Ravi Naik: रवींना 'मगो'चे नेतृत्व मिळाले असते तर...?

Ravi Naik Legacy: वैयक्तिक आणि सार्वजनिक क्षेत्रात रवींनी कधी जात-पात-धर्म-वंश हे भेद मानले नाहीत. रवी कधी कुठल्या खात्यांच्या आहारी गेले नाहीत.
ravi naik funeral
ravi naik funeralDainik Gomantak
Published on
Updated on

दत्ता दामोदर नायक

रवी यांना कोणतीच विशेषणे लावायची गरज नाही. कारण रवी म्हणजे रवी म्हणजे रवी!

रवी नाईक हे मोठे लोभस व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या स्वभावात अंगभूत ऋजुता होती. नम्रता होती. सत्तेचा कैफ त्यांना कधी चढला नाही. रवी नाईक हे केवळ बहुजनांचे नेते नव्हते. ते सर्वजनांचे नेते होते.

वैयक्तिक आणि सार्वजनिक क्षेत्रात रवींनी कधी जात-पात-धर्म-वंश हे भेद मानले नाहीत. रवी कधी कुठल्या खात्यांच्या आहारी गेले नाहीत. मठ-मंदिरांची वारी करण्याची गरज रवींना भासली नाही. भाजपात जाऊनही रवींनी कधीच एका शब्दानेही हिंदुत्वाचा गजर केला नाही.

रवी नाईक हे ‘नीज गोंयकार’ होते. ओपिनियन पोल चळवळीचे ते अपत्य होते. बहुतांश कारकीर्द महाराष्ट्रवादी पक्षात जाऊनही ओपिनियन पोलमध्ये रवी संघप्रदेशाच्या बाजूने वावरले. रवींनी कधीच कोकणीचा दुस्वास केला नाही.

मराठीचा कैवार घेतला नाही. रवी नाईक हे अजातशत्रू होते. रवींच्या व्यक्तिमत्त्वात चुंबकीय आकर्षण होते. कुणाही सामान्य माणसाच्या खांद्यावर ते हात ठेवत. त्याला ‘पात्रांव’ म्हणून आदराने संबोधत. रवींनी कधी कुणाचा सूड घेतला नाही. कुणावर डूख धरला नाही.

गोव्याच्या मातीतून उगवलेले रवी नाईक हे स्वयंभू नेतृत्व होते. रवींना कोणत्याही पक्षाच्या टेकूची गरज कधी भासली नाही. कारण सर्वजन हा त्यांचा पक्ष होता. ते लोकनेते, लोकनायक होते. रवी निर्भीड होते. मुख्यमंत्री असताना चर्चिल आलेमांवला तुरुंगात टाकायचे धैर्य त्यांनी दाखवले.

१९८५सालच्या कोकणी आंदोलनाला हिंसक वळण लाभले. मडगावचा बाजार व शहर कित्येक दिवस बंद होते. मडगावचे तत्कालीन आमदार उदय भेंब्रे आपण ह्या गावचे (आमदार) नाही अशा आविर्भावात कोकणी आंदोलनात गुंतले होते.

१९८४सालच्या मडगावच्या विधानसभा निवडणुकीत उदय भेंब्रे बाबू नायकचा पराभव करू शकले कारण मडगावचे बाजारकार, सर्व बहुजनसमाज उदयबाबांच्या मागे उभा राहिला होता. ह्या बाजारकारांचे आपण काहीच देणे नाही ही उदय भेंब्रेंची वृत्ती आम्हा लोकसमितीच्या कार्यकर्त्यांना पसंत पडली नाही.

मडगावचा बाजार त्वरित उघडा होणे गरजेचे होते. मडगावकारांची गैरसोय थांबायला हवी होती. दरम्यान ‘कोकणी प्रजेच्या आवाजा’चे एक नेते दामोदर मावजो ह्यांनी आपल्या गिर्‍हाइकांची गैरसोय होऊ नये म्हणून माजोर्ड्याचे आपले किराणा मालाचे दुकान उघडले. आम्ही सर्व कोकणी समर्थक होतो. पण मडगाव शहरांचे कर्ज आमच्या माथ्यावर होते.

