
परकीय आक्रमकांनी प्रथम येथील देवळे उद्ध्वस्त करून समाजाचा आत्मविश्वास तोडून टाकण्यावर भर दिला. शक्य असेल तेथे कच्चे दुवे शोधून आघात करून पाहण्याचे तेच कारस्थान पंचमस्तंभी मंडळी करीत आहेत.
दैनिक ‘गोमन्तक’ मधील मोहनदास लोलयेकर यांचा दि.११ जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेला लेख वाचला. युगानुयुगे मठ, मंदिरे ही आपल्या देशातील शक्तिकेंद्रे राहिली आहेत. मंदिरसंस्था हिंदुस्थानचा आत्मा होय. मंदिरांशिवाय हा देश म्हणजे निष्प्राण कलेवर! म्हणून परकीय आक्रमकांनी प्रथम येथील देवळे उद्ध्वस्त करून समाजाचा आत्मविश्वास तोडून टाकण्यावर भर दिला. स्वतंत्र भारतात उघडपणे अशा कारवाया करणे शक्य नाही. त्यामुळेच शक्य असेल तेथे कच्चे दुवे शोधून आघात करून
पाहण्याचे कारस्थान पंचमस्तंभी मंडळी करीत आहेत. ‘मठ मंदिरे, भट-पुरोहित’ सध्या या मंडळीचे गोमंतकातील ’सॉफ्ट टार्गेट’ आहेत. बेजबाबदार विधान करून सवंग प्रसिद्धी मिळते! ’येन केन प्रकारेण...’ असे शास्त्रवचन आहेच! अर्बन नक्षलवादाची गोवा आवृत्ती तर नाही ना?
केवळ ’हिंदू समाजालाच सुधारण्याचा विडा’ या तथाकथित सेक्युलर, नास्तिक, पुरोगामी मंडळींनी का उचलावा हेही एक रहस्य! पण असा प्रश्न विचारल्यावर हमरीतुमरीवर यायला ही मंडळी तयार! नुकतेच एका मठग्रामस्थ नास्तिक सद्गृृहस्थाच्या चिरंजीवाने देवाच्या अस्तित्वास सहमती दर्शवली. हा काळाने उगवलेला सूड नाही का? (की भांगेत तुळस उगवली!)
देवळे, मठ मंदिरे, पौरोहित्य संस्थेला हजारो वर्षांची परंपरा आहे. मोगलाईमध्ये हिंदू समाज केवळ देवळांच्या आधारे धर्मांतरणाची लाट रोखून ठेवण्यात यशस्वी ठरला ना? स्वामी समर्थ रामदास, गुरु नानकजी, महाराष्ट्रात सर्व जातीपातीमध्ये अवतरलेल्या संतांच्या मांदियाळीचे कर्तृत्वदेखील समाज कधीच विसरणार नाही. ‘विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ’ अशी संतांची शिकवण आहे. म्हणून तर एक हजार वर्षांचा अविरत संघर्ष करून ८५% हिंदू धर्मनिष्ठ राहिले व जिहादी मानसिकतेवर पहिला विजय मिळाला!
नास्तिकवाद आपल्या हिंदू परंपरेत नवा नाही. एकेश्वरवाद, अनेकेश्वरवाद, निराकार ईश्वर इत्यादी विविध विचार या भूमीत अनादी काळापासून मांडण्यात येत आहेत. ’नवे विचार दाही दिशांतून आमच्याकडे सतत येवोत’ अशा अर्थाच्या प्रार्थना ऋग्वेदात आहेच. त्यामुळे विचारभिन्नता असली तरी परस्पर समादर राखण्यानेच सर्वांचे कल्याण साधता येईल याचे भान सर्वांनी ठेवून उचित आचरण करायला हवे!
पौरोहित्य परंपरेबद्दल मला एवढेच सांगावेसे वाटते की पुरातन काळापासून ही केवळ भटा-ब्राह्मणांची मक्तेदारी राहिली आहे, असा समज कृपया कोणी करून घेऊ नये. देशातील हजारो देवळांमध्ये तथाकथित पददलित, बहुजनसमाजबांधव (क्षमस्व!) नित्य पूजाअर्चा युगानुयुगे करीत आहेत! परंपरागतरीत्या, गुण्यागोविंदाने! ही आहे हिंदू समाजाची ताकद...! आज जातिव्यवस्था क्षीण झाली आहे. टोकदार कंगोरे कमी टोचत आहेत.
पण पुरोगामी, तथाकथित नास्तिक मंडळीचा आवडता सिद्धांत म्हणजे जातिभेदास मठ मंदिरे, पुरोहितवर्ग जबाबदार! वस्तुस्थिती ही आहे की ब्रिटिश राजवटीत पहिल्यांदाच १८३७ साली भारतात ’जातीय जनगणना’ करण्यात आली. (व्यवसाय-धंद्यानुसार) ’आडनाव’ हा प्रकार भारतात पहिल्यांदाच लावला गेला. ’सायबाच्या’ देशातील शहाणपण!! फोडा आणि राज्य करा! हीच गुरुकिल्ली वापरून नेहरू-गांधी परिवाराने पाच दशके सत्ता हातात ठेवली. आता ’शहजादे महोदयांना’ पुन्हा जातीय जनगणना हवी आहे. म्हणजे या आपमतलबी मंडळींनी हिंदू समाज कायम जातिव्यवस्थेच्या दलदलीत रुतावा असा राजकीय डाव टाकायचा.
नास्तिक पुरोगामी मंडळी मठ मंदिरांच्या नावे शंख करणार. म्हणे मठ मंदिरे जातिभेद वाढवतात! दोस्तहो, कुठे फेडाल ही पापे? जाता जाता देशातील देवळाच्या सद्य:स्थितीविषयी. गोमंतकातील मंदिरे काही प्रमाणात स्वायत्त आहेत. पण पं. नेहरूंच्या आशीर्वादाने (!) देशभरातील हजारो-लाखो देवळांच्या मालमत्तेवर आणि भाविकांकडून दानपेटीत टाकलेल्या पैशावर खुलेआम, राजरोस डल्ला मारण्याचे पुण्यकर्म, देवस्थान व्यवस्थापन कायद्यानुसार राज्य व केंद्र सरकारकडून केले जात आहे हे किती जणांना माहीत आहे?
हिंदू समाजाने दिलेल्या दानाचा वापर ’सर्वधर्मसमभावी’ मायबाप सरकार अब्जावधी रुपये हजयात्रा अनुदान, अन्य धार्मिक आस्थापनांच्या देखभालीसाठी खर्च खुलेआम करते. ही लूट नाही बरं का...! खरी देशसेवा होय! एवंच, कोळसा कितीही उगाळला तरी काळाच! एक सुविचार वाचलेला, ‘दुर्जनांच्या टिकाटिप्पणीने नव्हे तर सज्जन मौन राहिल्यास समाजाचे नुकसान अधिक होते’. इत्यलम्.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.