‘डीपफेक’ म्हणजे पर्यायाने एआयद्वारे निर्माण केल्या जाणाऱ्या ऑडिओ व्हिज्युअल सामग्रीद्वारे होणाऱ्या बाल लैंगिक शोषणाच्या धोक्याला तोंड देण्यासाठी ब्रिटनमध्ये चार नवीन कायदे करण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या कायद्यांद्वारे मुलांचा समावेश असलेली लैंगिक अत्याचार सामग्री (Child Sexual Abuse Material (CSAM)) एआयचा वापर करून तयार करणे सुलभ करणारे टूल्स, असे टूल्स बनवणारे, ती वापरणारे, अशा टूल्सचे आणि सामग्रीचे वितरण करणाऱ्या वेबसाइट्स , असे कन्टेन्ट बघणारे, डाउनलोड करून मोबाइल किंवा कॉम्प्युटरवर आपल्या संग्रही ठेवणारे, सारेच गुन्हेगार ठरणार आहेत. या साऱ्यांसाठी या कायद्यांद्वारे कठोर शासनाची तरतूद केली जाणार आहे. जगातील असे हे असे पहिलेच कायदे असतील.
खरे तर जगभरातील इतर देशांप्रमाणे ब्रिटनमध्येही मुलांसंबंधी ऑनलाइन अश्लील, लैंगिक आणि विघातक दृकश्राव्य सामग्रीचे निर्माण, प्रसार आणि वापर यांना आळा घालण्यासाठीच प्रभावी कायदे आहेत. असे असतानाही आणखी कायद्याची गरज का भासली असे ब्रिटनच्या गृहसचिव यवेट कूपर यांना बीबीसीच्या पत्रकाराने एका मुलाखतीवेळी विचारले. या प्रश्नाला त्यांनी दिलेले उत्तर चिंता करायला लावणारे आहे. कूपर म्हणाल्या की, ‘आजमितीस कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) अशा प्रकारची सामग्री जोमाने वाढण्यासाठी आणि फोफावण्यासाठी ‘स्टिरॉइड’चे काम करत आहे.
सहज उपलब्ध असलेल्या डीपफेकए टूल्स मूळ अशा प्रकारच्या सामग्रीच उत्पादन आता मोठ्या प्रमाणात अगदी औद्योगिक पातळीवर होत आहे. महत्त्वाचे म्हणजे एआय तंत्रज्ञानामुळे जगभरातील कुठल्याही, या साऱ्यांशी काहीही संबंध नसलेल्या मुला-मुलींचा सोशलमिडीया व इतर ऑनलाइन माध्यमांवर डिजिटली उपलब्ध असलेला चेहरा या सामग्रीमध्ये वापरला जातोय. पुढच्या पिढीला अंधाराच्या खाईत लोटण्याचे सामर्थ्य असलेल्या या तंत्रज्ञानाला वेळीच आळा घालायला हवा हे लक्षात आल्यानेच ब्रिटिश सरकारने हे कायदे करण्याचे काम हाती घेतले आहे’, असे त्या पुढे म्हणाल्या.
येणाऱ्या काळात जगभरात हा भस्मासुर थैमान घालणार आहे हे नक्की. त्यामुळे इतर देशांकडूनही अशा प्रकारच्या उपाययोजना अपेक्षित आहेत.