अशा बिकट प्रसंगी आम्हाला रवी नाईकांची आठवण झाली. रवींनी दोन दिवस माझ्या घरी वास्तव्य केले. रवींच्या नेतृत्वाखाली आम्ही मडगाव बाजारातून मोर्चा काढला. बाजारकरांना बाजार उघडायला सांगितले. रवीमुळे मडगाव बाजार उघडा झाला. त्यानंतर रवींची आणि माझी जिवलग मैत्री झाली.

रवी नाईकांच्या मृत्यूनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना मडगावचे आमदार दिगंबर कामत ह्यांनी एक सपशेल खोटारडे विधान केले. ते म्हणाले, ‘कोकणी आंदोलनावेळी मडगाव शहर खुले करण्यासाठी रवी नाईक मडगावमध्ये आले तेव्हा आपण लहान होतो.’

वास्तविक दिगंबर कामत त्यावेळी नगरसेवक होते. पण रवी नाईक व आमच्यासोबत न येता ते स्वस्थ घरी बसून राहिले. रवी नाईकांच्या तुलनेने दिगंबर कामत हे मूलतः भित्रे आहेत.

रवी नाईकांचा स्वभाव विनोदी होता. त्यांची भाषणे मुद्दा सोडून गेली तरी खेळकर होती. रवी नाईक दिलखुलास बोलत. लोकांना ते आवडे. रवी नाईकांचे भाषण दस्तुरखुद्द रवी नाईकांपेक्षा नकलाकार मनोहर भिंगी अधिक चांगले करत. भिंगीचा आवाज हीच आता रवी नाईकांची ओळख असेल.

विधानसभेत किंवा पत्रकार परिषदेत अडचणीचा प्रश्न आला तर रवी सोयीस्करपणे विषयांतर करत. ते कधीच कोणाच्या सापळ्यात अडकले नाहीत. शशिकलाताई काकोडकरांना रवी नाईकांच्या हाती मगो पक्षाची सूत्रे द्यायला हवी होती.

ravi naik funeral
Ravi Naik: गोव्याच्या राजकारणाला वळण देण्याची हिकमत असलेला नेता 'रवी नाईक'

रवींना मगोचे नेतृत्व मिळाले असते तर मगो पक्षाची वाताहत झाली नसती. मगो पक्ष अजूनही तामिळनाडूतील द्रमुक पक्षाप्रमाणे सत्तेत राहिला असता. भाजपला सत्ता मिळाली नसती.

रवी ईडीसीचे चेअरमन असताना मी ईडीसीचा संचालक होतो. रवी नाईकांच्या कारकिर्दीतच पाटो प्लाझावरील भूखंड डी.एल.एफ. कंपनीला १२० कोटी रुपयांना विकण्यात आला. ईडीसी तोटा भरून नफ्यात आली. रवी नाईकांच्या पुढाकारानेच पाटो प्लाझा संकल्पाचे नूतनीकरण होऊ शकले.

ravi naik funeral
Ravi Naik: फोंड्यात 'रवीं'चे अस्तित्व ठायी ठायी जाणवते! आता पुढे?

रवी नाईकांना सामान्य माणसाची नस सापडली होती. म्हणून त्यांनी मुंडकारांना संघटित केले. रवी नाईकांना बाह्य परिस्थितीची साथ मिळाली नाही. २००७साली कॉंग्रेस पक्ष सत्तेवर आला तेव्हा दिगंबर कामतऐवजी रवी नाईक मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते. रवी नाईक अकाली गेले असे म्हणता येणार नाही. पण रवी नाईक अचानक चटका लावून गेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com