रवी नाईक यांचे निधन समाजाचे नुकसान करणारे आहे. भाऊसाहेब बांदोडकर, मनोहर पर्रीकर गेल्यानंतर जसे दुःख गोव्याला झाले. या रवींच्या निधनाने समाज व्याकूळ झाला. समाज म्हणतो, तेव्हा केवळ भंडारी समाज असा त्याचा कोणी अर्थ काढू नये.
मला अभिप्रेत आहे, गोमंतकीय समाज. रवी नाईक हा एकसंघ गोमंतकीय समाजाचा प्रातिनिधिक नेता होता. हिंदू आणि ख्रिस्ती समाजाला तो आपलासा वाटत होता. त्या दृष्टीने गोव्याने पाहिलेला एक दणकट, सेक्युलर नेता म्हणून मी त्यांना अव्वल स्थान देईन. गोव्याच्या राजकारणाला वळण देण्याची हिकमत असलेला नेता.
भंडारी समाजाचा सर्वमान्य नेता म्हणून, सध्याच्या राजकारणाचा कल पाहता हिंदुत्ववादी नेता म्हणून त्यांना आपली प्रतिमा बनवता आली असती.
तसे घडले असते, तर ते आजन्म मुख्यमंत्रीपदावर राहिले असते. जातीयवादी नेता बनले असते, तर त्या जोरावरच भंडारी समाजाला प्रक्षोभक करून ते मुख्यमंत्रिपदाची आपली मांड मजबूत बनवू शकले असते. त्यांची स्वतःची राजकारणात एक लय होती.
राजकारणातील अनेक रंग त्यांनी ओळखले होते, परंतु स्वतःची लय पकडत ते राजकारण करीत राहिले. आपला उद्योग व्यवसाय, शिक्षण संस्था त्यांनी उभारल्या. सार्वजनिक जीवनात भाग घेतला, परंतु एवढे करूनही आपली रवी नाईक ही स्वयंभू छबी आणि लय त्यांनी बिघडू दिली नाही.
त्यांनी मनावर घेतले असते तर भंडारी समाजाचे दहा आमदार जिंकून आणणे त्यांना शक्य होते. मनोहर पर्रीकरांना जे जमले, ते रवी नाईक यांना कोणतीही वाट वाकडी न करता जमू शकले असते.
संघटना बांधणे, पक्ष उभारणे, कार्यकर्त्यांना सतत कार्यक्रम देणे व पूर्णवेळ राजकारण करणे, ही सध्याची राजकारणाची रीत ठरली आहे. त्यापासून रवी दूर राहिले. राजकारणाला आपल्यावर त्यांनी स्वार होऊ दिले नाही. रवी नाईक यांची धमक सर्वांना कळून चुकली होती.
व्यक्तिमत्त्वे दोन तऱ्हेची असतात, एक ज्यांना आपली ताकद आणि झेप माहीत असते, इतरांनाही ती माहीत झालेली असते, तर दुसऱ्या प्रकृतीचे लोक असे असतात, ज्यांची झेप त्यांना स्वतःलाही माहीत नसते. रवी नाईक यांना स्वतःची झेप आणि ताकद उमजली होती.
रवींना जातीयवादी घटक आपल्याबरोबर घेऊन जाऊ शकत नव्हते आणि धर्मांध शक्तीही. रवींनी हिंदुत्ववादी शक्तींबरोबर जसे अंतर राखले, तसे सनातनी मंडळींबरोबरही! त्यांनी कधी गंडे बांधून घेतले नाहीत, देव देव केला नाही की मठाधीशांकडे लोटांगण घातले नाही! किंबहुना अशा प्रवृत्तीबरोबर त्यांचे कधी पटलेही नाही.
म्हणूनच सारे रवींना टरकून असत. काँग्रेसमध्ये असता सारे गट एकत्र येऊन त्यांना मुख्यमंत्रिपदावर टिकू देत नसत. भाजपमध्येही त्यांच्यापासून सारे सावध पवित्रा बाळगत.
