Ravi Naik Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Ravi Naik: मगो, कॉंग्रेस व भाजप या गोव्यातील 3 प्रमुख पक्षांच्या चिन्हावर निवडून येणारे एकमेव नेते 'रवी नाईक'

Ravi Naik Biography: रविंच्या या सर्व राजकीय कारकिर्दीचा विचार केल्यास एक गोष्ट ठळकपणे लक्षात येते आणि ती म्हणजे रविंना असलेला जनाधार. अनेक पक्षांतरे करूनसुद्धा ते संपले नाहीत ते याच जनाधारामुळे.

गोमन्तक डिजिटल टीम

मिलिंद म्हाडगुत

नुकतेच दिवंगत झालेले रवि नाईक हे एक अजब रसायन होते. ते एका पक्षात कधीच टिकले नाही. पण तरीही ते जिंकतच राहिले. त्यांच्या राजकारणाची सुरुवात झाली ती १९६६ साली. ते त्यावेळी युनायटेड गोवन्स (युगो)चे सदस्य बनले होते.

जॅक सिक्वेरा, बाबू नायकसारखे दिग्गज नेते युगोमध्ये असले तरी या पक्षाला फोंड्यात विशेष स्थान नव्हते. पण त्यावेळी फोंड्यात गोवा महाराष्ट्रात विलीन करण्याचे वारे वाहत असल्यामुळे त्याला विरोध करण्याकरता आपण युगोत सामील झालो असे रवि सांगायचे.

आणि त्याप्रमाणे १६ जानेवारी १९६७रोजी झालेल्या जनमत कौलात रविंनी विलीनीकरणाच्या विरोधात भूमिका घेतली होती. पण मगोचा बालेकिल्ला म्हणून त्याकाळी गणला जात असलेला फोंडा तालुका हा विलीनीकरणाच्या बाजूने असल्यामुळे रविंना अनेक खडतर प्रसंगांशी सामना करावा लागला होता. पण यातूनच त्यांच्यातील नेतृत्वाचे गुण विकसित व्हायला लागले. आणि यामुळेच मगो नेत्यांचे त्यांच्याकडे लक्ष वळायला लागले.

आपल्याला मगोची तत्त्वे मान्य असल्यामुळे आपण मगोकडे वळलो असे ते सांगत असले तरी फोंड्यात राजकीय भवितव्य घडविण्याकरता त्या काळात मगोशिवाय दुसरा पर्याय नाही हे जाणून त्यांनी मगोत उडी घेतली हे अधिक खरे आहे.

१९७६च्या सुमारास मगोमध्ये उडी घेऊन ते फोंड्याचे नगरसेवक बनले. त्या काळात पालिका निवडणूकसुद्धा पक्षीय चिन्हावर लढवली जात असे. नगरसेवक झाल्यामुळे त्यांनी पक्षावर आपली पकड बसवायला सुरुवात केली. आणि १९८०साली त्यांनी मगोची उमेदवारी मिळवली.

वास्तविक त्यावेळी रोहिदास नाईक हे फोंड्याचे आमदार होते. पण रविंनी योग्य ’मोर्चेबांधणी’ केल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री तथा त्या वेळच्या मगोच्या सर्वेसर्वा शशिकलाताई काकोडकर यांना रोहिदासाना डावलून रविंना उमेदवारी द्यावी लागली.

इथूनच रवि ही काय ’चीज’ आहे याचा प्रत्यय सगळ्यांना येऊ लागला. त्यावेळी ते निवडणूक हरले असले तरी त्यांचे नेतृत्वगुण उदयाला यायला लागले होते. कुळ-मुंडकार संघटना स्थापन करणे ही याचीच एक झलक होती.

यामुळेच ते १९८४साली मगोच्या उमेदवारीवर फोंडा मतदारसंघातून निवडून येऊ शकले. मात्र मगो पक्षाचे कार्याध्यक्ष होऊनही ते जास्त दिवस मगोत राहिले नाहीत. १९८९साली जरी ते मडकईतून मगोच्या उमेदवारीवर निवडून आले असले तरी मुख्यमंत्री होण्याकरता १९९१साली त्यांनी मगोला रामराम ठोकून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

हा मगोला मोठा धक्का होता. या धक्क्यातून मगो शेवटपर्यंत सावरू शकला नाही. २५ जानेवारी १९९१पासून ते ८ डिसेंबर २०२१पर्यंत ते कॉंग्रेसमध्ये होते. अपवाद फक्त २४ ऑक्टोबर २००० ते २७ फेब्रुवारी २००२ या दीड वर्षांचा.

या काळात ते भाजपवासी होऊन उपमुख्यमंत्री बनले होते. पण नंतर ऐन निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसमध्ये ’कमबॅक’ करून त्यांनी ती निवडणूकही जिंकली होती. आणि शेवटचा प्रवेश होता तो भाजपवासी होण्याचा. ८ डिसेंबर २०२१मध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार्‍या रविंनी २०२२सालची निवडणूक जिंकून भाजपला फोंड्यात ’एन्ट्री’ मिळवून दिली.

