Porvorim Flyover Construction  Dainik Gomatnak
गोंयकाराचें मत

Porvorim Flyover: आधी कला अकादमी, मग लईराई जत्रा, आता.. पर्वरी दुर्घटना! जीवितहानी नाही म्हणजे सगळे आलबेल आहे असे नाही

Porvorim Flyover Accident: जीवितहानीसारखा अनर्थ झाला नाही, म्हणजे सगळे आलबेल आहे, असा त्याचा अर्थ होत नाही. लहानशी कमतरता राहून गेली तर तो पुढील दुर्घटनेच्या मालिकेतील एक दुर्लक्षित जोड ठरू शकतो.

गोमन्तक डिजिटल टीम

श्रीदेवी लईराईच्या जत्रोत्सवात बळी गेलेल्या नातेवाइकांच्या डोळ्यांतली आसवे आता कुठे सुकताहेत, तोवर पर्वरीत भीषण दुर्घटना सुदैवाने टळली. गिरी-पर्वरी उड्डाणपुलाच्‍या दोन खांबांना जोडणारा सिमेंटचा अवाढव्य एक भाग चढवताना कोसळला.

सुदैवाने ‘त्या’ क्षणी खांबांच्या बाजूने कोणतेही वाहन मार्गस्थ होत नव्हते, म्हणून मोठा अपघात टळला; काही कामगार जखमी झाले. थोडक्यात काय तर, जिवावर आलेले, शेपटावर निभावले. अर्थात हानी टळल्याने घटनेचे गांभीर्य कमी होत नाही. सरकारी यंत्रणेसाठी हा सूचक इशारा आहे.

पुढील आठ दिवसांत मान्सून गोव्याच्या वेशीवर येऊन ठेपेल. मुसळधार पावसात उड्डाणपुलाचे काम सुरू राहणार आहे, त्यातूनच वाहने मार्गस्थ होतील. तेथे अपघात होऊ नयेत, याची काळजी घ्यावी लागणार आहे.

पर्वरीत कोट्यवधी खर्चून आकारास येत असलेल्या ५ किमी लांबीच्या उड्डाणपुलाचे काम आव्हानात्मक व जोखमीचे आहे. महामार्गावरून दररोज हजारो वाहने ये-जा करत असताना तेथे खांब उभे राहिले; आता त्यांना जोडणारे ‘सेगमेंट’ बसवले जात आहेत.

त्या पार्श्वभूमीवर चोख नियोजन आणि कठोर अंमल झाला तरच निभाव लागेल. खांबांना जोडणारा भाग कोसळल्याने लोकांच्या मनात अनेक शंका निर्माण होऊ लागल्या आहेत. उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्याची मुदत एप्रिल २०२६ आहे; परंतु तत्पूर्वी पाच महिने आधी काम पूर्ण करण्याचे लक्ष्य बाळगल्याचे सरकारी पातळीवरून सांगण्यात आले आहे.

त्याचे प्रतिबिंब कामात दिसते आहे. खांब उभारणी ज्या कमालीच्या वेगाने झाली, ती पाहूनच दर्जाविषयी शंका उत्पन्न होऊ लागली, कालच्या अपघातामुळे ती अधिक बळावली. संबंधित ठेकेदाराला शासन व्हायला हवे. ‘काळ्या यादीत टाकेन’, अशा वल्गनेने धाक राहत नाही.

कृती दिसायला हवी. माणसे मरूनही कारवाई होत नाही, तर पर्वरीतील घटनेचे काय घेऊन बसलात, अशा प्रकारच्या वक्तव्यांना जागा राहू नये, याची खबरदारी सरकारने घ्यावी. शिवाय झालेल्या कामाचा दर्जाही तपासून पाहावा. उच्च न्यायालयाचे कामावर लक्ष असल्याने लोकांची गैरसोय होणार नाही, यासाठी यंत्रणेला लक्ष द्यावे लागले.

