Goa Politics Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Goa Politics: शिंदेसेना गोव्यात तग धरू शकेल?

Shiv Sena Goa: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सेना सध्या भाजपबरोबर सरकारमध्ये आहे. पण गोव्यात त्यांची भाजपशी युती नाही, असे त्यांचे नेते कीर्तीकर हे सांगताहेत.

दैनिक गोमन्तक डिजिटल

मिलिंद म्हाडगुत

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सेना सध्या भाजपबरोबर सरकारमध्ये आहे. पण गोव्यात त्यांची भाजपशी युती नाही, असे त्यांचे नेते कीर्तीकर हे सांगताहेत. पण शिंदेची शिवसेना ही महाराष्ट्र बरोबर केंद्रातही भाजप प्रणित ‘एनडीए’चा घटक असल्यामुळे कीर्तीकरांची ही ‘घोषणा’ प्रत्यक्षात उतरेल, की नाही हे सांगता येणे कठीण आहे.

सध्या शिवसेनेने (शिंदे गट) गोव्यात आपली मोहीम सुरू केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या शिवसेनेच्या वर्धापनदिनी सेनेचे नेते गजानन कीर्तीकर यांनी आगामी निवडणुकीत गोव्यात ३० जागा लढविणार असल्याची घोषणाही केली आहे. तशी गोव्याला शिवसेना नवी नाही. १९८७ साली पाडव्याच्या मुहूर्तावर शिवसेनेने गोव्यात प्रवेश केला होता.

त्यावेळी शिवसेना एकसंध होती. वामनराव महाडिक यांच्यासारख्या मुरब्बी नेत्याच्या हाती गोवा शिवसेनेची धुरा सोपविण्यात आली होती. सावंतवाडीचे सेना नेते वसंतराव केसरकर हेही गोव्यात जातीने लक्ष घालत असत. गोव्याच्या नेतृत्वाची जबाबदारी संजय हरमलकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली होती.

पणजीचे नकुल नाईक, कवी-पत्रकार कै.नरेंद्र बोडके, कवी कै.ॲड. प्रकाश नाईक, म्हापशाचे रमेश नाईक, सांगोल्डाचे तत्कालीन सरपंच दिलीप कळंगुटकर यासारख्या तडफदार नेत्यांची साथ मिळाल्यामुळे सेनेने गोव्यात पाय रोवायला सुरुवात केली. आता सेनेचे राज्यप्रमुख झालेले उपेंद्र गावकर हे त्यावेळी उत्तर जिल्हा प्रमुख होते. नंतर ते राज्यप्रमुखही बनले. मराठी भाषा गोव्याची राजभाषा करण्याबाबत ‘मगो’ने घेतलेल्या बोटचेप्या धोरणामुळे खवळलेले युवक सेनेच्या झेंड्याखाली एकत्र यायला सुरुवात झाली होती.

मी त्यावेळी सेनेचा फोंडा तालुका प्रमुख होतो. कवळेचे कै. मगन कवळेकर, दुर्भाटचे कै. दामू नाईक, प्रियोळचे घनश्याम नाईक, फोंड्याचे मुल्ला झहीरुद्दीन सारखे जीव ओतून काम करणारे साथीदार मिळाल्यामुळे सेनेने फोंड्यात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यास सुरुवात केली. त्यावेळी एका प्रियोळ मतदारसंघातच सेनेच्या अठरा शाखा होत्या. मडकईत १५, शिरोड्यात सात तर फोंड्यात पाच अशा त्यावेळी एका फोंडा तालुक्यातच सेनेच्या ४५ हून अधिक शाखा होत्या.

त्यामुळे गावा गावात सेनेचे फलक दिसायचे कधी शाखेचा वर्धापन दिन, कधी महिला शाखेचे उद्‍घाटन, कधी एखाद्या सामाजिक उपक्रमाची मुहूर्तमेढ असे कार्यक्रम त्यावेळी फोंडा तालुक्यात वर्षभर सुरू असायचे. त्यावेळी आमचे शनिवार-रविवार हे फोंड्यातच बुक असायचे असे आताचे राज्यप्रमुख उपेंद्र गावकर भेटले की, आजही बोलतात. त्यावेळी आम्ही प्रियोळ व शिरोडा मतदारसंघात बस थांबे ही बांधले होते.