रविंच्या या सर्व राजकीय कारकिर्दीचा विचार केल्यास एक गोष्ट ठळकपणे लक्षात येते आणि ती म्हणजे रविंना असलेला जनाधार. अनेक पक्षांतरे करूनसुद्धा ते संपले नाहीत ते याच जनाधारामुळे. वास्तविक ज्या ज्या नेत्यांनी मगोशी गद्दारी केली ते ते संपले असे इतिहास सांगतो.

रमाकांत खलप, बाबूसो गावकर, डॉक्टर काशिनाथ जल्मी, प्रकाश वेळीप यांसारखे एके काळचे मगोचे दिग्गज नेते पक्ष सोडल्यानंतर परत कधीच निवडून येऊ शकले नाही. शशिकला ताईनी मगोशी प्रतारणा करून स्थापन केलेला भाऊसाहेब बांदोडकर गोमंतक (भाबांगो) पक्ष तर अक्षरशः नामशेषच झाला.

नंतर ताईंनी मगोमध्ये घरवापसी केली असली तरी त्या आपली पूर्वीची ’शान’ राखू शकल्या नाही हेही तेवढेच खरे. मात्र पक्षांतराचा परिणाम रविंवर कधीच झाला नाही. ते एखाद्या अविचल खडकासारखे ताठ उभे राहिले.

म्हणूनच तर ते मगोच्या उमेदवारीवर दोनदा, कॉंग्रेसच्या चारदा व भाजपच्या एकदा असे सात वेळा निवडून येऊ शकले! आणि ते बोलायचे तसेच. ’पक्ष फक्त चिन्हापुरता असतो. काम हे व्यक्तीच करत असते.

यामुळे माझ्यावर विश्वास ठेवून माझे मतदार मला मतदान करत असतात’ असे ते नेहमी सांगायचे. त्यांची कारकीर्द पाहिल्यास ही गोष्ट खरी वाटायला लागते. यामुळेच मगो, कॉंग्रेस व भाजप या राज्यातील तीन प्रमुख पक्षांच्या चिन्हावर निवडून येणारे रवि हे एकमेव नेते ठरले!

त्यांचा सर्वाधिक काळ गेला तो कॉंग्रेसमध्येच. मुख्यमंत्री, खासदार, गृहमंत्री, विरोधी पक्षनेते अशी महत्त्वाची पदे भूषविण्याबरोबर, तसेच चार वेळा निवडून येण्याबरोबरच त्यांचा कॉंग्रेसमध्ये एक जबरदस्त दरारा होता. त्यांनी कॉंग्रेसमध्ये साडेअठ्ठावीस वर्षे व्यतीत केली. या काळात त्यांनी आपले वर्चस्व निर्माण केले. २०१२साली पराभूत होऊनसुद्धा या वर्चस्वाला तडा गेला नव्हता. मात्र भाजपमध्ये ते कृषिमंत्री असूनसुद्धा ’कम्फर्टेबल’ होते असे कधी वाटलेच नाही. यामुळे ते हयात असते तर २०२७साली होणार्‍या निवडणुकीच्या तोंडावर आणखी एखादे ’राजकीय नाट्य’ बघायला मिळण्याची शक्यता वाटत होती.

युगो ते भाजप व्हाया मगो, कॉंग्रेस असा राजकीय प्रवास करूनसुद्धा आपले अस्तित्व शाबूत ठेवणारे रवि गोव्याच्या इतिहासात एक न संपणारा विषय ठरले आहेत एवढे नक्की!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sovereign Gold Bond: जॅकपॉट लागला! सॉव्हरेन गोल्ड बाँडमुळे गुंतवणूकदारांना मोठा नफा; मिळणार 153 % परतावा

PM Modi Celebrates Diwali: "INS विक्रांतने पाकिस्तानची झोप उडवली", PM मोदींची दिवाळी गोव्यात; नौदलासोबत साजरा केला जल्लोष

Salman Khan: "बलुचिस्तान' आणि 'पाकिस्तान' वेगळे! सलमान खानच्या 'त्या' विधानावर वाद, नेटकऱ्यांनी घेतलं फैलावर VIDEO

"दिल्लीची माजी मुख्यमंत्री, तरीही भाड्याच्या घरात राहते", गोव्याच्या 'आप' प्रभारी आतिषी यांचा थक्क करणारा खुलासा; Watch Video

Cricketer Retirement: 'जम्मू-काश्मीर' ते 'टीम इंडिया': परवेझ रसूलच्या क्रिकेट प्रवासाला पूर्णविराम, सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली

SCROLL FOR NEXT