विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन शाळा व घरांमध्ये मिळाले पाहिजे नाहीतर आज समाजात दिसणाऱ्या विकृती, व्यसने, हिंसाचार व व्यभिचार हा वाढतच जाणार.
समस्त समर्पित व चाकोरीबाहेरील तंत्र अवलंबून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी झटणाऱ्या गुरुजनांप्रति आदर व्यक्त करून हा विचार मांडण्याचा प्रयत्न करत आहे. आजच्या स्पर्धात्मक, यांत्रिक मानवाच्या युगात विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नाही. त्यांचा गुणात्मक विकास होण्यासाठी विविध विषयांची पुस्तके, वृत्तपत्रातील लेख, चरित्र / आत्मचरित्र ह्यांचे वाचन तसेच शारीरिक व्यायाम, खेळ हे विद्यार्थ्यांच्या अंगवळणी पडले पाहिजेत. त्यांना प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्याचे कर्तव्य शाळा व घरी पार पडले पाहिजे.
जी गरीब व अशिक्षित पालकांची मुले आहेत त्यांच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी शाळांना उचलावी लागेल. आज नकारात्मक सवयी व विचारांचा समाजात इतका सुळसुळाट झाला आहे की विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन शाळा व घरांमध्ये मिळाले पाहिजे नाहीतर एकविसाव्या शतकातील पिढी ही वैचारिक व शारीरिकदृष्ट्या कुमकुवत निपजणार. आज समाजात दिसणाऱ्या विकृती, व्यसने, हिंसाचार व व्यभिचार हा वाढतच जाणार.
एका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकाशी ह्या विषयावर बोलताना त्यांनी सांगितले की, ‘सर, तीस ते चाळीस वर्षापूर्वी दीड दोन हजार पगारावर आम्ही शिक्षक हा पेशा म्हणून स्वीकारला. गेल्या दहा ते पंधरा वर्षात या पेशात येणारी तरुण पिढी अपवाद वगळता ही बऱ्या पगाराची, कमी तासाची नोकरी म्हणून करतात’. हल्लीच विवेकानंद केंद्रांचे कार्यकर्ते व निवृत्त शिक्षक विश्वास लापलकर ह्यांचे ‘अरुण रंग’ हे पुस्तक वाचनात आले. ते स्वतः १९८१साली विदर्भातल्या कॉलेजमधल्या शिक्षकाची नोकरी सोडून आसाम व अरुणाचल प्रदेशातील डोंगराळ भागातील विवेकानंद केंद्रामार्फत चालणाऱ्या शाळांमध्ये शिकवण्यासाठी गेले. एखादा ध्येयवेडा शिक्षकच हे करू शकतो. त्या पुस्तकात त्यांनी माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम ह्यांची एक गोष्ट नमूद केली आहे. ती खालीलप्रमाणे :-
डॉ. अब्दुल कलाम हे जेव्हा राष्ट्रपती झाले तेव्हा त्यांचे २०२०चे जे व्हिजन अथवा स्वप्न होते, ते घेऊन ते सर्व ठिकाणी जायचे. विशेष करून शाळेतील मुलांसाठी व शिक्षकांसाठी ते हा कार्यक्रम करायचे. प्रत्येक शाळेतील दहावी बारावीचे आठ-दहा विद्यार्थी व एक-दोन शिक्षक अशा निवडक दोनेकशे लोकांसाठी ते हा कार्यक्रम करायचे आणि या सर्वांसमोर ते विषय मांडायचे की, ‘२०२०पर्यंत आपल्याला आपल्या भारत देशाला समृद्ध बनवायचे आहे.’ त्यांचे विचार मांडून झाल्यावर मुलांना काही शंका वा प्रश्न असतील, तर मुलांनी ते मोकळेपणाने विचारावेत, म्हणून अशा शंका निरसनासाठी ते आवर्जून वेळ ठेवायचे.
अशाच एका शंका समाधान प्रसंगी एक अधीर मुलगा, त्याची पाळी येईपर्यंत थांबण्याऐवजी, मध्येच उठून मोठ्या आवाजात बोलायला लागला. सगळे त्याला थांबवायला धावले, पण कलामांनी त्याच्यावर रागावण्याऐवजी त्याला जवळ बोलावून घेतले. तो ताडताड करीत त्यांच्यासमोर गेला व म्हणाला, ‘तुम्ही आम्हाला हे सगळं सांगताय, पण तुम्हाला माहिती आहे का, इथले राजकारण कसे आहे? शिक्षक आम्हाला शाळेत शिकवत नाहीत, आम्हाला ट्युशनसाठी घरी बोलावतात, शिक्षकांची आपापसात भांडणं आहेत’, असं बरंच काही.
समाजाच्या सद्य:स्थितीची त्याच्या मनातील खदखद त्याने घडाघडा कलामांसमोर मांडली. मध्येच त्याचा आवाज रागानं चढायचा, तर मध्येच डोळ्यात पाणी यायचं . ११वीचा हा विद्यार्थी राष्ट्रपतींसमोर असे सगळे बोलतोय, हे पाहून आयोजकांसह सर्वांचीच तारांबळ उडाली. कारण राष्ट्रपती असतात तिथे राज्यपाल वगैरे अनेक वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित असतात. आता काय होईल अशी भीती सर्वांना वाटू लागली. त्या विद्यार्थ्यांचे बोलणे थांबल्यावर डॉ. कलामांनी शांतपणे त्याला विचारले, ‘हो गया बेटा तुम्हारा?’ मग त्यांनी विचारले, ‘या मुलाला शिकवणारे शिक्षक इथे आहेत का?’ आता प्रत्येक शाळेतील मुलांसोबत एक-दोन शिक्षक बरोबर म्हणून आलेले होतेच. या मुलासोबत आलेले शिक्षक उठून पुढे आले. त्या मुलाकडे त्यांनी एकदा रागाने पाहिले आणि कलामांना म्हणाले, ‘सर, हा मुलगा खूप उद्धट आहे.
त्याला मान्यवरांसमोर कसं बोलायचं, वागायचं हे कळत नाही. त्याला परत गेल्यावर मी चांगलाच धडा शिकवतो.’ हे सगळं डॉ. कलामांनी ऐकून घेतले आणि ते त्या शिक्षकाला म्हणाले, ‘जरा थांबा’ आणि नंतर त्यांनी विचारले, ‘ह्या मुलाची आई इथे आहे का?’ योगायोगाने त्याची आई पण तिथे उपस्थित होती, कारण ती पण एका शाळेमध्ये शिक्षिका होती आणि आपला मुलगा या कार्यक्रमाला जाणार आहे म्हटल्यावर ती पण तिच्या शाळेतील मुलांसोबत आलेली होती. ती बिचारी रडत रडत स्टेजवर आली. ती कलामांना सांगू लागली, ‘सर, या मुलाला कस समजवावं हे मलाही समजत नाही. घरी पण तो असंच काही तरी बोलत असतो.’ मग, डॉ. कलामांनी त्या शिक्षकाला आणि त्या मुलाच्या आईला, दोघांनाही जवळ बोलावलं. कलामांच्या एका बाजूला आई व एका बाजूला ते शिक्षक उभे राहिले. कलामांनी दोघांचाही एकेक हात आपल्या हातात घेतला व त्या मुलाला डॉ. कलाम म्हणाले, ‘शिक्षक आणि आई ह्या दोन व्यक्तीच समाज बदलू शकतात.’
डॉ. कलामांच्या विचारांनी शाळा व पालक ह्यांची जबाबदारी २०२६मध्ये कित्येक पटीने वाढली आहे, याचा आपणच विचार करावा!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.