२००७ मध्ये दिगंबर कामत मुख्यमंत्री बनले. कारण काँग्रेसमधील प्रभावी गटाला रवींना मुख्यमंत्री होऊ द्यायचे नव्हते. वास्तविक रवींनी प्रदेशाध्यक्ष म्हणून गावागावात जाऊन गोवा पिंजून काढला होता. संपूर्ण गोव्यात पोहचू शकणारे एकमेव काँग्रेस नेते होते, ते रवी. रवींमुळेच भंडारी समाजाने काँग्रेसला एकमुखी पाठिंबा दिला होता.
ते आपले मुख्यमंत्री व्हावा याच विश्वासावर. त्यावेळी काँग्रेसचे १७ व भाजपचे १४ जण जिंकून आले होते. राष्ट्रवादीचे जुझे फिलीप, नीळकंठ हळर्णकर यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. परंतु राणे गटाला रवींना मुख्यमंत्री होऊ द्यायचे नव्हते.
त्यामुळे भाजपातून आलेल्या दिगंबर कामतांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची आयती माळ पडली. त्यात दिगंबर मंत्रिमंडळात सासष्टीचे सात मंत्री बनले. उत्तर गोव्यावर संपूर्ण अन्याय झाला. परिणामी एकूणच बहुजन समाज रुष्ट झाला. २००७ ची निवडणूक सुभाष शिरोडकरसुद्धा हरले होते. वास्तविक ही बहुजन समाजाशी प्रतारणा होती.
भंडारी समाजाला काँग्रेसपासून दूर नेण्याचे कृत्य त्या घटनेने घडले. भंडारी समाज त्यानंतरच्या २०१२ च्या निवडणुकीत भाजपमागे भक्कमपणे उभा राहिला. भंडारी समाजावरील अन्यायाचे परिमार्जन करताना रवींना गृहखाते देण्यात आले.
रवींवर अन्याय झाला होता, त्यांनी दिगंबरच्या मंत्रिमंडळाचा भाग बनायला नको होते, असे मानणारा एक वर्ग आहे. परंतु या गृहमंत्रिपदाच्या काळात रवींनी करून दाखविलेली कामगिरी कोणालाही जमली नसती. त्या काळात प्रोटेक्टर्स नावाने पर्यायी सरकार गोव्यात सुरू झाले होते. मामी व्हिक्टोरियांच्या सांताक्रूझमध्ये सकाळी ५०० लोकांचा दरबार भरे व अनेक प्रकरणांची वासलात लावण्यात येई.
मामी व रुडाल्फ यांना तुरुंगात डांबण्यात आले, त्यानंतर रुडाल्फना तडीपार करण्यात आले. चर्चिल आलेमाव यांना अटक करण्याचे धारिष्ट्य रवींचे. पोलिस ठाण्यावर हल्ला करणाऱ्या बाबूश मोन्सेरात व त्यांच्या पत्नीला पोलिस ठाण्यात फरफटत आणून त्यांना योग्य धडा शिकवून पोलिसांची प्रतिमा उंचावण्याचे धारिष्ट्य रवींनी दाखविले आहे.
रवी एवढे चतुर की ही कारवाई करण्यापूर्वी त्यांनी मनोहर पर्रीकरांना फोन केला होता. पर्रीकर तेव्हा विरोधी नेते. मी बाबूशना धडा शिकवतो आहे, तुम्ही त्यात पडू नका, असे रवींनी त्यांना ऐकवले. आपले सरकार पाडल्याने पर्रीकर बाबूशबद्दल नाराज होतेच.
पर्रीकारांनी त्यांना ‘डोन्ट वरी‘ म्हटले. त्यानंतर इस्पितळात जाऊन पर्रीकर जरूर बाबूश मोन्सेरातना भेटले. तुमच्याच सरकारने तुम्हाला मारहाण करवली आहे, असेही सांगायला पर्रीकर विसरले नाहीत.
