Ravi Naik: फोंड्यात 'रवीं'चे अस्तित्व ठायी ठायी जाणवते! आता पुढे?

Ravi Naik Ponda politics: आज फोंड्यात रविंची जागा घ्यायला अनेकजण इच्छुक आहेत. पण रविंचे वारसदार बनू पाहणाऱ्यांनी त्यांचे गुण आत्मसात करण्याचे आधी बघितले पाहिजे.
Ravi Naik Death News
Ravi NaikDainik Gomantak
Published on
Updated on

मिलिंद म्हाडगुत

गोव्याचे लोकनायक रवि नाईक यांचे नुकतेच निधन झाले. जरी ते गोवा राज्याचे नेते म्हणून ओळखले जात असले तरी फोंडा मतदारसंघ हा त्यांचा ‘होमटाउन’ होता. ‘घार फिरते आकाशी पण तिचे चित्त पिलापाशी’ अशी रविंची फोंड्याबाबत स्थिती असायची.

त्यामुळेच त्यांना ’फोंड्याचे शिल्पकार’ म्हणून संबोधले जायचे. आज फोंड्यात जेवढी म्हणून विकासकामे दिसत आहेत, ती सर्व रविंच्या कारकिर्दीतलीच. मग ते राजीव गांधी कला मंदिर असो, बगल रस्ते असो, क्रीडा प्रकल्प असो, सरकारी इमारतींचा प्रकल्प असो, पशुसंवर्धन खात्याचे गेस्ट हाऊस असो, मार्केट प्रकल्प असो सर्व काही रविंच्या काळातीलच.

फोंड्याला तिसरा जिल्हा करण्याचे रविंचे स्वप्न होते. त्याकरता त्यांनी २०११पासून म्हणजे गृहमंत्री असताना प्रयत्न करायला सुरुवात केली होती. दुर्दैवाने अजूनपर्यंत तरी त्यांचे हे स्वप्न साकार होऊ शकलेले नाही. पण तरीही फोंड्यात रविंचे अस्तित्व ठायी ठायी जाणवते.

१९८४साली ते फोंड्यातून प्रथमच निवडून आले. तेव्हापासून ते त्यांच्या निधनापर्यंत या मतदारसंघावर त्यांचा पगडा कायम राहिला. तसे या दरम्यान मगोचे शिवदास वेरेकर व लवू मामलेदार हेही फोंड्याचे आमदार होते.

वेरेकरांनी तर दोनदा (१९८९, १९९४) आमदारपद भूषविले आहे. रविंपूर्वी गजानन रायकर, शशिकलाताई काकोडकर, रोहिदास नाईक व जोइल्द आगियार यांनीही फोंडा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

पण ठसा उमटला तो रविंचाच! तसे १९८९मध्ये ते फोंडा सोडून मडकईतून रिंगणात उतरले होते. आणि मडकईचे आमदार असताना १९९१मध्ये राज्याचे मुख्यमंत्रीही बनले होते. आणि याचा फायदा घेऊन त्यांनी त्यावेळी फोंड्यात विकासाची गंगा आणून सोडली होती.

तत्कालीन संरक्षण मंत्री शरद पवार यांना धरून लष्कराकडे असलेले फोंड्याचे क्रांती मैदान अर्धे का होईना पण फोंडा नगरपालिकेच्या अखत्यारीत आणणारे रविच होते.

एवढेच कशाला शिगमोत्सव राज्य पातळीवर नेल्यानंतर आयोजनाचा पहिला मान फोंड्याला देण्यातही रविंचाच सिंहाचा वाटा होता. यातून त्यांचे फोंड्यावर असलेले प्रेम अधोरेखित होते. त्यांना या मतदारसंघाची खडान्खडा माहिती असायची.

पूर्वी म्हणजे २००७पर्यंत उजगाव पंचायत फोंडा मतदारसंघात होती. आणि या पंचायतीची प्रत्येक गल्ली, वाडा रविंना पाठ असायचा. २००२साली झालेल्या निवडणुकीत मध्यरात्री दोन वाजता गवळीवाडा इथे जाऊन केलेला प्रचार मला आजही आठवतो.

फोंड्यात इतकी वर्षे राहूनसुद्धा गवळीवाडा नावाचा भाग उजगावात आहे हे बऱ्याचजणांना माहीत नव्हते. रविंमुळे आम्हांला हा भाग कळू शकला आणि विशेष म्हणजे मध्यरात्रीचे दोन होऊनसुद्धा झोपेचे आक्रमण परतावून लावून तिथले लोक आमची भाषणे ऐकताना दिसत होते.

फोंडा शहरातील लोकांची मानसिकता काय, उजगाव, खांडेपार या ग्रामीण भागातील लोकांना काय हवे याचा संपूर्ण आराखडा रविंकडे असायचा. आणि त्याप्रमाणे ते तर वागायचेच आणि कार्यकर्त्यांनाही वागायला लावायचे. काही विपरीत प्रसंग घडले तर विचलितही होत नसत.

२००२सालीच उजगाव पंचायतीतील कातर भागात आम्ही प्रचाराला गेलो असताना तिथल्या युवकांनी आम्हाला अक्षरशः ’हूट आउट’ केले. त्यामुळे आम्हाला प्रचार न करता तिथून जावे लागले. पण रवि विचलित झाले नाही आणि आम्हालाही होऊ दिले नाही.

आणि मजा म्हणजे ज्या युवकांनी आम्हाला प्रचार करू दिला नव्हता तेच युवक दुसऱ्या दिवशी फोंड्याच्या कार्यालयात रविंची क्षमा मागताना बघायला मिळाले. त्या बूथवर रविंना भरपूर आघाडी मिळाली हे वेगळे सांगायला नकोच.

Ravi Naik Death News
Tribute to Ravi Naik : नव्वदमध्ये गोव्यातील गुन्हेगार रवींच्या नावाने थरथर कापत होते; महाराष्ट्रापर्यंत पोहोचला होता दबदबा

रविंचा करिष्माच असा असायचा. म्हणूनच तर ते फोंड्यासारख्या किचकट मतदारसंघातून सहा वेळा निवडून येऊ शकले. २०२२साली तर भाजपच्या उमेदवारीवर लढताना परिस्थिती अगदीच विपरीत होती. स्वकीयच गद्दारी करताना दिसत होते. तरी रवि बाजी मारू शकले ते त्यांच्या लोकसंग्रहामुळे!

त्यांना आपल्या मतदारसंघातील प्रत्येक मतदाराची, मग तो गोमंतकीय असो वा बिगर गोमंतकीय संपूर्ण कुंडली पाठ असायची. याबाबतीत त्यांचा मेंदू संगणकाचे काम करत असे. पण आता त्यांच्या निधनानंतर फोंड्याचे काय?

Ravi Naik Death News
Ravi Naik Political Career: नगरसेवक ते मुख्यमंत्री...गोव्याच्या राजकारणातील 'दीपस्तंभ' रवि नाईक, वाचा त्यांची राजकीय कारकीर्द

अशी भीती अनेकांना भेडसावायला लागली आहे. काल त्यांच्या अंत्यविधीला जमलेल्या लोकांत हीच चर्चा सुरू होती. ’शो मस्ट गो ऑन’ या सूत्राप्रमाणे फोंड्याला नवा आमदार मिळणार असला तरी तो ’रवि’ असेल की नाही हे सांगणे मात्र कठीण आहे. आज फोंड्यात रविंची जागा घ्यायला अनेकजण इच्छुक आहेत. पण रविंचे वारसदार बनू पाहणाऱ्यांनी त्यांचे गुण आत्मसात करण्याचे आधी बघितले पाहिजे.

एका अतिशय सामान्य घरात जन्माला येऊनसुद्धा हा माणूस मुख्यमंत्रीपदापर्यंत कशी झेप घेऊ शकला याचाही अभ्यास केला पाहिजे. विपरीत परिस्थितीतसुद्धा रविंच्या मागे मतदार का उभे राहिले, याचाही आढावा घेतला पाहिजे. असे झाले तरच फोंड्याला एक नवा ‘रवि’ मिळू शकेल. अन्यथा नवा आमदार येऊनही रविंनी आपल्या असीम कार्याने फोंडावासीयांच्या मनात जी जागा निर्माण केली आहे तिला धक्का लावणे अशक्य होऊन जाईल हे निश्चित.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com