गोव्याच्या इतर भागातही खास करून उत्तर गोव्यात सेनेची अशीच घोडदौड सुरू होती. अनेक पंच सरपंच तसेच नगरसेवक सेनेकडे असल्यामुळे सेना विधानसभा निवडणुकीत बाजी मारू शकेल, असे अनेक राजकीय विश्लेषकांना वाटत होते. विजय नाडकर्णी, आता शिंदेसेनेत असलेले सुभाष सावंत यासारख्यांनीही त्यावेळी गोव्याच्या शिवसेनेची कमान प्रभावीरित्या सांभाळली होती.

भाजप कुठेच नसल्यामुळे व मगो पक्ष कमकुवत झाल्यामुळे सेना विधानसभेत आरामात प्रवेश करू शकेल, असा होरा अनेकजण व्यक्त करत होते. पण माझ्या मते दोन चुका सेनेच्या गोव्यातील प्रगतीच्या आड आल्या. पहिली चूक म्हणजे अंतर्गत गटबाजी. या गटबाजीमुळेच संजय हरमलकर सारख्या ‘डॅशिंग’ राज्य प्रमुखाला सेनेतून बडतर्फ केले गेले. हरमलकरांना बडतर्फ करणे ही चूक गोव्याच्या सेनेला खरंच महागात पडली.

दुसरी चूक झाली, ती १९९४ साली. यावर्षी झालेल्या निवडणुकीत सेनेची युती भाजप व ‘मगो’शी होती. आमच्या वाट्याला दोन जागा आल्या होत्या. आम्ही साळगाव व मडकई या दोन जागा मागितल्या होत्या. मडकईत त्यावेळी आमदार असलेल्या माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांच्या विरोधात वातावरण होते. आणि आमची मडकईत चांगली ताकद असल्यामुळे आम्ही बाजी मारू शकू असा आम्हाला विश्वास होता. पण भाजप नेते कै. प्रमोद महाजन यांनी थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंशी संधान बांधून ही जागा भाजपच्या पदरात पाडून घेतली.

त्या जागी आम्हाला कुडचडे मतदारसंघ मिळाला. आणि आमच्या जागी भाजपचे श्रीपाद नाईक मडकईतून विजयी होऊन विधानसभेत पोहोचले. म्हणजे आमचे नुकसान हा भाजपचा फायदा ठरला. दुसऱ्या बाजूला आमच्या काही सेना नेत्यांनीच दगाफटका केल्यामुळे साळगावची दिलीप कळंगुटकरांनी लढविलेली जागा अगदी थोड्या मतांनी गेली. कुडचडेत ताकदच नसल्यामुळे तिथे अपेक्षेप्रमाणे सेनेला दारूण पराभव स्वीकारावा लागला.

तिथून जी गोव्यातील सेनेने मान टाकली ती अजूनपर्यंत वर आलेली नाही. मध्यंतरी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गोवा शिवसेनेची पुनर्बांधणी करण्याचे प्रयत्न केले होते. पण तेही सर्वार्थाने अपयशी ठरले. पण गेल्या ४० वर्षांत महाराष्ट्राची तशीच गोव्याची राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. महाराष्ट्रात शिवसेना दुभंगलेली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सेना सध्या भाजपबरोबर सरकारमध्ये आहे.

पण गोव्यात त्यांची भाजपशी युती नाही, असे त्यांचे नेते कीर्तीकर हे सांगताहेत. पण शिंदेची शिवसेना ही महाराष्ट्र बरोबर केंद्रातही भाजप प्रणित ‘एनडीए’चा घटक असल्यामुळे कीर्तीकरांची ही ‘घोषणा’ प्रत्यक्षात उतरेल, की नाही हे सांगता येणे कठीण आहे. त्याशिवाय सध्या निवडणुकीला कमी दिवस राहिल्यामुळे सध्या बरीच विस्कळीत असलेली पक्षाची बांधणी करायला सेनेला वेळ मिळेल की नाही,याचाही अंदाज बांधता येत नाही.

गेल्या निवडणुकीत पूर्ण शक्तीनिशी उतरून एकही जागा मिळवू न शकलेल्या बंगालमध्ये त्यावेळी राज्य करणाऱ्या तृणमूल काँग्रेसचा अनुभव ताजा असल्यामुळे सेनेबाबत राज्यात अनेक प्रश्नचिन्हे उमटू शकतात. या प्रश्नांना भेदून सेना गोव्यात तग धरते का, याचे उत्तर येणारा काळच देऊ शकेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT