Sateri Devasthan Hasapur Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

'गर्व से कहो हम हिंदू है' नारा देताना मुस्लिमांचा द्वेष करण्याचे कारण नाही; मुस्लिमांच्या योगदानावर भाष्य करणारा विशेष लेख

Goa Opinion: समतेवर अधिष्ठित इस्लामची स्वामी विवेकानंदांनी स्तुती केली आहे. जलेबी, सामोसा, वांग्याचे भरीत हे खाद्यपदार्थ, तबला, नथ, मेंदी, कव्वाली, सुफी तत्त्वज्ञान आपण इस्लामी संस्कृतीकडून घेतले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: शांतादुर्गा फातर्पेकरीण संस्थानाने फातर्पेच्या शांतादुर्गेच्या देवळाच्या वार्षिक उत्सवात मुसलमान विक्रेत्यांना दुकाने देऊ नयेत असा ठराव केला व मोठ्या अभिमानाने या निर्णयाची वाच्यता केली. यापूर्वी म्हापशातील काही संघटनांनी मुसलमान विक्रेत्यांकडून हिंदूंनी कोणताच माल घेऊ नये असे आवाहन केले. कोरगाव पंचायतीच्या सरपंचपदी अब्दुल करीम या धर्माने मुसलमान असलेल्या पंचाची रीतसर निवड झाली. तेव्हा लोकांनी त्याला विरोध केला. मुसलमानांविरुद्ध विद्वेषाचे वातावरण निर्माण करण्यासाठी हिंदुत्ववादी उजव्या शक्ती प्रयत्नपूर्वक सोशल मीडिया व अन्य मीडियांवर संघटित मोहीम राबवत आहेत.

हा देश हिंदूंचा आहे आणि मुसलमान हे या देशाचे दुय्यम नागरिक आहेत. मुसलमानांनी एक तर हा देश सोडून पाकिस्तानात जावे किंवा हिंदूंच्या मर्जीने हिंदूंची ’हां जी हो जी’ करत राहावे अशी ही भूमिका आहे.

वास्तविक या देशातले आपले मुस्लीम बांधव (आर्याप्रमाणे) परदेशातून आक्रमक म्हणून येऊन या देशात स्थायिक झालेले नाहीत. ते सर्व धर्मांतरित हिंदूच आहेत. हिंदू धर्मातल्या जातिभेदाला कंटाळून हजारो दलित बांधवांनी मुस्लीम धर्मात धर्मांतर केले हे वास्तव आहे. शक्य असूनही हे मुस्लीम बांधव फाळणीच्या काळात पाकिस्तानात गेले नाहीत. त्यांनी याच देशाला आपला देश मानला व इथेच राहणे पसंत केले. मुस्लीम संस्कृतीचे फार मोठे योगदान भारतीय संस्कृतीच्या वाटचालीत आहे हे अधोरेखित केलेच पाहिजे.

मुसलमानांच्या आगमनापूर्वी आपण कपडे पांघरत होतो, कपडे शिवण्याची कला आपल्याला मुसलमानांनी शिकवली. ही गोष्ट दस्तुरखुद्द स्वामी विवेकानंद ठासून सांगत होते.

समतेवर अधिष्ठित इस्लामची स्वामी विवेकानंदांनी स्तुती केली आहे. जलेबी, सामोसा, वांग्याचे भरीत हे खाद्यपदार्थ, तबला, नथ, मेंदी, कव्वाली, सुफी तत्त्वज्ञान आपण इस्लामी संस्कृतीकडून घेतले आहेत. भारतीय वास्तूत मुसलमानांच्या आगमनापूर्वी गोपुरे होती, स्तूप होते पण घुमट व गोल कमानी आपण मुसलमानांकडून घेतल्या. हलवा, बाजार, मलम, हकीम, दवा, दवाखाना असे अनेक शब्द भारतीय भाषांनी अरेबियन भाषांकडून घेतले.

डॉ. अब्दुल कलाम, बिस्मिल्ला खान, झाकीर हुसेन, शबाना आझमी, जावेद अख्तर, दिलीप कुमार (युसुफ खान), नर्गिस, शाहरूख खान, सलमान खान, अमीर खान, पतौडीचे नबाब, महमद अझरूद्दीन, सानिया मिर्झा, एम. एफ. हुसेन, अझीम प्रेमजी या आणि अशा अनेक दिग्गजांनी भारताची कला, संगीत, विज्ञान, चित्रपट, उद्योग ही क्षेत्रे काबीज केली.

