

गोव्याच्या भूमीत अनेक सण आणि पारंपरिक उत्सव साजरे केले जातात. त्यातून गोमंतकीय लोकसंस्कृतीचे दर्शन घडते. अनेक वर्षांची परंपरा लाभलेला गोव्यातील लोकोत्सव म्हणजे फाल्गुन महिन्यात येणारा शिमगोत्सव. हा उत्सव सुरुवातीला शेतकरी समाजाचाच होता. या दिवसांत शेतीची कामे संपलेली असत.
भरपूर पीक आल्यामुळे शेतकरी आनंदी असायचा. शेतीच्या कामांतून काही दिवस विरंगुळा मिळावा म्हणून शेतकरी बांधव एकत्र येऊन गावात हा उत्सव साजरा करत असत. कालांतराने या उत्सवाचे स्वरूप बदलत गेले आणि तो गावातील सर्व लोकांचा उत्सव बनला.
शिमगोत्सव किंवा शिशिरोत्सवात, विशेषतः ग्रामीण भागात, या उत्सवाची विविध रूपे पाहायला मिळतात. सामाजिक बहुसांस्कृतिकरण आणि आधुनिकीकरणाच्या झळा शिमगोत्सवालाही लागल्या आहेत; मात्र उत्सवप्रिय जनतेने हा सांस्कृतिक दायज (ठेवा) जिवापाड जपला आहे. गोव्यातील शिमगोत्सवातून आपले निसर्गाशी असलेले नाते स्पष्ट दिसते. पौष महिन्यातील महिलांचा ‘धालो’ असो किंवा ‘शिमगा’, या दोन्ही उत्सवांसाठी लागणारी जागा, ज्याला ‘मांड’ असे म्हणतात, ती निसर्गाच्या सान्निध्यातच असते.
फाल्गुन शुद्ध नवमीला मांडावरून शिमगोत्सवाची सुरुवात होते. प्रत्येक गावात असा मांड असतो. मांड ही ग्रामसंस्कृती आणि लोककलांचे जतन करणारी पवित्र जागा आहे. लोक मांडावर जमल्यानंतर पारंपरिक पद्धतीने नमन केले जाते. प्रत्येक गावात शिगम्याची गुढी असते, जिला पारंपरिक भाषेत ‘निशाण’ असे म्हणतात. मांडावर ही गुढी फुलांच्या माळांनी सजविली जाते. ढोल-ताशे व कांसाळी वाजवत, नाचत-गात गटागटाने लोक गावातील मंदिराजवळ येतात. बहुतेक गावांत रोमटामेळ असतो. मंदिरातील देवाला नारळ अर्पण करून देवळासमोर गोल फेर धरून, हातात झांज घेऊन नमन केले जाते.
‘नमन’ हा शिमग्यातील सर्वांत महत्त्वाचा विधी आहे. पारंपरिक मांडावर प्रमुख मांडकऱ्यासह गावकरी नमनाद्वारे ग्रामदेवतेबरोबर गावातील समस्त देवदेवतांना शिमगोत्सवात सहभागी होण्यासाठी निमंत्रित करतात. कधी गणपतीला तर कधी मांडगुरूला ‘नमन’ या लोकगीतांच्या माध्यमातून वंदन व स्मरण केल्यानंतर शिमग्याच्या उत्सवाला प्रारंभ होतो.
नमनाचे लांबलचक गायन संपल्यानंतर घुमट, शामेळ, कांसाळे, सनई, सूर्त या वाद्यांच्या साथीने तालगडी, चौरंग, ताळो, तोणयांमेळ, गोफ, मोयलो असे विविध लोकनृत्यप्रकार सादर केले जातात. दुसऱ्या दिवसापासून हे लोकनर्तक पथक गावातील प्रत्येक घरासमोरील सजविलेल्या अंगणात आपले नृत्यप्रकार सादर करतात.
या पथकाला ‘मेळ’ असे म्हणतात. गावातील प्रत्येक वाड्याचा स्वतंत्र मेळ असतो; तसेच तो वेगवेगळ्या जमातींचाही असू शकतो. काही मेळांची स्वतःची गुढी असते. ही गुढी मेळाच्या मानाचे प्रतीक मानली जात असल्याने तिचा योग्य तो मानमरातब सर्वत्र राखला जातो. “विटेवरी उभा, कटेवरी हात। काय मौजेचा पंढरीनाथ॥” अशी दोन ओळींची गीते गायली जातात. चालताना सर्वजण ‘ओस्सय-ओस्सय’ असा गजर करतात. ठरलेल्या कालावधीत गावाची परिक्रमा पूर्ण करून मेळ मांडावर परततो. तेथे लोकनृत्यांचे सादरीकरण होते. पुन्हा एकदा ‘शिवड’ गायले जाते.
सत्तरीतील शिमगोत्सवात पहिल्याच दिवसापासून मंदिराच्या प्रांगणात ‘तालगडी’ हे पारंपरिक नृत्य खेळले जाते. त्यानंतर होळी घातली जाते. रानात जाऊन आंब्याची किंवा अन्य झाडाची होळी आणून ती वाजतगाजत रोवली जाते. नंतर तिचे दहन केले जाते. त्यानंतर करवली उत्सव साजरा होतो. प्रत्येक गावात घोडे मोडणीचे खेळ खेळले जातात. चोरोत्सव हा एक प्रसिद्ध खेळ आहे. शिमगोत्सवात रोमटामेळ, देवाची पालखी, मिरवणूक आणि शेवटच्या दिवशी ‘न्हावण’ अशी सात दिवसांची परंपरा आहे.
गोव्यातील गावडा, कुणबी, वेळीप या आदिवासी जमातींनी पारंपरिक शिगम्याचे जतन केले आहे. पूर्वजांकडून मिळालेला लोकनृत्यांचा आणि लोकगीतांचा वारसा आदिवासी युवक व ज्येष्ठांनी समर्थपणे सांभाळला आहे. गोफनृत्य, तोणयामेळ, थेंगे, तालगडी हे विविध खेळ (नृत्यप्रकार) आजही तितक्याच जोषात सादर केले जातात. काही आदिवासी ‘शिकमो’ हा वैशिष्ट्यपूर्ण शिमगोत्सव साजरा करतात. धनगर बांधवांचाही शिमगोत्सव परंपरा आणि चालीरीती जपणारा आहे.
- प्रा. किशोर वासुदेव वझे
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.