
पणजी: दिवंगत माजी मुख्यमंत्री तथा कृषिमंत्री रवी नाईक हे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व होते. गृहमंत्रिपदाच्या कार्यकाळात घेतलेली कणखर भूमिका आणि कृषिमंत्री या नात्याने जपलेली संवेदनशीलता या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या दोन्ही बाजू गोमंतकीय जनतेने अनुभवल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या आठवणी चिरकाल टिकतील, अशी भावना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
कृषिमंत्री रवी नाईक यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रविवारी कला अकादमीत आयोजित शोकसभेत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, स्वामी ब्रह्मेशानंदाचार्य यांच्यासह मंत्री, आमदार उपस्थित होते.
यावेळी फडणवीस म्हणाले, की रवी नाईक हे समाजातील दबलेल्या, पिचलेल्या लोकांचा आवाज होते. उत्तम व्हॉलिबॉलपटू म्हणून त्यांच्याकडे असलेली खिलाडूवृत्ती त्यांनी राजकारणातही जोपासली. त्यांच्या जाण्याने गोवा एका मोठ्या नेत्याला मुकला आहे.
गोव्यातील बहुजन समाजाच्या विकासासाठी रवी नाईक यांनी नेहमीच काम केले. रवी नाईक आणि माझी ओळख २०२१ मध्ये त्यांच्या भाजप प्रवेशावेळी झाली. गोवा आणि महाराष्ट्र ही दोन राज्ये सख्ख्या भावांसारखी असल्यामुळे गोव्यातील राजकीय घडामोडी महाराष्ट्राला माहीत असतात. त्यामुळे गोव्याच्या राजकारणातील दिग्गज नेते म्हणून रवी नाईक यांचे नाव मला माहीत होते, असेही त्यांनी नमूद केले.
कूळ-मुंडकार हा रवी नाईक यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. राजकीय प्रवासात मंत्री म्हणून त्यांच्याकडे ज्या खात्यांची जबाबदारी आली, ती त्यांनी समर्थपणे पेलली. शिक्षण क्षेत्रात पाय रोवून त्यांनी शैक्षणिक संस्था उभ्या केल्या. त्याचा लाभ अनेक तरुण-तरुणींना मिळत आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.
कुठे जन्म घ्यावा हे माणसाच्या हातात नसते. परंतु, मिळालेला जन्म सार्थकी कसा लावावा, याचे उदाहरण रवी नाईक यांच्या रूपाने पहायला मिळते. रवी नाईक यांचा जन्म भंडारी समाजात झाला; परंतु ते संपूर्ण बहुजन समाजाचे नेते होते.
गृहमंत्री म्हणून त्यांनी केलेली कामगिरी अजूनही अनेकांना आठवते. त्या कार्यकाळात त्यांनी राज्यातील गुंडगिरी मोडून काढली. सत्ता असताना विनाकारण त्यांनी कधी विरोधकांना तुरुंगात टाकले नाही, असे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर म्हणाले.
गोव्याच्या राजकीय इतिहासाच्या पानावर आतापर्यंत ज्या ज्या नेत्यांनी नाव कोरले, त्यात रवी नाईक यांच्या नावाचाही समावेश आहे. ५५ वर्षांच्या राजकीय कार्यकाळात त्यांनी जनतेला न्याय मिळवून दिला. रवी नाईक हे बहुजन समाजाचे कैवारी होते, असे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी नमूद केले.
दरम्यान, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, सभापती गणेश गावकर, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, मंत्री सुदिन ढवळीकर, विश्वजीत राणे, माजी खासदार नरेंद्र सावईकर, ब्रह्मेशानंद स्वामी, उद्योजक अवधूत तिंबलो यांनीही रवी नाईक यांना मनोगतातून श्रद्धांजली वाहिली.
गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्यानंतर रवी नाईक हे बहुजन समाजाचे मोठे नेते ठरले. कोणताही राजकीय वारसा नसताना त्यांनी केलेला राजकीय प्रवास प्रेरणादायी असा आहे. त्यामुळे रवी नाईक हे आजच्या युवकांसाठी प्रेरणास्थान आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यावेळी म्हणाले.
महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, आमदार जेनिफर मोन्सेरात, रुडॉल्फ फर्नांडिस, मायकल लोबो, गोविंद गावडे यांच्यासह राज्यातील भंडारी समाजातील काही नेत्यांची प्रामुख्याने अनुपस्थिती दिसून आली.
खासदार सदानंद शेट तानावडे यांच्या भाषणादरम्यान कला अकादमीच्या नूतनीकरणातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. तानावडे मनोगत व्यक्त करीत असतानाच विजेचा लपंडाव सुरू होऊन व्यासपीठावरील विद्युतपुरवठा खंडित झाला.
१. रवी नाईक यांच्या आठवणी सांगताना मंत्री विश्वजीत राणे भावूक झाले. माझे वडील तथा माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यावेळी रवी नाईक यांनी विमानाने बाहेरील डॉक्टरांना पाचारण केले होते असे म्हणत, रवी नाईक यांच्यामुळेच माझ्या वडिलांचे त्यावेळी प्राण वाचले, असेही मंत्री राणे यांनी नमूद केले.
२. रवी नाईक आणि मी अनेक वर्षे राजकारणात एकत्र काम केले. राजकीय नेत्याने जनतेला कसा न्याय द्यायचा असतो, हे रवी नाईक यांनी दाखवून दिले. त्या काळात माझे नाव पुढे असायचे. परंतु, सेनापती रवी नाईक हेच असायचे, असे सांगताना माजी केंद्रीय कायदामंत्री ॲड. रमाकांत खलप यांनाही गलबलून आले.
दिवंगत नेते रवी नाईक यांचा पुतळा फोंडा शहरात उभारण्यासाठी रूद्रेश्वर देवस्थानच्या रथोत्सव समितीने पुढाकार घेतला आहे.
रथोत्सव आयोजन समितीचे कार्याध्यक्ष किरण कांदोळकर यांनी ‘गोमन्तक’ला दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला फोंडा शहरात रवी नाईक यांचा पुतळा उभारायचा आहे. त्यासाठी फोंडा शहरातील रवींच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला योग्य जागा दाखवावी. रथोत्सव समितीचे रवी नाईक हेच अध्यक्ष होते. रूद्रेश्वर देवस्थान समितीवर सध्या सरकारी प्रशासक नेमला आहे. परंतु रवी नाईक यांच्या पुढाकारानेच श्री देव रूद्रेश्वराची रथयात्रा संपूर्ण गोव्यात काढण्यात आली होती. या समितीनेच रवी नाईक यांचा वारसा पुढे नेण्याचे निश्चित केले आहे. सरकार याबाबत काय पुढाकार घेते, हे आम्हाला माहीत नाही; परंतु रथोत्सव समिती गोव्यात रवी नाईक यांची स्मृती जतन करण्यासाठी निश्चित प्रयत्न करेल, अशी माहिती रथोत्सव समितीच्या अन्य सदस्यांनी या प्रतिनिधीला दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.