परंतु एक गोष्ट विसरता येणार नाही, बाबूश मोन्सेरातवर आयकरची धाड पडते, तेव्हा मोन्सेरातचे पूर्ण समर्थन करणारे पर्रीकर... पर्रीकरांच्या काळात मोन्सेरातनी पोलिस ठाण्यावर हल्ला केला असता तर त्यावेळीही पर्रीकरांनी आपल्या या आमदाराला पाठीशी घातले असते.
म्हणूनच रवी नाईक यांच्यासारखे डेअरिंगबाज विरळाच. मोन्सेरातवर ही कारवाई होईपर्यंत मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना त्याचा पत्ता नव्हता. रवींना त्याबाबत त्यांच्या एका मित्राने छेडले असता, रवींनी कधी त्या घटनेचे श्रेय स्वतःकडे घेतले नाही. ते एवढेच म्हणाले, ‘कोणी कायदा हातात घेऊ नये‘.
रवींवर काँग्रेसने अन्याय केल्यामुळेच पर्रीकर २०१२ मध्ये संपूर्ण बहुमताच्या जोरावर भाजपचे मुख्यमंत्री बनू शकले. त्याच शिदोरीवर पर्रीकर भंडारी समाजाचेही ‘नेता’ बनले. दैवदुर्विलास म्हणजे काँग्रेसला अपशकून करणारे नेते पुढे कालांतराने सत्तेसाठी भाजपमध्ये गेले. काँग्रेसचे मात्र प्रचंड नुकसान होत गेले.
परंतु रवी नाईक भाजपात गेल्यानंतर तेथे पर्रीकरांच्या नेतृत्वाखाली फार काळ रमू शकले नाहीत. १९९९ मध्ये सार्दिन सरकारला भाजपने पाठिंबा दिला, मुळात लुईझिन फालेरो यांच्याविरोधात ११ जणांनी बंड करण्यास पर्रीकर यांनीच प्रोत्साहन दिले होते.
पर्रीकरांनी सार्दिन विदेश वारीवर गेले असता, त्यांचा पाठिंबा काढून घेतला. पर्रीकरांना मुख्यमंत्री बनविण्यासाठी तद्नंतर नऊ जणांचा हा गट भाजपात सामील झाला, त्यात रवी नाईकसुद्धा होते. २४ ऑक्टोबर २००० मध्ये अधिकारावर आलेल्या पर्रीकर सरकारात रवी सार्वजनिक बांधकाम मंत्री बनले.
परंतु पुढे सरकारमधले काही घटक विशेषतः रमाकांत खलप वगैरे काँग्रेसमध्ये जाऊ शकतात, या भीतीपोटी मनोहर पर्रीकरांनी महम्मद फैजल राज्यपाल असता सरकार बरखास्त करून नव्याने निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला.
त्यावेळी हिकमत दाखविली ती रवींनी. पर्रीकरांचा एकतर्फी निर्णय त्यांनी झुगारला. काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून पर्रीकर एकटेच पदावर राहिले होते. त्यावेळी पक्षात दुसऱ्या क्रमांकाचे स्थान रवींनी दिले असूनही भाजप पक्षश्रेष्ठींना आव्हान दिले.
आगामी निवडणुकीत पर्रीकरांच्या बरोबरीने फोटो असलेली पोस्टर गोव्यात येऊन पोहोचली होती. परंतु निवडणुकीला केवळ तीन आठवडे असताना रवींनी भाजपला मोठा धक्का दिला. भाजपनेही आव्हान स्वीकारायचे ठरवले.
त्यानुसार दिल्लीत वाजपेयी सरकारात मंत्री असलेल्या श्रीपाद नाईक यांना रवी नाईक यांच्याविरोधात उतरवण्यात आले. काँग्रेस पक्षात जे काही वर्षांनी भंडारी समाजाच्या नेत्याबाबत घडणार होते, त्याचाच एक डाव भाजपातही खेळला जात होता.
