Who After Ravi Naik: फोंड्यातील पोटनिवडणुकीवरून भाजपसमोर पेच! रवी नाईक यांचे कनिष्‍ठ सुपुत्र 'रॉय' यांच्या नावाचाही आग्रह

Ponda Constituency: सूत्रांच्या मते, रवी नाईक यांनी अलीकडे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना भेटून रॉय नाईक यांना सरकारात एखादे पद द्यावे, असा रेटा लावला होता.
Roy Naik
Roy Naik Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: बहुजन समाजाचे नेते रवी नाईक यांच्‍या निधनानंतर त्‍यांचे ज्‍येष्‍ठ सुपुत्र रितेश नाईक यांना फोंड्यातून बिनविरोध निवडून देण्‍याचे आवाहन मगोपने इतर सर्व पक्षांना केले असताना आणि रितेश यांना आताच मंत्रिमंडळात स्‍थान देऊन पोटनिवडणुकीत निवडून आणण्‍याची मागणी अखिल गोवा भंडारी समाजाकडून होत असतानाच, रवी नाईक यांचे कनिष्‍ठ सुपुत्र रॉय नाईक यांच्या नावाचाही आग्रह भंडारी समाजाचे काही नेते धरू लागले आहेत.

‘‘ रितेश किंवा रॉय यापैकी रवी नाईक यांच्या एका पुत्राला पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवारी द्यावी, अशी विनंती आम्ही भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आणि केंद्रीय नेते श्रीपाद नाईक यांच्याकडे केली आहे.’’ अशी माहिती भंडारी नेते व रवी नाईक यांचे निकटवर्तीय संजीव नाईक यांनी ‘गोमन्तक’ला दिली.

आम्ही तशी विनंती दामू नाईक यांच्याकडे १५ तारखेलाच अंत्यसंस्कारापूर्वी केली आहे. मंत्री म्हणून दोन पुत्रांपैकी एकाचा शपथविधी लागलीच व्हावा व तदनंतर त्यांना पोटनिवडणुकीत उमेदवारी द्यावी असे आम्हाला वाटते, असे नाईक म्हणाले.

सूत्रांच्या मते, रवी नाईक यांनी अलीकडे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना भेटून रॉय नाईक यांना सरकारात एखादे पद द्यावे, असा रेटा लावला होता. ‘सरकारला आता तीन वर्षे पूर्ण झाली असून रॉयनाही एक पद मिळावे,’’ अशी विनंती ते मुख्यमंत्र्यांकडे करीत असत, असे एका ज्येष्ठ नेत्याने या प्रतिनिधीला सांगितले.

भंडारींसह समस्‍त बहुजन समाजाचे खंबीर नेतृत्‍व, अशी ख्‍याती मिळविलेले माजी मुख्‍यमंत्री तथा कृषिमंत्री रवी नाईक यांचे गेल्‍या मंगळवारी हृदयविकाराच्‍या तीव्र धक्‍क्‍याने निधन झाले.

त्‍यांच्‍या निधनामुळे राज्‍य मंत्रिमंडळातील एक जागा रिक्त झाली असून, पुढील सहा महिन्‍यांत फोंडा मतदारसंघातही निवडणूक घ्‍यावी लागणार आहे.

अशा स्‍थितीत केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्‍यानंतर इतर सर्व पक्षांनी रवींचे ज्‍येष्‍ठ सुपुत्र तथा नगरसेवक रितेश नाईक यांना बिनविरोध निवडून द्यावे, असे आवाहन मगोपचे अध्‍यक्ष दीपक ढवळीकर यांनी केले होते. सहा महिन्‍यांत निवडणूक झाल्‍यास रितेश यांना काम करण्‍यास वेळ मिळणार नाही.

त्‍यानंतर लगेच २०२७ च्‍या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होणार असल्‍याचेही दीपक यांनी स्‍पष्‍ट केले होते. वीजमंत्री तथा मगोपचे ज्‍येष्‍ठ नेते सुदिन ढवळीकर यांनीही पक्षाने मांडलेली भूमिका योग्‍य असल्‍याचे सांगत, युती धर्म पाळण्‍याची हमी दिली.

त्‍यानंतर अखिल गोवा भंडारी समाजाने, ‘मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आताच रितेश नाईक यांना मंत्रिमंडळात सहभागी करून घेऊन त्‍यांना मंत्री म्‍हणून काम करण्‍याची संधी द्यावी’ अशी मागणी करीत, त्‍यानंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीत रितेश यांना फोंड्यातून निवडून आणण्‍याची ग्‍वाहीही दिली होती. त्‍यामुळे मुख्‍यमंत्री डॉ. सावंत आणि भाजप याबाबत काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्‍यान, रितेश आणि रॉय हे दोघेही भाऊ फोंड्याचे विद्यमान नगरसेवक आहेत. रितेश यांनी याआधी नगराध्‍यक्ष म्‍हणूनही काम केले आहे. रवी नाईक यांनीही नेहमीच रितेश यांची राजकीय वाटचाल यशस्‍वी व्‍हावी, यासाठी प्रयत्‍न केले होते.

