DJ Controversy Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

DJ Controversy: पुण्यात 'DJ'चा सवाल; गोव्यात नरकासुराचे काय?

DJ Controversy: दुष्टतेचे प्रतीक जाळताना सामान्य माणसाच्या शांततेचा बळी जाणे, ही कसली प्रथा?

गोमंतक ऑनलाईन टीम

पुण्यातील विद्यानंद बापट यांनी गणेशोत्सवात ‘डीजे’च्या वापरावर बंदी घालण्याची मागणी केली. त्यानंतर घडलेल्या घटनांनी एक व्यापक प्रश्‍‍न पुन्हा ऐरणीवर आणला. सार्वजनिक उत्सवांच्या नावाखाली वाढत चाललेला ध्वनीचा अतिरेक, त्यातून निर्माण होणारा सामाजिक त्रास तसेच त्याविषयी बोलणाऱ्यांबद्दलची असहिष्णुता चिंतेची बाब आहे. बापट यांना झालेली मारहाण हा एका व्यक्तीवरील हल्ला नव्हता.

सार्वजनिक हिताच्या प्रश्‍‍नांवर मत मांडण्याच्या अधिकारालाच दिलेले ते आव्हान आहे. उत्सव हा आनंद, श्रद्धा व सामाजिक एकात्मतेचा विषय असतो. मात्र, गेल्या काही वर्षांत अनेक ठिकाणी उत्सवांचे स्वरूप बदलताना दिसते. डीजे, कानठळ्या बसवणारी ध्वनिव्यवस्था, फटाक्यांचा अतिरेक, शक्तिप्रदर्शनाची स्पर्धा यामुळे मूळ उद्देश मागे पडत आहे. ध्वनिप्रदूषणाचे दुष्परिणाम वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले आहेत.

ध्वनीमर्यादांचे नियम अस्तित्वात असतानाही त्यांची अंमलबजावणी मात्र सैल दिसते. गोव्यात या समस्येचे सर्वाधिक ठळक रूप नरकासुर स्पर्धांच्या काळात दिसून येते. अत्याचार, अहंकार तसेच दुष्ट प्रवृत्तीचे प्रतीक मानल्या गेलेल्या नरकासुराचा श्रीकृष्णाने वध केला, ही या परंपरेमागील संकल्पना आहे. दुष्टतेवर सज्जनतेचा विजय साजरा करणे, हा तिचा गाभा. प्रत्यक्षात मात्र नरकासुर दहनाच्या आदल्या रात्री अनेक ठिकाणी होणारा गोंगाट, ‘डीजे’चा कर्णकर्कश आवाज, मद्यपान, बेशिस्त वर्तन तसेच शक्तिप्रदर्शन यामुळे मूळ संदेश हरवतो.

नरकासुराऐवजी श्रीकृष्ण पूजन करण्यासाठी तरुणांना प्रोत्साहित करण्याच्या घोषणा काही वर्षांपूर्वी मगो पक्षाने केल्या होत्या. प्रत्यक्षात त्या तोंडच्याच वाफा ठरल्या. आज अनेक ठिकाणी नरकासुर स्पर्धा म्हणजे भव्य निर्मिती, मोठमोठ्या ध्वनिवर्धकांची रांग व रात्रभर सुरू राहणारा गोंगाट असे समीकरण बनले आहे. या आवाजाचा सर्वाधिक फटका परिसरातील नागरिकांना बसतो. वयोवृद्ध, आजारी व्यक्ती, लहान मुले, परीक्षेच्या तयारीत असलेले विद्यार्थी यांना रात्रभराचा हा त्रास सहन करावा लागतो. उत्सव साजरा करण्याचा अधिकार जसा आहे, तसाच शांततेत जगण्याचाही अधिकार आहे, याचे भान अनेकदा हरवलेले दिसते.

काही वर्षांपूर्वी ताळगाव शंकरवाडी परिसरात नरकासुर बनवणाऱ्या मद्यधुंद अवस्थेतील काही तरुणांनी रात्री एका दुचाकीस्वारावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. अशा घटना अपवादात्मक असल्या तरी त्या उत्सवांच्या नावाखाली वाढणाऱ्या बेफिकिरीकडे बोट दाखवतात. ध्वनिप्रदूषण नियंत्रणासाठी पोलिस, प्रदूषण नियंत्रण मंडळ, स्थानिक प्रशासन, जिल्हा यंत्रणा अशा विविध संस्था अस्तित्वात आहेत. मात्र, समन्वयाचा अभाव वारंवार जाणवतो. कारवाईची जबाबदारी कोणाची, याबाबतचा गोंधळ दरवर्षी दिसून येतो.

किनारी भागांतील संगीत रजनी असो वा नरकासुर मिरवणुका, नियमांची अंमलबजावणी अनेकदा कागदावरच राहते. उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर काही प्रसंगी यंत्रणा सक्रिय झालेली दिसली असली तरी सातत्यपूर्ण अंमलबजावणी अद्याप अपुरी आहे. पुण्यात विद्यानंद बापट यांनी उपस्थित केलेला प्रश्‍‍न स्थानिक मर्यादांमध्ये बंदिस्त नाही. गोव्यातील नरकासुर प्रस्‍थासंदर्भात तर तो अधिकच महत्त्वाचा ठरतो.

दुष्टतेचे प्रतीक जाळताना सामान्य माणसाच्या शांततेचा बळी जाणे, ही कसली प्रथा? उत्सवांवर निर्बंध घालणे हा उपाय नाही; परंतु त्यांना शिस्त, संवेदनशीलता तसेच सामाजिक जबाबदारीची जोड देणे आवश्यक आहे. ‘डीजे’चा वापर मर्यादित स्वरूपात, नियोजित वेळेत व योग्य-ठरावीक ठिकाणी होऊ शकतो. समाजातील विविध घटकांच्या हक्कांचा विचार करून उत्सव साजरे करणे, हीच खरी संस्कृती ठरते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT