Shivaji Maharaj Lessons: 'छावा' पाहून जबाबदारी संपत नाही तर तिथून सुरु होते..

Goa Opinion: शिवाजी महाराजांच्या आदर्शाचे तंतोतंत पालन करणारा एखादा तरी राज्यकर्ता निर्माण झाला तर तो खऱ्या अर्थी ‘शिवजयंती दिन’ ठरू शकेल हेच खरे.
Shivaji Maharaj Thoughts
Shivaji Maharaj LessonsDainik Gomantak
Published on
Updated on

मिलिंद म्हाडगुत

दि. १९ फेब्रुवारी हा शिवजयंती दिन. महाराष्ट्रात तर हा दिवस ’राष्ट्रीय दिन’ असावा तसा पाळला जातो. १६३० हे महाराजांचे जन्मवर्ष. म्हणजे महाराजांचा जन्म होऊन आता जवळजवळ पाचशे वर्ष होत आहेत. असे असूनसुद्धा महाराज आज अनेकांच्या नसानसांत भिनलेले दिसत आहेत.

सध्या संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ हा चित्रपट देशभर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. १४ फेब्रुवारीला रिलीज झालेल्या या चित्रपटाने फक्त चार दिवसांत १४२ कोटींचा गल्ला जमवला आहे.

पुण्यातल्या सिटी प्राईड या चित्रपटगृहात तर ‘छावा’ चित्रपटाचे नॉन स्टॉप शो सुरू आहेत. मध्यरात्री एक वाजता आणि पहाटे साडेपाच वाजता या चित्रपटाचे खास शो ठेवण्यात येत आहेत. हा चित्रपट पाहून भावनाप्रधान झालेल्यांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

चित्रपट सुरू असताना व संपल्यावर ‘शिवाजी महाराज की जय’, ‘संभाजी महाराज की जय’, अशा घोषणांनी चित्रपटगृहे दणाणून जात आहेत. हा चित्रपट संभाजी महाराजांचा असला तरी त्याला शिवाजी महाराजांच्या शौर्याची किनार आहे. शिवाजी महाराज सिंह, म्हणून संभाजी महाराज छावा असे त्याचे वर्गीकरण करण्यात आले आहे. या चित्रपटाने एक प्रकारचा ‘जुनून’ निर्माण केला आहे यात शंकाच नाही.

तसे पाहायला गेल्यास शिवाजी महाराज हे अनेकांच्या ‘मर्मबंधातील ठेव’. देशात अनेक युगपुरुष होऊन गेले. पण महाराजांनी जी आपली छाप सोडली आहे तिला तोडच नाही. मूठभर मावळ्यांना घेऊन दिल्लीपती औरंगजेबाशी सामना करणारे महाराज अनेकांचे आदर्श आहेत. त्यांची शौर्यगाथा आजही अनेकांनालुभावत आहे. ‘गनिमी कावा’ हा प्रकार महाराजांनीच अस्तित्वात आणला. या गनिमी काव्याच्या आधारे ते अफझल खान, शाहिस्तेखानासारख्या कपटी मोगलांशी भिडू शकले. आपली ‘आग्र्याहून सुटका’ करू शकले.

महाराजांना फक्त पन्नास वर्षांचेच आयुष्य लाभले. पण या पन्नास वर्षांत त्यांनी जे अतुलनीय कार्य केले त्याचा इतिहास बनला आणि या इतिहासाचे प्रत्येक पान युवा पिढीकरता एक वस्तुपाठ ठरत आहे. त्याचेच पडसाद ‘छावा’ चित्रपट बघायला येणाऱ्यांच्या डोळ्यात उमटताना दिसत आहेत.

संभाजी महाराजांची औरंगजेबाने केलेली हत्या पाहून अनेकांच्या डोळ्यातून अश्रूंचे पूर वाहताना दिसत आहेत. हा चित्रपट हिंदीत असल्यामुळे त्याला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. या चित्रपटातील कलाकारांचा अभिनय, चित्रपटाचे दिग्दर्शन अप्रतिम असले तरी चित्रपटाचे यश दडले आहे ते संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेत. या गाथेत शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचे प्रतिबिंब ठायी ठायी उमटताना दिसत आहे. ‘हे स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा’ या शिवाजी महाराजांनी दिलेल्या मंत्राचे दर्शन चित्रपटाच्या प्रत्येक फ्रेममध्ये होताना दिसत आहे. मात्र सामान्य माणसांच्या तनामनांत भिनलेले शिवाजी महाराज आज प्रत्यक्षात मात्र बघायला मिळत नाहीत.

Shivaji Maharaj Thoughts
Shiv Jayanti Goa: 'शिवरायांमुळे गोव्यातील धर्मांतरणाला चाप बसला, पोर्तुगीजांचा 450 वर्षांचा शिकवला जाणारा इतिहास चुकीचा'; CM Sawant

शिवजयंती साजरे करणारे राज्यकर्ते शिवाजी महाराजांनी ‘सेट’ केलेल्या आदर्शापासून कोसो दूर असल्याचे बघायला मिळत आहे. वास्तविक ‘शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप, भूमंडळी..’ हे समर्थ रामदासस्वामींनी शिवाजी महाराजांप्रति म्हटलेले बोधवाक्य आजच्या राजकारण्यांनी खरे तर अधोरेखित करायला हवे होते.

पण फक्त शिवजयंती साजरी केली की कर्तव्य संपले अशा भावनेने आजचे राज्यकर्ते वावरताना दिसत आहेत. शिवाजी महाराज हा एका दिवसाचा विषय नव्हे. तो न संपणारा विषय आहे. राज्य संपादन करणेच नव्हे तर राज्य कसे ‘सुजलाम् सुफलाम्’ चालवता येते हेसुद्धा महाराजांनी दाखवले आहे. त्यामुळेच ‘छावा’ या त्यांच्यावर नसेल पण त्यांची पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटाला अलोट गर्दी होत आहे.

Shivaji Maharaj Thoughts
Shivjayanti 2025: शिवरायांचे उदाहरण देत शंभुराजांना उपदेश करणाऱ्या समर्थांच्या 'त्या' पत्राचा अर्थ काय?

आज अनेक राज्यकर्ते हा चित्रपट मुलांना मोफत दाखवीत आहेत. पण मुलांनी शिवाजी महाराज वा संभाजी महाराज होण्याची इच्छा ठेवणाऱ्यांनी प्रथम स्वतः शिवाजी महाराज वा संभाजी महाराज होण्याचे बघितले पाहिजे. त्याकरता महाराजांच्या इतिहासाचा सखोल अभ्यास केला पाहिजे. महाराजांच्या प्रतिमेला हार घातला म्हणून कार्य संपत नाही. खरे तर तिथूनच कार्य सुरू होते. ‘छावा’ चित्रपटाने आपल्याला योग्य दिशा दाखवली आहे आणि या चित्रपटाचा संदेश घेऊन खरेच शिवाजी महाराजांच्या आदर्शाचे तंतोतंत पालन करणारा एखादा तरी राज्यकर्ता निर्माण झाला तर तो खऱ्या अर्थी ‘शिवजयंती दिन’ ठरू शकेल हेच खरे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com