त्‍यामुळे मगोप तसेच भंडारी समाजानेही रितेश यांनाच रवींच्‍या जागी संधी मिळावी, अशी मागणी केली आहे. परंतु, रॉय नाईक यांनीही फोंड्यातील पोटनिवडणुकीच्‍या माध्‍यमातून विधानसभेत येण्‍याचा संकल्‍प केला आहे. त्‍यामुळेच त्‍यांनीही भाजपच्‍या उमेदवारीवर दावा केल्‍याचेही सूत्रांनी नमूद केले.

Roy Naik
Goa Politics: मंत्रिमंडळातील रिक्त जागी मुख्‍यमंत्री सावंत कुणाची वर्णी लावणार? संपूर्ण राज्‍याचे लक्ष; मायकल संकल्‍प यांच्‍या आशा पल्लवित

देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

कला अकादमी येथे होणाऱ्या रवी नाईक यांच्या शोकसभेसाठी पक्षश्रेष्ठींच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व सदस्य, प्रदेशाध्यक्ष, भाजपचे संघटनात्मक नेतेही उपस्थित राहणार आहेत. भाजप संघटनेने ही शोकसभा मोठ्या प्रमाणावर घेऊन गोव्याचे भंडारी समाजाचे प्रमुख नेते स्व. रवी नाईक यांना भव्य आदरांजली वाहण्याचे निश्‍चित केले आहे. रवी नाईक यांचे उचित स्मारक उभारण्याच्या दृष्टीनेही उद्याच्या सभेत निर्णय होण्याची शक्यता आहे. तथापि, रवी नाईक यांचा वारसा पुढे चालविण्यासाठी त्यांच्या पुत्राला तत्काळ मंत्रिमंडळात घ्यावे का, या विषयावरही उद्या गोव्यात भाजप नेते चर्चा करतील, अशी शक्यता आहे.

Roy Naik
Who After Ravi Naik: रवींनंतर राज्यभरात सर्वमान्य असे नवे नेतृत्व कोण? चाचपणी सुरु; मार्चमध्ये पोटनिवडणूक शक्य

...म्‍हणून मुख्‍यमंत्री, दामूंकडून भाष्‍य नाही!

भंडारी समाजातील काही नेत्यांनी रितेशसह रॉय यांच्‍याही नावाचा आग्रह धरल्याची माहिती मुख्‍यमंत्री डॉ. सावंत यांच्‍यासह भाजप प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांच्‍यापर्यंत पोहोचली आहे. त्‍यामुळे भाजप नेत्‍यांनी आतापर्यंत मगोप किंवा भंडारी समाजाच्‍या मागणीवर कोणतेही भाष्‍य केलेले नाही. मंत्रिमंडळातील रिक्त जागी कुणाची वर्णी लावायची किंवा फोंड्यातील पोटनिवडणुकीत कुणाला उमेदवारी द्यायची, याचा निर्णय स्‍थानिक नेते पक्षश्रेष्‍ठींवरच सोपवणार असल्‍याचे भाजपमधील सूत्रांनी सांगितले.

आम्ही भंडारी समाजाच्या वतीने भाजपला लेखी कळविले आहे. रवी नाईक यांचा वारसा पुढे चालविण्यासाठी केवळ पोटनिवडणुकीत रितेश किंवा रॉय या रवींच्या दोन पुत्रांपैकी कोणा एकाला उमेदवारी द्या. त्यानंतर सार्वत्रिक निवडणुकीत तुम्ही तुम्हाला हवा तो उमेदवार निवडावा, अशी आमची विनंती आहे.

संजीव नाईक, भंडारी नेते आणि रवींचे निकटवर्तीय.

रितेश नाईक यांच्‍याबाबत मगो पक्षाने आपली भूमिका आणि त्‍यामागील कारणे आधीच स्‍पष्‍ट केली आहेत. रितेश नाईक यांना बिनविरोध निवडून देणे, हीच रवी नाईक यांना श्रद्धांजली असेल.

दीपक ढवळीकर, अध्‍यक्ष, मगोप.

रितेश नाईक यांच्‍याबाबत मगोपने आपली भूमिका मांडलेली आहे. मी सध्‍या याबाबत काहीही बोलणार नाही. काही दिवसांनंतर मी त्‍यावर भाष्‍य करेन.

सुदिन ढवळीकर,वीजमंत्री.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com