पण, पावसाळ्यात खरी कसोटी आहे. पर्वरीतील घटना घडल्यानंतर बांधकाम खाते, वाहतूक खाते व वाहतूक पोलिस यांच्यात समन्वय नसल्याचे दिसून आले आहे. उड्डाणपुलाचा पुढील टप्प्यात पोहोचल्याने सांगोल्डा जंक्शन ते ‘ओ-कोकेरो’ जंक्शनदरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग आता बंद करावा की नाही, यावरून मतभेद होते, अशी माहितीही समोर येत आहे.

त्यावरून लोकांतही संभ्रम निर्माण झाला होता. पुढील दिवसांत तो बंद करावाच लागेल. वाहतूक सुरू ठेवून उड्डाणपुलाचे काम करणार का, हा आता कळीचा मुद्दा आहे. भविष्यात समोर काय समस्या येतात, त्याचा अभ्यास करून कृती आराखडा ठरवा. लोकांची सुरक्षा आणि कामाचा दर्जा महत्त्वाचा आहे.

Porvorim Flyover

अशा प्रकारचे बांधकाम काही पहिल्यांदाच होत नाही. यापूर्वी अशी अनेक अवजड, मेगा प्रकल्प साकारले गेले आहेत. पण, तिथे होणाऱ्या लहानसहान घटनांकडे खूप वेळा दुर्लक्ष केले जाते. लहानतला लहान ते मोठ्यातला मोठा अपघात, जीवितहानी झालेला अथवा न झालेला यांची तपासणी व संकलन पुढील अपघात टाळण्याच्या दृष्टीने होत नाही, ही शोकांतिका आहे.

केवळ महत्त्वाच्या टप्प्यांवरच नव्हे तर बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर त्याचे मूल्यांकन, तपासणी होत राहिली पाहिजे. तीही पूर्वी झालेल्या अपघातांच्या दृष्टिकोनातून. गेल्या सप्टेंबर महिन्यात बिहारमध्ये पूल कोसळल्याची घटना तशी ताजी आहे. पण, त्या दुर्घटनेच्या अभ्यासाचा गोव्यात उड्डाणपूल बांधताना काही उपयोग झाला का?

दुर्घटनेपासून न शिकणे हे नव्या दुर्घटनेस आमंत्रणच असते. लहान लहान संकेतांकडे दुर्लक्ष केले की, टळू शकणारी मोठी हानी अवश्यमेव घडते. संबंधित यंत्रणाच त्याला एक प्रकारे निमंत्रण देत असते. उड्डाणपुलावर दोन खांबांना जोडणारा सिमेंटचा अवाढव्य भाग कोसळणे हा संकेत आहे. हीच वेळ आहे, जेव्हा त्याला संलग्न असणारे सर्व खांब, जोड दिले जाणारे भाग तपासून पाहणे. ही मानवी चूक होती की प्रक्रिया चुकीची होती याचीही पडताळणी व्हावी.

जीवितहानीसारखा अनर्थ झाला नाही म्हणजे सगळे आलबेल आहे, असा त्याचा अर्थ होत नाही. एखादी लहानशी कमतरता राहून गेली तर तो पुढील दुर्घटनेच्या मालिकेतील एक दुर्लक्षित जोड ठरू शकतो. कला अकादमीच्‍या ओपन थिएटरचा स्लॅब कोसळला तेव्हाही जीवितहानी झाली नाही यात समाधान मानले गेले. आजमितीस कला अकादमीची हालत काय आहे?

या वर्षी श्रीदेवी लईराईच्या जत्रोत्सवात लोकांचे हकनाक बळी जाण्यापूर्वी, त्या आधीच्या जत्रेत जखमी झालेले व गेलेले जीव, ‘गर्दीचे व्यवस्थापन नीट करा’, असाच संकेत देत होते. त्याकडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम यंदा भोगावा लागला. लईराई जत्रेतील, कला अकादमीतील संकेतांकडे उन्मत्तपणे दुर्लक्ष केले तसे इथे करणे परवडणार नाही. संकेत लहानच असतात; परिणाम मोठे असतात. संस्कृतीची ओळख करून देत भावी पिढ्यांना जोडणारे कलेचे मंदिर काय किंवा वाहतुकीची संभाव्य कोंडी फोडण्यासाठी शहर ओलांडणारे सेतू काय, कोसळले तर हानी ठरलेलीच.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT