाच्या पानाच्या द्रोणावर विविध पत्री अर्पण करून पूजन करतात.

प्रत्येक रविवारी अनुक्रमे पातोळ्या, मुटली, सान्ना आणि पोळेसारखे अन्न पदार्थ तयार करून स्त्रिया उपवासात आस्वाद घेतात. शनिवारी रुईची फुले अर्पण करून हनुमान पूजन तर गुरुवारी औदुंबर वृक्षाच्या ठिकाणी असणाऱ्या दत्तात्रयाचे पूजन केले

जाते. या व्रतवैकल्यांबरोबर श्रावणात काही ठिकाणी जत्रोत्सव साजरा केला जातो. गोकुळाष्टमीचा उत्सव जरी इथे श्रीकृष्ण आणि गोप-गवळणींच्या पूजनाने साजरा केला जात असला तरी डिचोलीतल्या नार्व्यात अष्टमीची जत्रा भरते.

पंचगंगेच्या तीरावर मृतात्म्यांना तर्पण करण्यासाठी त्यांचे नातेवाईक जत्रेवेळी जमतात. अष्टमीपूर्वी येणाऱ्या मंगळवारी नार्व्यात मसणदेवीची जत्रा साजरी केली जाते. मृण्मय वारुळाच्या रूपातली मसणदेवी आणि तिच्यासमोर असलेला वाघदेव, दारात असलेल्या काजऱ्याच्या वृक्षाचे पूजन यावेळी केले जाते.

अष्टमीची जत्रा झाल्यावर पंचगंगेच्या तीरावर रात्रीच्या वेळी ‘भुतांची जत्रा’ साजरी होते असा समज असल्याने सूर्यास्त झाला की भाविक, व्यापारी तेथून लवकरात लवकर काढता पाय घेतात! श्रावणी पौर्णिमा हा पर्वदिन असल्याने त्यादिवशी बहुजन समाज यज्ञोपवीत धारण करतो. देवाला पवित्र धागा अर्पण करून झाल्यावर कष्टकरी आपण यज्ञोपवीत धारण करतो.

काही ठिकाणी यादिवशी देवराईत जाऊन भाविक देवतांना नैवेद्य दाखवतात. पूर्वी श्रावणी पौर्णिमेपासून समुद्र शांत व्हायचा. वादळी वारे थांबायचे आणि म्हणून मच्छीमार समाज वरुण पूजन करून सागराला नारळ अर्पण करतात, आणि मासेमारीला प्रारंभ करतात.

श्रावणातल्या पहिल्या आठवड्यात पाचव्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते. नागाची मातीची प्रतिमा त्यादिवशी पुजली जाते. आपल्या परिसरात प्रामुख्याने घोणस, फुरसे, मण्यार या सापांच्या जहरीपणाविषयी बरेच गैरसमज आहेत. त्यात नाग हा साप त्याच्या रूपरंगामुळे शेकडो वर्षांपासून मानवी समाजाला आकर्षित करत आलेला आहे.

तांबडीसुर्लाच्या महादेव मंदिरात तर सत्तरी आणि अन्य ठिकाणी असलेल्या ब्राह्मणी मातेच्या दुतर्फा नाग प्रतिमा कोरलेल्या आहेत. नाग हा पुरुषत्वाचे प्रतीक मानला गेलेला आहे. गोव्यात मातीच्या आणि काही कुटुंबात पिठाच्या नागाच्या प्रतिमांची पूजा केली जाते.

फोंड्यातल्या फर्मागुडी येथे जो ‘कटमगाळ दादा’ आहे, तेथे तिसऱ्या रविवारी ‘गोडशें परब’ साजरी केली जाते. ‘कटमगाळ दादा’ ही अदृश्य रूपात वावरणारी निसर्गातली शक्ती असून त्यादिवशी भाविक नवस करण्यासाठी आणि गोडधोड पदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी आवर्जून जमतात. सांगे, केप्यातल्या काही कुटुंबांत नागपंचमीला मंदिरात सामूहिकरीत्या नागाच्या प्रतिमेचे पूजन केले जाते.

श्रावणात निसर्गातल्या आनंदोत्सवात सहभागी होण्यासाठी आणि पर्यावरणातल्या नानाविध घटकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी सण-उत्सवांची पर्वणी निर्माण केली. आणि निसर्गाच्या सहवासात त्यांच्याशी समरस होण्याची संधी प्रदान केली. श्रावणाच्या या रूपगंधाशी एकात्म झालो तर त्याच्या दिव्यत्वाचा प्रत्यय आपणाला नक्की येतो!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Trafficking: गोवा पोलिसांची धडक कारवाई! स्विगी डिलिव्हरी एजंटला ड्रग्ज तस्करी प्रकरणी अटक; 'इतक्या' हजारांचा गांजा जप्त

AUS vs SA: इतिहास घडला...! ऑस्ट्रेलियाच्या 22 वर्षीय पठ्ठ्यानं दक्षिण आफ्रिकेची तगडी फलंदाजी केली ध्वस्त; मोडला 38 वर्ष जुना रेकॉर्ड

Viral Video: 'मत रो मेरे दिल...'! दारुच्या नशेत पकडल्यावर पठ्ठ्याला बायकोची आठवण, गाण्याला पोलिसानंही दिली साथ; व्हिडिओ एकदा बघाच

AUS vs SA: दक्षिण आफ्रिकेचा लाजिरवाणा पराभव! ऑस्ट्रेलियाने मोडला भारताचा कीर्तिमान; हेड, मार्श अन् कॅमेरुनची वादळी शतके

Congress MLA Arrested: 12 कोटी कॅश, 6 कोटींचं सोनं... मनी लाँड्रिंग प्रकरणी काँग्रेस आमदाराला अटक, ईडीची कारवाई

SCROLL FOR NEXT