सार्वजनिक रितीने दिवाळी साजरी करण्याची, दिवाळीत सार्वजनिक वास्तूंवर रोषणाई करण्याची व मिठाई वाटण्याची पद्धत शहेनशहा अकबराने सुरू केली. ताजमहाल, चारमिनार, हुमायूनची कबर या वास्तू मुसलमानांनी बांधल्या. बाग ही संकल्पना मुसलमान राजांनी राबवली. श्रीनगरमध्ये शालिमार गार्डन, मुघल गार्डन शहाजहानच्या प्रयत्नामुळे उभे झाले.

’गर्व से कहो हम हिंदू है’ हा नारा करताना मुसलमानांचा द्वेष करण्याचे कारण नाही. पण या देशातील मुस्लीमविरोधी शक्ती मुसलमान, ख्रिश्चन या सर्व अल्पसंख्याक धर्माबद्दल वैमनस्याची भावना निर्माण करत आहेत. या मुस्लीमविरोधी म्होरक्यांना प्रश्न विचारावासा वाटतो - मुसलमानांवर अंशतः बहिष्कार का घालता? मुसलमानांवर पूर्ण बहिष्कार घाला.

सर्वप्रथम मध्यपूर्वेतील मुस्लीम देशांत नोकरी करून, हजारो दिनार जोडणार्‍या भारतीयांना परत बोलवा. मुस्लीम देशांतून पेट्रोलियम पदार्थ आयात करण्याचे थांबवा. दर लीटर पेट्रोलला ५०० रुपये भाव देण्याची तयारी ठेवा.

मध्यपूर्वेच्या मुस्लीम देशांत आपण कोट्यवधी रुपयांचे धान्य, फळे, भाजी, मांस, मासे, कपडे, रसायने यांची निर्यात करतो. ती निर्यात थांबवा. ताजमहाल, चारमिनार या वास्तू झाकून टाका किंवा उद्ध्वस्त करा. झाकीर हुसेनचे तबलावादन ऐकू नका. शाहरूख खानचे चित्रपट पाहू नका. जलेबी, सामोसा, बिर्याणी, तंदुरी खाण्याचे बंद करा. मुसलमान विक्रेत्यांकडून हिंदूंनी माल घ्यायचा नाही तर हिंदू विक्रेत्यांनी मुसलमान ग्राहकांना माल विकणे बंद केले पाहिजे की नाही?

मुसलमान कामगारांना नोकरीत ठेवू नका. देशाच्या मनुष्यबळातून मान मनुष्यबळ वगळले तर देशाच्या अर्थव्यवस्थेला पक्षाघात होईल. जागोजागी कचर्‍यांचे ढीग साचतील. साथी येतील, मासेमारी, शेती, हस्तोद्योग आणि अशा असंख्य व्यवसायांना फटका बसेल. भारतीय लोकसंख्येच्या १५ टक्के असलेल्या मुसलमानांचे मनुष्यबळ व क्रयशक्ती शून्य मानल्यास भारताचे राष्ट्रीय उत्पन्न काही टक्क्यांनी कमी होईल.

गृहनिर्माण क्षेत्रातला एक उद्योजक मला एकदा म्हणाला, ‘मी मुसलमानांना सदनिका विकत नाही’. मी त्याला म्हटले, ‘फारच छान! आता एकच कर. मुस्लीम सुतार, रंगारी, गवंडी, इलेक्ट्रिशिअन, प्लंबर्स यांना न घेता तुझी एखादी इमारत बांधून दाखव’. बनारसचे शालू विणणारे विणकर मुसलमान आहेत. बेकरी व्यवसायात, हॉटेल धंद्यात लाखो कुशल, निम्नकुशल व अकुशल मुस्लीम कामगार आहेत. मुस्लीम देशांत नोकरी करून अनेक मुसलमान तरुण या देशाला परकीय चलन उपलब्ध करून देतात.

हे सगळे थांबले पाहिजे ना? आपल्या सोयी, गैरसोयी पाहून मुसलमानांवर अंशतः बहिष्कार घालायची ही लबाडी बंद करा. मुसलमानांवर पूर्ण बहिष्कार तर घालून पाहा. आंतरराष्ट्रीय राजकारण्यांवर त्याचा केवढा विपरीत परिणाम होईल याची जाणीव तुम्हांला नाही.

गोव्यात शेकडो वर्षापासून धार्मिक सलोख्याचे वातावरण आहे. शिवोलीचा ‘जागोर’ हिंदू व ख्रिश्चन बांधव संयुक्तपणे साजरा करतात. खुद्द फातर्पेच्या शांतादुर्गेच्या देवळाला अन्य धर्मीय भेट देतात. डिचोलीतील मुस्लीम पिराला अनेक हिंदू भजतात. साईबाबा आणि कबीर हे दोघेही मुस्लीम सुफी संताचे शिष्य होते. तसे असेल तर बोरीचे साईबाबा मंदिर, शिर्डीचे साईबाबा संस्थान यावर बहिष्कार टाकावा लागेल. कबीराचे दोहे जाळावे लागतील.