या खेळीचे खरे सूत्रधार, होते प्रमोद महाजन. त्यांनी गोव्यात या निवडणुकीत ४० सभा घेतल्या. त्यामुळे भाजप १७ जागा प्राप्त करू शकला. काँग्रेसला १३ जागांवर समाधान मानावे लागले. भाजपला मिकी पाशेको, पांडुरंग मडकईकर व बाबूश मोन्सेरात यांना आपल्या बाजूला वळवण्यात यश आले. परंतु रवी नाईक फोंड्यातून विजयी झालेच. श्रीपाद नाईक यांच्या स्थानिक राजकारणात परतण्याच्या महत्त्वाकांक्षेला कायमची मूठमाती मिळाली.
२००२ मध्ये स्थापन झालेले पर्रीकर सरकार २००५ मध्ये कोसळले. पर्रीकरांनी बाबूश मोन्सेरातना मंत्रिमंडळातून काढले होते.
त्यानंतर अनेक वेगवान घडामोडी घडत राहिल्या व दिगंबर कामत यांनीही घुसमटत भाजपा सोडला. राणेंनी सत्ता सांभाळली व ते २००७ पर्यंत मुख्यमंत्री होते. या सरकारला प्रादेशिक आराखड्याच्या व भ्रष्टाचाराच्या आरोपावरून गोवा बचाव अभियानाने ग्रहण लावले होते.
गोव्यात अभूतपूर्व आंदोलन उभे राहिले. जमीन रूपांतरणाची पुढे जी राळ उठली, तिची बिजे त्या काळात रोवली गेली होती. तरीही काँग्रेस पक्ष सत्तेवर येऊ शकला, याचे कारण रवी नाईक यांनी संपूर्ण गोव्यात फिरून वातावरण बदलले होते.
बहुजन समाजात त्यांनी जागृती निर्माण केली. काँग्रेसमधील सत्तेच्या दलालांनी उचल खात रवींना मुख्यमंत्रीपद मिळू दिले नाही. दिगंबर कामत यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली.
स्वतंत्र बाणा असलेले ‘अनप्रिडिक्टेबल रवी नाईक वास्तविक काँग्रेस व भाजपच्याही पचनी पडलेले नाहीत. १९७० ते १९८५ या काळात फोंड्यात रवी नाईक हे सळसळत्या रक्ताचे होते. त्यांनी मोटरसायकल पायलटगिरी केली.
बार चालवला, तेथे बहुजन समाजातील अनेक तरुण येत असत. होतकरू तरुणांचा तो एक सळसळता अड्डा बनला होता. रवी व्हॉलिबॉलपटू होते. फोंड्यातील जवाहर क्लबने त्या काळात हलचल निर्माण केली होती. रवी तरूणांचे हिरो होते. मी त्या काळात व्हॉलिबॉलपटू या नात्याने चिंबल येथे रवींची धाडशी-आक्रमक खेळी चिंबल येथे पाहिली आहे. कमकुवत समाजातील तरुण रवींकडे नेतृत्वाच्या आशेने पाहत होते.
कोकणी आंदोलनात मडगाव आठ दिवस बंद राहिले. आगशी येथे सात तरुणांचा बळी गेला, संपूर्ण सासष्टीत आंदोलनाची झळ पसरली होती.
हिंदूंनी घरे सोडून हिंदू बहुल भागात येऊन राहणे पसंत केले. रवी एकटे मडगावात गेले व ५० जणांचा तरुणांचा गट मडगावच्या रस्त्यावरून फिरला. त्या घटनेने मडगावातील दुकानदारांना हिम्मत मिळाली. रवींच्या नेतृत्वाखाली छाती पुढे काढून मडगावातील रस्त्यावर फिरत असतानाचे ते विलक्षण दृश्य मी पाहिले आहे.
दुसऱ्या दिवसांपासून मडगावातील दुकाने उघडली. रवींनी नेहमी फ्रंटफूटवर खेळी केली. जशी ती त्यांच्या व्हॉलिबॉलमध्ये दिसली, तशी राजकारणातही. परंतु राजकारण-समाजकारणात वावरताना रवींनी स्वतः कधी धाकदपटशाहीचा मार्ग अवलंबला नाही की प्रतिस्पर्ध्यांसाठी अपशब्द उच्चारले नाहीत.
रवींनी आवाज चढवला असेही घडले नाही. ते नेहमी उद्योगी, हिकमती राहिले. स्वतःचा व्यवसाय, शिक्षण क्षेत्रातील त्यांचे काम करताना त्यांच्यात ही उद्योगी, व्यवसायिक नैपुण्याची, कौशल्याची चुणूक दिसली.
बहुजनांतील अनेक मुले, फावल्या वेळात जे नसते उद्योग करीत बसतात, त्यात कधी रवी पडले नाहीत आणि व्यसनेही त्यांनी ओढावून घेतली नाहीत. काबाडकष्ट करून त्यांनी राजकारण-समाजकारण केले आहे. हे करताना उच्च समाजाबद्दल कधी त्यांनी असुया, द्वेष, तिरस्कार बाळगला नाही.
त्यांनी भंडारी समाजाला कधी जातीयदृष्ट्या चिथावणी दिल्याचे कुठे दिसलेले नाही. किंबहुना मुख्यमंत्री असतानाही त्यांनी बहुजन समाजातील तरुणांना प्रोत्साहित केले आणि त्यांच्यात कम्फर्ट लेवल निर्माण केला.
बहुजन समाज विशेषतः भंडारी समाजाला रवी आपला वाटे. काहींना तो आदर्श पुरूषही वाटण्याचे कारण त्यांच्या वागण्या-बोलण्यातीलही मार्दव हे आहे. त्यांचा बेडरपणा भंडारी समाजाला प्रोत्साहीत करीत असे.
सहा वर्षांपूर्वी एका तटस्थ राजकीय सर्वेक्षण संस्थेने गोव्यातील राजकीय नेत्यांबाबत माहिती संकलीत केली होती. तेव्हा बहुजन समाजाचा सर्वोच्च नेता म्हणून रवींना सर्वात जास्त गुण मिळाले होते.
रवी भाऊसाहेब बांदोडकरांसारखे उदार नव्हते. रवींना कोणी भांडवलदार म्हणू शकणार नाही. त्यांनी खिशात हात घालून मुठीत मावणारे पैसे कोणाला काढून दिले नाहीत. निवडणुकीतही हातचे राखून खर्च केले. परंतु रवींकडे करिश्मा होता, रस्त्यावर, चौकात उभे राहिले तर पटा-पटा लोक त्यांच्या बाजूला जमत असत. लोकांची गर्दी जमवण्याची ताकद त्यांच्याकडे होती. हसत, चेष्टा-मस्करी करीत खांद्यावर हात टाकत रवी सर्वांना आपलेसे करीत.
१९९१मध्ये अचानक राज्यपाल भानू प्रकाशसिंग यांनी विल्फ्रेड डिसोझांना हटवून रवी नाईक यांना मुख्यमंत्रिपदी बसवले होते. हा प्रयोग केवळ सहा दिवस चालला. परंतु भानू प्रकाश यांनाही रवींची भूरळ पडली होती.
रवींचा हिकमती स्वभाव शेवटपर्यंत कायम होता. भाजपाचा गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर रवींना मंत्रिपदावरून हटवण्याचा डाव यशस्वी ठरला नाही. राजकारणाचा दर्प आधी हुंगण्याचे त्यांचे कसब निर्विवाद होते, म्हणूनच त्यांनी रुद्रेश्वर देवाची रथयात्रा सुरू केली. ते अगदी सुरुवातीला रथयात्रेबरोबर दिसले, त्यानंतर भंडारी समाजाच्या इतर नेत्यांनी ती पुढे रेटली.
तरी रवींचाच बोलबाला झाला व त्यांचे नेतृत्व भाजपा पक्षश्रेष्ठींच्या दृष्टिकोनातून पुन्हा अधोरेखित झाले. त्यांच्या पदाला हात लावण्याचे धारिष्ट्य नेत्यांना झाले नाही. १९९८ मध्ये उत्तर गोव्यात त्यांनी एकहाती केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांचा पराभव केला.
ते केवळ भंडारी समाजाला जागृत करून. परंतु मनोज जरांगेंसारखे ते केवळ जातीय दृष्टिकोनातून वावरताना कुठेच दिसले नाहीत. जातीय प्रक्षोभ निर्माण करून आपली पोळी भाजून घेण्याचे त्यांनी कटाक्षाने टाळले.
गोव्याच्या राजकारणातील तीन मुख्य प्रवाह आहेत. एक भाऊसाहेब बांदोडकरांपासून सुरू होतो, त्यानंतर मनोहर पर्रीकरांची कारकीर्द आणि तिसरा प्रवाह बेडर रवी नाईक यांचा. त्यांनी गरीबी पाहिली होती, परंतु दूरदृष्टीचे नेते होते म्हणून जनमत कौलात त्यांनी हिरीरीने भाग घेतला, शेवटपर्यंत त्यांनी दोनच नावे घेतली. एक भाऊसाहेब व दुसरे जॅक सिकेरा. ख्रिश्चनांनाही ते आपलेसे वाटत. आजच्या गोव्यासाठी त्यांनी योगदान दिले आहे.
त्यांनी ठरवले असते तर ते मनोज जरांगे पद्धतीची चळवळ उभारून सत्तेपर्यंत जाण्याची धमक दाखवू शकले असते. भंडारी समाजात अशी धमक असलेला दुसरा नेता नाही.
बुद्धी चातुर्य असलेला आणि हिम्मतवान बहुजनी नेता म्हणून डॉ. काशिनाथ जल्मी यांच्याकडेही पाहिले जाते. परंतु जल्मींना आपल्या मतदारसंघाची नस ओळखता आली नाही. नायलॉन ६,६ प्रकरणात ते राजकारणातून बाहेर फेकले गेले.
येथे एक प्रकरण उद्धृत करण्याचा मोह आवरत नाही. बाणस्तारीहून कधी-कधी चालत येऊन पणजीत शिक्षण घेतलेले जल्मी डॉक्टर झाले. परंतु आरोग्य मंत्री बनताच त्यांनी आपल्या वर्गातील एका डॉक्टरची फोंड्याहून पेडण्याला बदली केली. तेव्हा त्यांच्या वर्गातील अनेकजण चकीत झाले. परंतु रवी मुख्यमंत्री बनताच त्यांनी तत्काळ या डॉक्टरला पेडण्यातून बोलावून घेतले.
हा दोन्ही बहुजन नेत्यांतील फरक. रमाकांत खलपांनाही भाजपला रोखताना मगोपची फेरबांधणी करता आली नाही. तळागाळातील संपर्क तुटला, हे सर्व कार्यकर्ते भाजपात सामील झाले. वास्तविक बहुजनांना मोठे होऊ न देण्याची काँग्रेस व तद्नंतर भाजपची राजकीय चाल गोव्याचे मोठे नुकसान करून गेली आहे.
तरीही रवी त्यांना पुरून उरले होते. सत्तेच्या दलालांची राजकीय क्षेत्राला पडलेली मगरमिठी सोडवली पाहिजे. रवींच्या जाण्याने हळवे होण्यापेक्षा बहुजन समाजाने स्वतःची खरी ताकद ओळखली पाहिजे. कोणाच्या हातातील बाहुले बनण्यापेक्षा स्वतंत्र बुद्धीने आपले वेगळे स्थान निर्माण करून गोव्याला नवी दिशा देणारा नेता तयार करणे हे बहुजन राजकारणाचे ब्रिद बनायला हवे. तीच रवी नाईक यांना आदरांजली ठरू शकेल!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.