खरे तर सायबर स्पेसमध्ये ऑनलाइन बाल लैंगिक अत्याचार सामग्री (Child Sexual Abuse Material (CSAM)) म्हणजे ‘सिसॅम’ फार पूर्वीपासून मर्यादित प्रमाणात उपलब्ध होती. मुलांना वेगवेगळी आमिषे दाखवून, जाळ्यात ओढून, धाक दाखवून, धमक्या देऊन अशी सामग्री तयार केली जाते. तर अल्प प्रमाणात मुले स्वतःहून अशी सामग्री तयार करून एकमेकांकडे शेअर करतात. पण त्यांच्या वर्तुळातून जेव्हा असा कन्टेन्ट बाहेर जातो तेव्हाही त्याचा गैरवापर केला जातो. पण कोविड काळात या सामग्रीत खूप प्रमाणात वाढ झाली. आणि आता कूपरबाई म्हणतात तशी अतिशय सहज उपलब्ध होणाऱ्या ‘एआय पॉवर्ड डीपफेक टूल्स’चे स्टिरॉइड मिळाल्यामुळे ही कीड आणखीनच फोफावत जाणार आहे.
आम्हा भारतीयांच्या दृष्टीने ही चिंताजनक बाब नक्कीच आहे. कारण अशा प्रकारची ‘सिसॅम’ सामग्री निर्माण, प्रसार आणि वापर करणाऱ्या पहिल्या पाच देशांमध्ये भारताचा क्रमांक लागतो. नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्यूरो(NCRB)नुसार, गेल्या दशकातच भारतात याप्रकारच्या प्रकरणांमध्ये ४०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्सप्लॉयटेड चिल्ड्रन(NCMEC)नुसार, केवळ २०२०मध्येच भारतात २४ लाखांहून अधिक ‘सिसॅम’ प्रकरणे नोंदवली गेली. यामुळेच २०२३मध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने देशात ‘सिसॅम’ सामग्री २५० ते ३०० टक्क्यांनी वाढली आहे हे निदर्शनास आणून देत राज्यांना योग्य उपाययोजना करण्याचा इशारा दिला होता. लक्षात घ्या की ही सर्व आकडेवारी डीपफेक तंत्रज्ञानाच्या सहज उपलब्धतेपूर्वीची आहे. ‘इंटरनेट वॉच फाउंडेशन’(IWF) या ‘सिसॅम’च्या निर्मूलनासाठी जागतिक स्तरावर काम करणाऱ्या संस्थेच्या आकडेवारीनुसार गेल्या एका वर्षात ‘एआय’निर्मित ‘सिसॅम’मध्ये ३८० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
यावरून माहिती तंत्रज्ञान क्षेत्र आणि ‘जुगाड’ या दोन्हीत प्रवीण असलेल्या आपल्या देशात आजमितीस ‘सिसॅम’ काय प्रमाणात वाढले असेल याची कल्पनाच केलेली बरी. तुम्हांला मी उगाच बाऊ करतेय असे वाटू नव्हे म्हणून ही तुमच्या आजूबाजूची गोव्यातीलच (Goa) काही ‘सिसॅम’संबंधित उदाहरणे देतेय. जुलै २०२१मध्ये इंटरपोलने निदर्शनास आणून दिल्यानंतर गोव्याच्या किनारी भागातील एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करणाऱ्या २९ वर्षीय माणसाला ‘सिसॅम’ निर्माण करून ते जगभरच्या लोकांना विकण्याच्या आरोपावरून केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाने(सीबीआय) अटक केली होती. त्याच्या कॉम्प्युटरमध्ये लहान तसेच पौगंडावस्थेतील गोव्यातील तसेच महाराष्ट्रातील मुलांचे असे हजारो व्हिडिओ सापडले. सप्टेंबर २०२२मध्येही इंटरपोलनेच निदर्शनास आणून दिल्यानंतर ‘ऑपरेशन मेघचक्र’ नावाने सीबीआयने केलेल्या कारवाईतही गोव्यातील अनेक जणांवर गुन्हे नोंद केले गेले.