लग्नात मेंदी घालणे बंद करावे लागेल. शेर शायरी, कव्वाली, मुहावरे यांवर बंदी आणावी लागेल. उर्दू भाषेला भारतातून हद्दपार करावे लागेल. आधी मुसलमानांवर पूर्ण बहिष्कार घाला व नंतर ख्रिश्चनांवर पूर्ण बहिष्कार घाला. या देशात अन्य धर्मीय आहेत म्हणून त्यांच्याविषयी द्वेषाचे वातावरण निर्माण करणे हिंदुत्ववाद्यांना शक्य होते. सर्व मुसलमान या देशातून हद्दपार झाले तर हिंदुत्वाची मोठी अडचण होईल.

या देशात केवळ हिंदूच असतील तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, दलित अशा हिंदू धर्माच्या कैक जातीत व उपजातीत तणाव निर्माण होईल. ब्राह्मणकुलीन परशुरामाने क्षत्रियांचे २१ वेळा निर्दालन केले, ही गोष्ट फातर्पेची मराठीकुलीन देसाय विसरले का? मग ब्राह्मणांचा सूड त्यांनी नको का उगवायला? ब्राह्मणांवर बहिष्कार नको का घालायला?

गोव्याला किंबहुना या देशाला अराजकात लोटायचे कारस्थान करायचे आहे. त्यांनी आपल्या पायावर धोंडा मारावा. ज्या खांदीवर तुम्ही बसलात ती खांदीच तुम्ही कुर्‍हाडीने मोडत आहात. ’वसुधैव कुटुंबकम’ यासारख्या घोषणा बंद कराव्यात. भारताने विश्वगुरू होण्याचे स्वप्न गाडून टाकावे. नरसी मेहताच्या ’वैष्णव जनतो तेने कहिेए’ या मूळ पदात ’ईश्वर अल्ला तेरे नाम’ या ओळी घुसवणार्‍या महात्मा गांधीचा फोटो भारतीय नोटांवरून काढून टाकावा लागेल.

भारताच्या तिरंगी झेंड्यात हिरवा रंग का? भारताचा झेंडा बदला. तो भगवा करा. ’जन गण मन’ या राष्ट्रगीताच्या जागी ’वंदे मातरम’ आणा. भारताचे संविधान बदला. संविधानातून निधर्मवाद (सेक्युलरिजम) हा शब्द काढून टाका. हिंदुस्तान हिंदूंचा व फक्त हिंदूंचा हे ‘वी द पीपल’ म्हणणार्‍या भारतीय संविधानाचे ब्रीदवाक्य करून टाका! आणि ’शांतादुर्गा विजयते’ असे का म्हणावे? पुरुषसत्ताक संस्कृतीचा ’श्री’ झुगारून लावा. शांतादुर्गेला तिचे मूळ सातेर रूप द्या! सरदेसाई, प्रभुदेसाई, प्रभुगावकर या ब्राह्मणांचे ब्राह्मणत्व काढून त्यांचे देसाई, गावकर असे नामकरण करा व त्यांना मराठ्यांत घ्या. ऐवीतेवी हे सरदेसाई दसर्‍याला शस्त्रांची पूजा करतातच ना? कुंकळ्ळीहून फातर्प्याला येणार्‍या छत्र्यांऐवजी त्रिशूल घेऊन नाचा. कारण छत्री हे सर्वसमावेशकतेचे प्रतीक आहे. त्रिशूल हे शत्रुत्वाचे द्योतक आहे.

हिंदू धर्माच्या विशाल वटवृक्षाचा विद्रूप, बुटका, निष्फळ बोन्साय करून टाका!

-दत्ता दामोदर नायक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shehbaz Sharif: भारताला शत्रू म्हटले, युद्ध जिंकल्याचा केला दावा, शेवटी शांततेसाठी मागितली भीख; पाकच्या पंतप्रधानांचा युएनमध्ये थापांचा पाऊस

रावळपिंडी एक्सप्रेसचं स्लिप ऑफ टंग! अख्तरच्या तोंडून अभिषेक शर्माऐवजी अभिषेक बच्चनचं नाव, त्याने पोस्ट करत दिली प्रतिक्रिया Watch Video

Shehbaz Sharif Video: 'पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार?' रिपोर्टरच्या थेट प्रश्नावर काय म्हणाले शाहबाज शरीफ? शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT