Chhatrapati Shivaji Maharaj Goa History
छत्रपती शिवाजी महाराजासंदर्भात इतिहासकार यदुनाथ सरकार यांनी ‘शिवाजी हे केवळ मराठा राज्य निर्माता नव्हते तर मध्ययुगीन भारतीय इतिहासातील एक श्रेष्ठ रचनात्मक कार्य करणारे अत्यंत बुद्धिमान मनुष्य होते’ असे नमूद करून ठेवलेले आहे.
राज्ये नष्ट होतात, साम्राज्यांचे विघटन होते. राजघराणी लुप्त होतात, परंतु कालातील ऐतिहासिक वारसा म्हणून ‘लोकनेता राजा’ या नात्याने शिवाजी महाराजांचे स्मरण अखिल मानव जातीला दीर्घकाल सचेतन करणारे, कल्पना शक्तीला चेतवणारे, बुद्धीला स्फुरण देणारे आणि अतिउच्च पराक्रम करण्यास उपयुक्त करणारे असे राहील असे त्यांनी नोंद केलेले आहे.
आपल्या हिंदवी स्वराज्यातील शेतकरी, कष्टकरी अशा समस्त जनतेच्या कल्याणासाठी त्यांनी विविध योजना राबवल्या होत्या. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपल्या राज्याची निर्मिती करून ते राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर आणि बळकट कसे होईल यावर लक्ष देऊन प्रशासन आणि आर्थिक विकासाविषयीची धोरणे राबवली होती.
त्यामुळे, त्यांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य, त्यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर आणि छत्रपती संभाजीच्या वधानंतर प्रदीर्घ काळ टिकले आणि विस्तारले. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मात्र मुगल साम्राज्याला उतरती कळा लागली आणि त्यांच्या बादशहावरती अंकुश ठेवण्यापर्यंत मराठ्यांनी भरारी घेतली होती.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रदेशात पोर्तुगिजांच्या सत्तेखाली असणाऱ्या बार्देशात पळून आलेले पेडणे, डिचोली आणि कोकणातील देसाई मंडळी उपद्रव करत असल्याकारणाने त्यांना आश्रय देणाऱ्या पोर्तुगिजांना अद्दल घडवण्यासाठी महाराजांनी बार्देशवर स्वारी केली.
तीन दिवस अक्षरशः मराठ्यांनी बार्देश प्रांतात लुटालूट जाळपोळ करून पोर्तुगिजांची पाचावर धारण बसवली आणि त्यामुळे पोर्तुगिजांनी महाराजांशी तह केला. लखम सावंत व केशव नाईक यांना पोर्तुगिजांनी आपल्या राज्यातून बाहेर घालवले. १६६६साली मार्च महिन्यात महाराजांनी आदिलशाहीच्या ताब्यात असणाऱ्या फोंड्याच्या किल्ल्याला वेढा दिला.
हा किल्ला मराठ्यांचा ताब्यात आल्यास आपणास उपद्रव होण्याची शक्यता असल्याने पोर्तुगिजांनी गुप्तरीत्या मदत पुरवल्याने विजापूरचा सरदार रूस्तुमेजमा साह्यास येईपर्यंत लढला. त्यामुळे १६ एप्रिल १६७५ रोजी महाराजांनी फोंड्याच्या किल्ल्यास पुन्हा वेढा घातला.
तो पोर्तुगिजांकडून तटस्थ राहण्याचे कबूल करूनच. एकाच वेळी मोंगल आणि पोर्तुगीज यांच्याशी दोन हात करणे कठीण होईल म्हणून त्यांनी पोर्तुगिजांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याला प्राधान्य दिले होते. परंतु असे असताना पोर्तुगिजांचे समुद्रावरती एकंदर जे वर्चस्व विस्तारत चालले होते. त्यांची त्यांना जाणीव होती.
त्यासाठी महाराजांनी मराठा नौदलाची मुहूर्तमेढ रोवली ती १६५९साली २० शस्त्रसज्ज जहाजे आणि किल्ल्यांच्या मदतीने. रॉथ लैताव वियेगस आणि त्यांचा भाऊ फेर्नाव लैताव वियेगस यांचे नौदल उभारणीस साहाय्य घेतले. महाराज नौदल विकसित करत असल्याचा भय, पोर्तुगीज विसरई आंतोनियो द मेलो द कास्त्रू यांनी घेतला आणि त्यामुळे महाराजांच्या सेवेत असणाऱ्या पोर्तुगीज नागरिकांना पोर्तुगालला परतण्याचा आदेश काढला होता.
जुन्या काबिजादीतल्या तिसवाडी, बार्देश आणि सासष्टीतल्या जनतेची, तेथील पोर्तुगीज धर्माधिकाऱ्यांकडून होणाऱ्या छळवणुकीची जाणीव महाराजांना होती. पोर्तुगीज विसरईने २१ सप्टेंबर १६६७ रोजी बार्देश महालातील समस्त हिंदूंनी दोन महिन्यांच्या आत त्याग करण्याची अधिसूचना काढली होती. त्याच काळात शिवाजी महाराजांच्या सैन्याने बार्देशवर उपद्रव करणाऱ्या देसाई मंडळीवर कारवाई करण्याच्या हेतूने हल्ला केला.
कोलवाळ चर्चचा रेक्टर फादर मॅन्युल द सान बनदिन आणि त्याच्याकडे पाहुणा म्हणून आलेल्या फादर जुआंव दास नोविस यांना ठार करून खरे तर फ्रान्सिस्कन धर्माधिकाऱ्यांना जी अद्दल घडवली, त्यामागे अन्याय, अत्याचार करणाऱ्यांत भय निर्माण करण्याचा हेतू होता.
पोर्तुगिजांनी गोव्यात सोळाव्या शतकात जी ख्रिस्तीकरणासाठी छळवणूक आरंभली होती त्यामुळे येथील सर्वसामान्य हिंदू जनतेला शेजारच्या राज्यांत आश्रय घेण्याची पाळी आली होती. छत्रपतींच्या राज्याची सीमा सर्व बाजूंनी आपल्या प्रदेशाला भिडलेली असल्याकारणानेच पोर्तुगीज सरकारने हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त करण्याचे सत्र आरंभले होते, ते शिथिल केले व त्याला मराठा सैन्यांचा दरारा कारणीभूत ठरला होता.
१६६८साली महाराज डिचोलीतील नार्वे येथील ऐतिहासिक सप्तकोटेश्वर देवाच्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यास गेले असता, त्यांच्या मनात मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची इच्छा झाली आणि त्या मंदिराला नवा साज देऊन इथल्या समस्त हिंदू समाजाला चेतना देण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी त्यांनी केली.
पेडणे, डिचोली, सत्तरी, केपे, सांगे, काणकोण येथे आज हिंदू धर्म आणि संस्कृतीच्या असंख्य संचितांना जो आश्रय लाभला आणि त्यांची भरभराट झालेली पाहायला मिळते त्याला छत्रपती शिवाजी महाराजाची सत्ता कारण ठरली होती. सासष्टी महालापासून जवळ असणाऱ्या केपे तालुक्यातल्या बेतूल गावात साळ नदीच्या मुखावरती त्यांनी बाळ्ळीच्या हवालदाराला १६७९ साली किल्ल्याचे बांधकाम करण्याचा दिलेला आदेश पोर्तुगीज सत्तेच्या विस्ताराला खीळ घालण्यासाठीच दिला होता.
शिवशाहीच्या छत्राखाली जे नव्या काबिजादीतले गोव्यातले सर्वाधिक क्षेत्र बराच काळ राहिले, तेथेच आज भारतीय संस्कृती आणि धर्माचा नंदादीप अखंडपणे तेवत राहिला. जुन्या काबिजादीतली जी मंदिरे जमीनदोस्त करण्यात आली तिथल्या देवदेवतांना पेडणे, केपे, डिचोली, फोंडा येथे आश्रय लाभला.
आज धर्म आणि संस्कृतीशी अनुबंध अतूट राखणारी आणि गोव्याशी असलेले जुने नाते समृद्ध करणारे मूळचे जे गोमंतकीय केरळ, कर्नाटक, महाराष्ट्रात स्थलांतरित झाले त्यांनी नव्या काबिजादीत उभ्या राहिलेल्या आपल्या आराध्यदैवतांच्या विधी, परंपरा, उत्सवांत सहभाग कायम ठेवलेला आहे.
आपण गोवेकर असल्याचा अभिमान आणि या भूमीशी असलेले ऋणानुबंध शिवशाहीखाली असलेल्या प्रदेशांतल्या धार्मिक आणि सांस्कृतिक संचितामुळे अबाधित ठेवणे शक्य झाले. पोर्तुगीज सरकार आणि त्यांच्यासोबत प्रवेश केलेल्या ख्रिस्ती धर्मगुरूंनी इथल्या मराठी-कोकणी भाषांची गळचेपी करण्याबरोबर भूमिपुत्रांचे खाद्यान्न, वेषभूषा नृत्य, गाणी पूर्णपणे बदलून त्यांना युरोपियन म्हणण्यापेक्षा पोर्तुगालधार्जिणे करण्याचा चंग बांधला होता, तो शिवरायांनी जी ऊर्जा, दिशा आणि गती दिली त्यामुळे यशस्वी झाला नाही आणि त्यामुळेच गोवा भारतभूमीशी असलेले नाते कायम ठेवू शकला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.