अधिकृत आकडेवारीनुसार, २०२१ या एका वर्षातच ४३,६६३ बाल लैंगिक शोषण सामग्रीसंबंधी फाईल्स गोव्यात डाउनलोड केल्या गेल्या, या वरून या समस्येची गंभीरता लक्षात यावी. पालकांनी, शिक्षकांनी किंबहुना साऱ्या समाजानेच या अशा प्रकारच्या आकडेवारीने समोर आणलेल्या वस्तुस्थितीकडे, एआयटूल्सद्वारे निर्माण केल्या जाणाऱ्या ‘सिसॅम’कडे, आणि ‘डीपफेक’सारख्या तंत्रज्ञानाच्या प्रादुर्भावाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. सर्वंकष जागरूकता हा या समस्येवरील एकमेव उपाय होय.
आपल्या गोंडस मुलांचे साऱ्या जगाने कौतुक करावे म्हणून त्यांचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून सायबर युगातील ’पेरेंटिंग’ म्हणजेच ’शेअरेन्टींग’ बहुतेक पालक करतात. आता लक्षात घ्या की माझ्याकडील ‘डीपफेक सॉफ्टवेअर टूल’ला मी यातील काही फोटो, काही मिनिटांचा व्हिडिओ आणि ऑडिओ वापरून प्रशिक्षित करू शकते. आणि त्यायोगे कुणाच्याही काहीही करणाऱ्या शरीरावर तुमच्या मुलांचा चेहरामोहरा बसवू शकते.
नुसते गुगलवर जरी शोधलेत तरी अशी कितीतरी सहज वापरण्याजोगी ‘डिपफेक टूल्स’ तुम्हांला सहज सापडतील. हल्लीच मी एका अशा प्रकारच्या ‘डीपफेक’द्वारे तयार केलेल्या ‘सिसॅम’ला बळी पडलेल्या एका गोव्याबाहेरील मुलीची मुलाखत ऐकली. तिच्या आईने तिच्या दहावीच्या फेअरवेलच्या दिवशीचे ‘केवढ्या लवकर मोठी झाली माझी सोनुली’ असे म्हणत सोशल मीडियावर टाकलेल्या फोटो आणि व्हिडिओंचा ‘डीपफेक’द्वारे गैरवापर करून ‘सिसॅम’ तयार केले गेले. कुणी तरी ओळखीच्या माणसाने ते पाहून तिच्या आईवडिलांना सांगितले. त्यांनी पोलिस, सायबर सेल, सायबर क्राइम पोर्टल सगळीकडे तक्रार केली. पण हे अशा प्रकारचे कन्टेन्ट म्हणजे कापसाच्या बोंडातून उडून गेलेला कापूस, कुठवर पोहोचेल त्याचा नेम नाही आणि कोठे पोहोचला ते शोधून काढणे दुरापास्त. त्यातही आमच्या न्याय आणि सुव्यवस्था यंत्रणेचे हात या सायबर क्रिमिनलपर्यंत पोहोचण्यासाठीची प्रभावी यंत्रणा अजून निर्माण व्हायचीय.
‘मला बाहेर जायला भीती वाटते. मागे पुढे असलेला प्रत्येक माणूस मला संशयाने पाहतोय असे वाटते यानेही माझे ते ‘सिसॅम’ पाहिलें नसणार ना? तो माझ्याबद्दल काय विचार करत असेल, असे विचार डोक्यात येऊन डोक्याचा पार भुगा होऊन गेलाय. मी काय करू? या साऱ्यात माझी काय चूक?’, असे कळवळून विचारणाऱ्या त्या पोरीची आर्त हाक ऐकून काळीज पिळवटून निघाले. ‘सिसॅम’ सामग्री निर्माण करणारे आपल्या सामग्रीमध्ये नावीन्य आणण्यासाठी सदैव अशा नवनवीन चेहऱ्यांच्या सदैव शोधात असतात. तुम्हीच सोशल मीडियावर जगजाहीर केलेले तुमच्या मुलांचे हे फोटो आणि व्हिडिओ अयोग्य माणसांच्या हातात गेले तर काय कहर होऊ शकतो याची नुसती कल्पना करा आणि निदान या पुढे तरी या बाबतीत सावधगिरी बाळगा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.